सुहिता थत्ते suhita.thatte@gmail.com

‘‘वर्तमान आणि भूतकाळाची गुंफण करताना राधाचं त्यातलं असणं-नसणं.. असून नसणं.. हे सगळं उभं करणं, स्वत:साठी आणि प्रेक्षकांसाठी.. हे मोठं आव्हान होतं माझ्यासाठी. तिचं भूतकाळातल्या प्रसंगात भावनिक पातळीवर गुंतलेलं वागणं आणि वर्तमानात तटस्थपणे भाष्य करत राहाणं.. ही मानसिक, भावनिक आंदोलनं प्रेक्षकांपर्यंत पोचवणं हा प्रवास माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता. ‘राधा वजा रानडे’ मला करायला मिळालं. मी कृतज्ञ आहे, चेतन दातारची, सत्यदेव दुबेजींची, ‘आविष्कार’ची!’’

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sandy Irvine 100 years later
Sandy Irvine remains found:एव्हरेस्ट १९२४ सालीच सर झाला होता का? अर्विनचे सापडलेले अवशेष नेमकं काय सांगतात?
During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
book review Navi Pidhi Navya Vata book by Prakash Amte
पुढच्या पिढीची कर्तबगारी!
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड

पोटात काहीतरी होतंय. धडधडतंय – गडबड – चला चला सगळे तयार! सेकंड बेल.. सगळे विंगेत या चला. एनर्जी सर्कल.. बापरे खूप टेन्शन.. चेतन सूचना देतोय.. आपण चांगली तालीम केली आहे. ‘हाऊसफुल्ल’ शो आहे. दुबेजी असतील.. शांतपणे.. वगैरे वगैरे.. मला काही ऐकू येईनासं झालं.. एका क्षणाला मी बंद पडले. तिसरी घंटा झाली. ब्लॅकआऊटमध्ये मी स्टेजवर ठेवलेल्या दिवाणावर जाऊन झोपले. माझ्या अंगावर एक चादर घातली गेली. अनाऊन्समेंट झाली आणि रंगमंचावरच्या अंधुक प्रकाशात माणसं दिसायला लागली प्रेक्षकांना. प्रत्येक जण दबक्या आवाजात बोलत होता. माझ्या पायाशी येऊन नमस्कार करत होता. शेवटच्या माणसाने पायाला हात लावला. ब्लॅकआऊट.. चौथी बेल झाली. मी उठले आणि अपस्टेजची जी फोटोफ्रेम लावली होती आणि खुर्च्या ठेवल्या होत्या त्यातल्या मधल्या खुर्चीवर जाऊन बसले. लाईट आला आणि प्रयोगाला सुरुवात झाली. ‘‘हे आमचं कुटुंब. रानडे कुटुंब. इथे उजव्या हाताला बसला आहे तो माझा मोठा मुलगा उदय..’’

बापरे! १९ वर्षांपूर्वीचा हा पहिला प्रयोग ‘राधा वजा रानडे’ या नाटकाचा, ‘पृथ्वी फेस्टिवल १९९९’. मी राधा रानडे म्हणून कशी उभी राहिले? इथवर कशी पोचले? चेतनला (चेतन दातार) मी खूप चिडवत असे, तुझी ‘ड्रीम कास्ट’ स्वप्नातच राहिली आणि तुझ्या नशिबी मी आले वगैरे. आणि माझ्या नशिबी आली राधा! मला लॉटरीच लागली. या नाटकाचे दोन टप्प्यांत मिळून दहा वर्षांच्या अंतराने शंभर प्रयोग केले आम्ही. १९९९ मध्ये आणि पुढे चेतन गेल्यानंतर २००९ मध्ये.

बहुतेक ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत तालमी सुरू झाल्या असाव्यात, वाचन सुरू झालं. सगळे कलाकार आणि पात्रं हळूहळू जमायला लागले. मी राधा वाचत होते. मुळात वाणी शुद्ध होती आणि आधी दुबेजींसारख्या माणसाबरोबर काम केलं होतं. त्यामुळे त्यावर फार काम करावं लागलं नाही, पण दुबेजींची, त्यांच्याच चेला असलेला चेतन, त्याची ही पद्धत, मुख्यत: भाषेवर आणि उच्चारणावर काम करण्याची. त्यामुळे सर्वसाधारणपणे मराठी नाटकांमध्ये वाक्यांच्या चढउतारावर ‘स्ट्रेस’च्या जागांवर जसा भर दिला जातो त्यापेक्षा वेगळी. सुरुवातीला चढउतार नकोतच, सपाट वाचा असा आग्रह. सपाट वाचत राहा, यांत्रिकपणे (काहीशा) शब्द मनात उमटू देत. घोळू देत. ‘लेट देम रेझोनेट इन युवर माइंड’ आणि मग तुम्हाला वेगळे, मुद्दाम चढउतार, आघात यांची जरुरच भासत नाही असा विचार आणि विश्वास! हे सांगताना सोपं वाटतं पण ते आघात आणि चढउतार इतके अंगवळणी पडलेले असतात की ‘अनक्लीन’ करणं जिकिरीचं होऊन बसतं. सुरुवातीला त्यासाठी झगडा स्वत:शीच. हळूहळू सगळ्यांना त्याची सवय व्हायला लागली. नाटकात दहा पात्रं, प्रत्येकाचा आपला झगडा स्वत:शी आणि आपल्या वाटय़ाला आलेल्या भूमिकेशी.

मी राधा होते. ही राधा सामाजिक कार्यकर्ती – कर्तव्यपूर्तीसाठी धडपडणारी.. स्वत:त स्वत:च्या स्वतंत्र विचारात रमणारी. तत्त्वज्ञानात रस असलेली, आध्यात्मिक प्रगती, आध्यात्मिक दृष्टिकोन असलेली. स्वत:च्या आयुष्याकडे आणि कुटुंबाकडे तटस्थपणे पाहू शकणारी तरीही कुटुंबाचा भावनिक आधार असणारी कर्तबगार बाई. आता हे सगळं मला कसं जमणार! मुळात समजणार! कारण इतकी स्पष्टता त्यावेळी तरी मला नव्हती, राधाबद्दल! मग एक दिवस चेतन म्हणाला, ‘उद्या सकाळी आपल्याला कुठेतरी जायचं आहे लवकर..’ सहा-साडेसहा वाजता सकाळी निघालो. एका इमारतीतल्या एका घरात शिरलो.. शांतता! काही फिरंगी, काही देशी मंडळी एका खोलीत दाटीवाटीने बसलेली. जरा वेळाने पांढऱ्याशुभ्र कपडय़ातले एक गृहस्थ येऊन बसले. हे ‘बालसेकर’ – निसर्गदत्त महाराजांचे शिष्य. ते शांतपणे बोलत होते, मला फारसा अर्थबोध झालेला आठवत नाही. मी फक्त ते वातावरण, तो शांत आवाज टिपत बसले. अशा आणखी एक-दोन भेटी झाल्या. कळत नकळत त्यांचा परिणाम झाला असावा. कळून समजून नसावा.

तालमी होत होत्या. दुबेजींसारखीच चेतनचीही पद्धत. नाटकात दहा जण असतील तर त्यापैकी दोन जुनी झाडं धरायची आणि त्यांना सगळ्यांसमोर झोडपायचं, जेणेकरून मंडळी धाकात राहतील अशी अपेक्षा. अनेकांचा या पद्धतीला आक्षेप, पण कशी कोण जाणे मंडळी धाकात तर राहायचीच पण उत्तम कामंही करायची. गंमत म्हणून एक किस्सा सांगते – नाटक चर्चानाटय़ प्रकारचं, एका सीनमध्ये दहापैकी आठ पात्रं बसून चर्चा करत असतात, एकमेकांशी तावातावाने बोलत असतात – त्यात मोठा मुलगा उदय आणि त्याची बायको प्रिया बोलत असताना, (उदयची भूमिका चेतनचा भाऊ आशुतोष दातार करत असे आणि त्याच्या बायकोचं, प्रियाचं काम राजश्री टोपे ही नवीन मुलगी करत असे) त्यात आशुतोषकडून एक ‘क्यू’चं वाक्य दिलं गेलं नाही आणि राजश्री गडबडली. त्यावर चेतन भडकला, त्यानं आशुतोषला एक जबरदस्त शिवी हासडली आईवरून. आम्ही असं ऐकायला निर्ढावलेले, सीन पुढे सरकला आणि पुढची चार वाक्य बोलल्यानंतर रडण्याचा आवाज यायला लागला. मी डाऊन स्टेज बसलेली, माझ्या मागे उदय/आशुतोष आणि त्याच्यामागे उभी असलेली प्रिया/राजश्री. ती रडायला लागली. म्हणाली, ‘‘तू त्याला आईवरून शिवी दिलीस म्हणजे स्वत:च्या आईबद्दल तू असं कसं बोलू शकतोस!’’ यावर आम्ही बाकी सगळेच लोटपोट हसलो.. चेतन म्हणाला, ‘‘झाला तालमीचा सत्यानाश?’’ आणि निघून गेला, पण त्यापुढे अशाप्रकारे कोणीच ‘क्यू’ चुकवला नाही हे खरं!

या नाटकाची मांडणीच वेगळी होती – नाटक सुरू होताना मी सुरुवातीला वर्णन केलेला प्रसंग, आईचं पार्थिव समोर असलेला, पहिल्या प्रयोगानंतर लगेचच रद्द झाला. दुबेजी म्हणाले, पहिल्या प्रसंगाचा, दृश्याचा परिणाम इतका जबरदस्त असल्यामुळे पुढचं नाटक त्याच्या पुढे कुठे जाणार? नाटक सुरुवातीकडून शेवटाकडे चढत्या भाजणीत परिणामकारक झालेलं चांगलं.. मध्यंतराजवळ उत्सुकता निर्माण व्हावी. पाठोपाठ असलेल्या दुसऱ्या प्रयोगात ते दृश्य रद्द झालं ते झालंच. नाटक आईच्या मृत्यूनंतर एका वर्षांने म्हणजे राधाच्या श्राद्धाच्या दिवशी सुरू होतं. त्यात चर्चा श्राद्ध करावं की नाही पासून.. ते राधाला मान्य नसूनही. श्राद्ध हे गेलेल्या माणसाइतकंच मागे राहिलेल्या माणसांसाठीही असतं म्हणून केलं जातं. तीन मुलं उदय, सारंग आणि धनंजय आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या आव्हानांना सामोरी जाणारी. हरि रानडे, राधाचा नवरा. दत्तू नात्यानं राधाचा दीर पण तिचा जिवलग सखा, इतका की मुलांना शंका यावी राधा आणि काका यांचं विशेष नातं होतं का?

ही सगळी पात्रं राधाच्या श्राद्धाच्या निमित्ताने भेटलेली असली तरी सकाळी श्राद्धाचा धार्मिक विधी झाल्यानंतर संध्याकाळी ‘हर्षयति, उल्हासयति आनंदति’ म्हणून पेले उंचावतात आणि आपापल्या आयुष्याबद्दल, आपसातल्या नात्यांबद्दल बोलतात. या सगळ्यांच्या मधून राधा वावरत राहाते आणि भाष्य करत राहाते. हे घडतं वर्तमानात आणि त्या अनुषंगाने भूतकाळातले प्रसंगही समोर येत राहतात.. ही वर्तमान आणि भूतकाळाची गुंफण करताना राधाचं त्यातलं असणं-नसणं.. असून नसणं.. हे सगळं उभं करणं, स्वत:साठी आणि प्रेक्षकांसाठी, हे मोठं आव्हान होतं माझ्यासाठी. अर्थात मी आधी सांगितलं तसं हे सगळं मला आता समजतंय किंवा समजल्यासारखं वाटतंय. तिचं भूतकाळातल्या प्रसंगात भावनिक पातळीवर गुंतलेलं वागणं आणि वर्तमानात तटस्थपणे भाष्य करत राहणं.. त्यातही सारंगची वाताहत होताना तिची होणारी तडफड, आयेशा (सारंगची सायको थेरपिस्ट बायको) बद्दल वाटणारी ममता-सहानुभूती. धनंजयचा आध्यात्मिक प्रवास आणि त्या प्रवासात त्याला भेटलेली सहप्रवासी चंद्रावली आणि धनंजयच्या मनातलं द्वंद्व. जेनेटिक इंजिनीअिरग – स्वामीजी – चंद्रावली आणि त्याचं काकांबद्दल प्रेम. त्यातूनच धाडसाने काकांना विचारलेला प्रश्न ‘‘काका मी तुमचा आहे?’’ या सगळ्या प्रसंगांना सामोरं जाताना राधाचा रानडय़ांवरचा, त्यांच्या आयुष्य जगण्याच्या पद्धतीवरचा राग आणि त्यातून आलेला काहीसा तटस्थपणा. तिचं दत्तूला विचारणं, त्याला आव्हान देणं, त्याच्या गांधीवादी वागण्याबद्दलचा आदर, पण तरीही त्यानं राधावरचं प्रेम व्यक्त न करणं आणि तिला भावाशी लग्न करण्यासाठी प्रवृत्त करणं याबद्दलची खंत व्यक्त करणं.. ते व्यक्त करण्यासाठी दतूला पत्र लिहिणं, ते पत्र.. धनंजयला वाचायला देणं – पुढे राधानेच ते प्रश्न दत्तूला विचारणं.. ही मानसिक, भावनिक आंदोलनं प्रेक्षकांपर्यंत पोचवणं हा प्रवास माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता.

नाटकाच्या पहिल्या प्रयोगापर्यंत हा प्रवास एका शिस्तीत होत असतो. दिग्दर्शकाच्या मदतीनं तो तुम्हाला डिवचत राहतो. विचार करायला भाग पाडतो. चेतन तर सतत सांगत असे विधान (स्टेटमेंट) केल्यासारखं बोलू नको. प्रश्न पडताहेत ना मग तसं बोल. नाटकातलं संभाषण बोलल्यासारखं, पाठ केल्यासारखं नको. समोरासमोर पात्रांशी आणि प्रेक्षकांशी संवाद कर आणि दुबेजींचं आवडतं पालुपद, ‘नवऱ्याशी भांडतेस त्या आवाजात बोल म्हणजे खणखणीत, खऱ्या आवाजात, खोटा मंजूळ आवाज न काढता!’ हे सगळं मी करत होते दिग्दर्शकाच्या सहकलाकारांच्या मदतीनं. पण खरा प्रवास पुढेच असतो. प्रत्येक प्रयोग नवीन काही देत असतो. त्यात प्रायोगिक नाटक म्हणजे सातत्याने रोजच्या रोज प्रयोग नसतात. क्वचितच ओळीने प्रयोग करायला मिळतात. प्रत्येक दोन प्रयोगांच्या मध्ये तुम्ही इतर कामं करत असता. स्वत:च्या आयुष्यातली आव्हानं पेलत असता, पण मला वाटतं कणाकणानं, चहुअंगानी तुमच्या व्यक्तिरेखेसाठी काही गोळा करत असता आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करत असता.

दुबेजी किंवा चेतन यांनी नाटकं करत असतानाच या क्षेत्रातली सत्य परिस्थिती स्वीकारली होती. सध्याच्या परिस्थितीत नटांना आपल्या उदरनिर्वाहासाठी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करणं अपरिहार्य होऊ लागलं असल्याची जाणीव त्यांना दोघांनाही असल्यामुळे कदाचित, डबल कास्टिंगचा पायंडा त्यांनी पाडला होता – अपरिहार्यपणे राधासाठीही डबल कास्टिंग झालं.. मी, राधा ‘माझीच’ असं समजत होते. ज्यामुळे मला त्याचा त्रास झाला सुरुवातीला.. असुरक्षिततेची भावना असायची मनात, ‘तिने’ माझ्यापेक्षा चांगलं काम केलं तर? दिग्दर्शकाला ‘तिचं’ काम जास्त पटलं तर? हे आणि असे विचार यायचे. कधी त्याचा परिणाम माझ्या एकाग्रतेवर, कामावर व्हायचा, पण आता मागे वळून पाहताना असं नक्की वाटतंय की कळत नकळत, एकमेकांची कामं जर पाहिली तर काही बारकावे, एखादं वाक्य बोलण्याची लकब, शब्दावरचा विशिष्ट आघात, परस्परांचं त्या भूमिकेत वावरणं या गोष्टींचा फायदा नक्कीच होऊ शकतो आणि असं जरुरी नसतंच ना की एक भूमिका एकाच पद्धतीने केली जावी. अशा ज्या दोघी माझ्या ‘सवती’(?) रमा जोशी आणि धनश्री करमरकर होत्या. त्यांनीही राधाचे प्रयोग केले, त्याही राधा बनल्या. मला त्यांच्याकडून कितीतरी गोष्टी शिकायला मिळाल्या त्याबद्दल मी त्यांची ऋ णी आहे. मनातल्या मनात कधी मला वाईटही वाटलं. पण मला वाटतं तो या सहप्रवासाचा भाग होता. माझ्या सगळ्या सहकलाकारांनी खूप मदत केली मला.

आणखी एक गोष्ट नमूद करायलाच हवी, एखादी भूमिका करताना वाचिक अभिनय – शारीर अभिनय यांच्या इतक्याच महत्त्वाच्या इतरही गोष्टी असतात, तुम्ही कपडे काय घालता हे ही महत्त्वाचंच ठरतं – राधा म्हटलं तर भूत! मग तिने पांढरी साडी नेसावी? कारण ती सामाजिक कार्यकर्तीही आहे. की काळी? आणि काळी साडी ठरली. त्याला केशरी रंगाचे काठ! तालमीत पांढरी साडीही नेसून पाहिली, पण त्याचा दृष्परिणाम आणि काळ्या साडीचा दृश्य परिणाम लक्षात घेऊन काळीच नक्की केली.

चेतनची आणखी एक खासियत होती पाश्र्वसंगीताची निवड. ‘राधा वजा रानडे’मध्ये एका प्रसंगात तीनही मुलं एकमेकांशी संवाद साधतात, भांडतात, एकमेकांना चिडवतात. पण प्रसंगाची सुरुवात राधाच्या स्वगताने होते. आणि राधा स्टेजवर सभोवार फिरू लागते.. तिचा वावर मुलांच्या अवती-भवती. या प्रसंगाच्या तालमी करतच होतो आम्ही, पण जेव्हा तिथे ‘नीज माझ्या नंदलाला’ हे गाणं वाजायला लागलं तेव्हा त्या प्रसंगाला एक वेगळंच परिमाण मिळालं.. धनंजय आणि काकाच्या प्रसंगाच्या सुरुवातीला एक ‘अजान’ ऐकू येते आणि आपोआप अधोरेखित होतं की धनंजय रात्रभर घराबाहेर राहून पहाटे परत आला आहे.

माझ्या आणि ‘राधा’च्या नात्याला आमच्या प्रवासाला या सगळ्या गोष्टींची अपरंपार मदत झाली म्हणून हा ऊहापोह! म्हणूनच म्हणते, मला ‘राधा’ मिळाली म्हणजे लॉटरी लागली! त्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. चेतनची,  दुबेजींची, आविष्कारची. आणि आशुतोष, मंगेश भिडे, कपिल मोपटकर, प्रसाद आठल्ये, क्विनी डिसोजा, अनुजा लोकरे, राजश्री टोपे, रमा, धनश्री, चारू, मंगेश, गीता, नंदिता, वर्षां, प्रशांत, इरावती, सोनल, विवेक, सुनील, रवि रसिक सीताराम – काकडे काका यांच्याबद्दल कृतज्ञता!

chaturang@expressindia.com