आजपासून रशियामध्ये फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर फुटबॉलवेड्या केरळने महिनाभर आधीपासूनच जोरदार तयारी सुरु केली होती. सर्व गावांमध्ये आणि शहरांमध्ये स्थानिक फुटबॉल क्लबने विविध देशांना पाठिंबा देणारे फलक लावले आहेत. कुठे ब्राझीलचा फलक आहे, तर कुठे अर्जेंटिनाच्या जर्सीचे चित्र आहे. कुठे भिंतीवर स्पेनचा ध्वज रंगवला आहे, तर कुठे पोर्तुगाल आणि रोनाल्डोचे टी शर्ट घालून फुटबॉलचाहते महिन्याभरापासून फिरत आहेत. मात्र सर्व गोष्टींमध्ये केरळच्या एका गावात मात्र एका वेगळ्याच देशाला पाठिंबा दिला जात असल्याचे दिसत आहे.
केरळमधील पलक्कड आणि मनपूरम या दोन जिल्ह्यांच्या वेशीवर असलेल्या एका गावात रहिवासी सौदी अरेबिया हा देशाच्या फुटबॉल संघाला पाठिंबा देत आहेत. २९ वर्षीय मुनीर वेलेंगरा याने एडतनाटुकारा (Edathanattukara) या गावात एक मोठा फलक लावला आहे. या फलकातून हे रहिवासी सौदी अरेबिया फुटबॉल संघाला पाठिंबा देत आहेत. ‘आम्हाला उदरनिर्वाह करण्यासाठी ज्या देशाने मदत केली आहे, त्या देशावर आमचे नेहमीच प्रेम असेल’, असे मुनीरने सांगितले आहे.
आमच्या गावातील बहुसंख्य लोक हे उद्योगधंद्याच्या आणि नोकरीच्या निमित्ताने बाहेर देशात स्थायिक आहेत. या लोकांपैकी ८० टक्के ग्रामस्थांना सौदी अरेबिया या देशात रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. इतकेच नव्हे तर, या गावातील कोणतीही चांगली आणि विकासात्मक गोष्ट ही आम्हाला सौदी अरेबियातून रोजगाराच्या मार्फत आलेल्या पैशातून घडते, असेही मुनीर म्हणाला. त्यामुळे जी भूमी आम्हाला उदरनिर्वाहाची सोय करून देते, त्यांना पाठिंबा देणे आणि त्यांचे समर्थन करणे हे स्वाभाविकच आहे, असेही मुनीरने सांगितले.
सौदी अरेबिया देशात काही सुपरमार्केट आणि पेट्रोल पंप हे मुनीरच्या कुटुंबातील काही लोकांच्या मालकीचे आहेत. त्यामुळे मुनीरचे संपूर्ण कुटुंबही सौदी अरेबियाच्या चांगल्या कामगिरीसाठी प्रार्थना करत आहेत.