‘फास्टर फेणे’ सिनेमाच्या नावावरुन आणि ट्रेलरवरुनच सिनेमाचा विषय काय असणार हे साऱ्यांनाच कळते. पण सिनेमाचा विषय कळणं वेगळं आणि सिनेमा प्रत्यक्ष पाहताना तो उलगडत जाणं त्याहून वेगळं. ‘फास्टर फेणे’ कोण आहे आणि तो काय करतो हे जर जाणून घ्यायचं असेल तर नुसता विषय माहित असून चालणार नाही त्यासाठी तो सिनेमा पाहणंही तेवढंच गरजेचं आहे. भागवतांच्या फास्टर फेणेने एकेकाळी आबालवृद्धांच्या मनावर गारुड केले होते. आजही अनेकांकडे फास्टर फेणेची पुस्तकं संग्रही आहेत. भागवतांच्या लेखणीतील ‘फास्टर फेणे’ आणि आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘फास्टर फेणे’ याच्यात फक्त व्यक्तिरेखेमध्ये साम्य आहे. क्षितीज पटवर्धन आणि आदित्य सरपोतदार यांनी त्यांच्या लेखणीतून भागवतांच्या फेणेला अगदी नव्या स्वरुपात लोकांसमोर आणले आहे.
सिनेमाचा नायक बनेश फेणे (अमेय वाघ) हा फार हुशार, तीक्ष्ण बुद्धीचा आणि प्रसंगी विनोदीही आहे. बनेश कोल्हापुरहून पुण्यात वैद्यकीय परीक्षेला आला असता त्याच्यासमोर आत्महत्येची घटना घडते. मुळात हेरगिरी करण्याचाच स्वभाव असल्यामुळे तो स्वतःहून या घटनेचा मागोवा घेतो. त्याचा या घटनेच्या मुळाशी जातानाचा प्रवास या सिनेमात दाखवण्यात आला आहे. जस जसा फेणे घटनेच्या मुळाशी जातो तसा तो अधिक संकटात सापडत जातो. या सगळ्यात त्याच्या जवळच्या माणसांवर केले गेलेले हल्ले त्याला घटनेच्या मुळापर्यंत पोहोचू देतात की नाही हे पाहण्यासाठी एकदा तरी हा सिनेमा पाहावा लागेल.
मराठीमध्ये रहस्यपटांची फारशी निर्मिती होत नाही. त्यात रितेश देशमुखने रहस्यपटासाठी घेतलेला पुढाकार वाखाणण्याजोगा आहे. सिनेमाची सुरूवात तुम्हाला खिळवून ठेवणारी आहे. पण जस जसा सिनेमा पुढे जातो तो थोडा रटाळ वाटू लागतो. रहस्यपट म्हटले की तुम्हाला ती कथा खुर्चीला खिळवून ठेवणारी हवी पण ‘फास्टर फेणे’ पाहताना असे होतेच असे नाही. सिनेमाचे संकलन अजून नेमकेपणाने करता आले असते. एक- दोनदा का होईना तुमची नजर मोबाइलकडे जातेच. पण तुमची मोबाइलमध्ये गेलेली नजर पुन्हा स्क्रीनकडे ओढण्याचे काम एकमेव व्यक्तिरेखा करते ती म्हणजे आप्पा अर्थात गिरीश कुलकर्णी. सिनेमात अमेयचे काम हे नक्कीच कौतुकास्पद असले तरी संपूर्ण सिनेमा हा जणू गिरीश कुलकर्णीसाठीच तयार केला असावा असे वाटते. सिनेमाच्या सुरूवातीपासून ते शेवटापर्यंत गिरीशवरचे लक्ष हटत नाही. अमेय आणि गिरीश यांच्यातील जुगलबंदी ही सिनेमाची जमेची बाजू आहे.
खलनायक जेवढा ताकदीचा तेवढाच सिनेमा रंजक होतो. ‘फास्टर फेणे’ला मिळालेला खलनायक हा तेवढ्याच ताकदीचा असल्याने सिनेमागृहातून बाहेर पडताना ते गिरीशच्या अभिनयाच्या पुन्हा प्रेमात पडतील यात शंका नाही. सिनेमाची संपूर्ण कथा ही फेणे आणि आप्पा यांच्याभोवती फिरणारी असली तरी दिलीप प्रभावळकर, पर्ण पेठे आणि बालकलाकार शुभम मोरे यांनीही चांगले काम केले आहे.
ट्रॉय- आरिफ यांचे बॅकग्राऊंड आणि मिलिंद जोग यांची सिनेमॅटोग्राफी या दोन्ही गोष्टी सिनेमाची कथा पुढे नेण्यास महत्वाची भूमिका बजावतात. मराठीत खूप वर्षांनी एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा आलाय. त्यामुळे ‘फास्टर फेणे’ नेमका आहे तरी कोण हे जाणून घेण्यासाठी एकदा तरी हा सिनेमा पाहावाच.
मधुरा नेरुरकर
madhura.nerurkar@loksatta.com