सर्वच उत्सवांप्रमाणे यंदा स्वातंत्र्यदिनावरही करोनाचे सावट असल्याने अगदी साध्या पद्धतीने ७४ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. मात्र सोशल नेटवर्किंगवर नेहमीप्रमाणेच अगदी उत्साहामध्ये सेलिब्रिटींपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत आणि सर्व सामान्यांपासून ते कंपन्यांपर्यंत सर्वांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या सर्व शुभेच्छांच्या गर्दीमध्ये एक स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाल्याचे दिसून आलं. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असणाऱ्या अजित डोवाल यांच्या नावाने चालवण्यात येणाऱ्या पेजवरुन इजिप्तचा झेंडा पोस्ट करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. मात्र हा स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाल्याने डोवाल यांना भारताचा तिरंगा आणि इजिप्तच्या झेंड्यामध्ये फरक करत नाही का असा प्रश्न विचारत अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खालील फोटो हा अशाच काही टीका करणाऱ्या पोस्टपैकी एक आहे. या फोटोमध्ये व्हायरल झालेले स्क्रीनशॉर्ट शेअर करत, “हे आहेत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेचे आधीचे गुप्तहेर मिस्टर अजित कुमार डोवाल. ते आज इजिप्तला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. यावरुनच भारतीय सुरक्षायंत्रणांचा दर्जा कळून येतो,” अशी टीका एका युझरने केली होती.

मात्र इंडिया टुडेच्या अ‍ॅण्टी फेक न्यूज वॉर रुमने केलेल्या फॅक्ट चेकसंदर्भातील तपासणीमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त इजिप्तचा राष्ट्रीय ध्वज पोस्ट करत देण्यात आलेल्या शुभेच्छा या अजित डोवाल यांच्या फॅन पेजवरील असल्याची माहिती समोर आली आहे. डोवाल यांचे एकही अधिकृत सोशल नेटवर्किंग हॅण्डल नाहीय. मात्र त्यांच्या फॅन पेजवरुन केलेल्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. फेसबुकवरील व्हायरल पोस्ट पाहण्यासाठी तुम्ही येथे क्लिक करु शकता.

फेसबुकवर ‘Ajit Doval’ असं सर्ज केलं असता एकही व्हेरिफाइड पेज सापडत नाही. मात्र त्यांच्या नावाने अनेक फॅन पेजेस आहेत. त्यांची लिस्ट तुम्ही येथे पाहू शकता. या फॅन पेजेसपैकी ज्या पेजवरुन ही व्हायरल झालेली इजिप्तचा झेंडा असणारी पोस्ट अपलोड करण्यात आली आहे ते पेज १६ जुलै २०१९ रोजी तयार करण्यात आलं आहे. या पेजला ९ लाख ६० हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत. या पेजच्या डिस्क्रीप्शनमध्ये हे सुपर स्पायचे फॅन पेज आहे असं हिंदींमध्ये लिहिण्यात आलं आहे.

या पेजवरील माहितीनुसार या पेजची मालकी Agyey Solutions LLP या कंपनीकडे आहे. ही कंपनी पुण्यातील आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असणारे डोवाल यांना सुपर स्पाय म्हणून ओळखले जाते. अगदी एअर स्ट्राइल असो, सर्जिकल स्ट्राइक असो किंवा कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे काम असो डोवाल यांनी अनेकदा आपले कौशल्य पणाला लावल्याचे पहायला मिळालं आहे. भारत चीनमध्ये लडाखमध्ये झालेल्या संघर्षानंतरही डोवाल यांनी शांततेसाठी महत्वाची भूमिका बजावली होती. असं असलं तरी डोवाल यांचं कोणतही अधिकृत सोशल मिडिया अकाऊंट नसल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडूनही स्पष्ट करण्यात आलं आहे.

त्यामुळेच डोवाल यांनी इजिप्तचा झेंडा पोस्ट करत भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्याचा दावा खोटा असल्याचे सिद्ध होत आहे. व्हायरल होणार पोस्ट एक फॅन पेजने केली असून डोवाल यांचे कोणतेही अधिकृत अकाऊंट नसल्याने त्यांचा या पोस्टशी काहीही संबंध नसल्याचे सिद्ध होत आहे.