भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान सध्या कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरी कसोटी ९ ते १३ ऑगस्ट दरम्यान लॉर्ड्सच्या मैदानावर होणार आहे. पण पहिल्या दिवसाच्या खेळावर पावसाने पाणी फेरले. त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ पूर्णपणे रद्द करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी इंग्लंडने नाणेफेक जिंकली आणि भारताला फलंदाजीस आमंत्रण दिले. पण भारताची अवस्था चहापानापर्यंत ३ बाद १५ अशी झाली.

दुसऱ्या सामन्याचा पावसाने विचका केला असून भारतीय संघाला फार काळ मैदानावर खेळायची संधी मिळाली नाही. पण विविध कारणांसाठी चर्चेत असलेला अर्जुन तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पावसादरम्यान मैदानाची देखभाल करणाऱ्या ग्राउंड स्टाफची अर्जुनने मदत केली असल्याचे दिसले आहे. लॉर्ड्सच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंट वरून हे ट्विट करण्यात आले आहे.

दरम्यान, पहिल्या कसोटीतही भारताला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. इंग्लंडने भारतावर सामन्याच्या चौथ्या दिवशी ३१ धावांनी विजय मिळवला होता. १९४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव १६२ धावांवर आटोपला होता. या विजयासह इंग्लंडने ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. त्या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या सॅम कुरानने पहिल्या डावात भारतीय संघाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले होते. त्यामुळे अशा परिस्थितीत अर्जुन तेंडुलकरसारख्या उमेदीच्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाच्या गोलंदाजीवर भारतीय संघाला सराव करायला लावले जात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे अर्जुन चर्चेत होता.