FIFA World Cup 2018 POR vs SPA : फिफा विश्वचषकात आज तीन सामने खेळले जाणार आहेत. त्यापैकी पहिला सामना हा इजिप्त विरुद्ध उरुग्वे असा होणार असून भारतीय वेळेनुसार ५.३० वाजता हा सामना सुरु होणार आहे. तर दुसरा सामना मोरोक्को आणि इराण या दोन संघांमध्ये ८.३० वाजता होणार आहे. मात्र या दोनही सामान्यांपेक्षा फुटबॉलप्रेमींचे सर्वाधिक लक्ष असणार आहे, ते पोर्तुगाल विरुद्ध स्पेन या सामन्याकडे. या सामन्यात पोर्तुगालची मदार ही ख्रिस्तीयानो रोनाल्डोवर असणार आहे. मात्र स्पेनकडेही पाच असे फुटबॉलपटू आहेत, जे त्यांना सामना जिंकवून देऊ शकतात.
१. दिएगो कोस्टा – कोस्टाने विविध स्पर्धांमध्ये एकूण २३ सामने खेळले आहे. त्यात त्याने ७ गोल केले असून ४ गोलमध्ये सहाय्यक खेळाडूची भूमिका पार पडली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने एकूण १८ सामने खेळले आहेत. त्यात त्यातही त्याने ७ गोल केले आहेत. दरम्यान, कोस्टा हा काही काळ वादग्रस्त खेळाडू ठरला होता.
२. सर्गीओ रॅमोस – हा स्पेनचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याबरोबरच तो संघाचा कर्णधार आहे. त्याने आजपर्यंत एकूण १३ विश्वचषक सामने खेळले आहेत. सलग तीन ‘युइएफए’चे हंगाम त्यांनी जिंकले असून तो आपल्या संघाचे विश्वासाने नेतृत्व करू शकेल.
३. डेव्हिड गिया – हा स्पेनचा गोलकिपर आहे. गेल्या काही वर्षात डेव्हिडने फुटबॉल विश्वात चांगली कामगिरी केली आहे. मँचेस्टर युनायटेड क्लबकडून खेळताना त्याने २०१७-१८ प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत ‘गोल्डन ग्लोव्ह’ म्हणजेच सर्वोकृष्ट गोलकिपर पुरस्कार कमावला आहे. त्याने आतापर्यंत स्पेनकडून २९ सामने खेळले आहेत. आणि आजच्या सामन्यातून तो आपले विश्वचषकात पदार्पण करणार आहे.
४. एस्को – एस्को हा एक प्रतिभावान फुटबॉलपटू आहे. या स्पर्धेतील स्पेनच्या कामगिरीत तो महत्वाची भूमिका बजावेल, असा स्पेनला विश्वास आहे. रियल माद्रिद क्लबकडून खेळताना त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे आपल्या राष्ट्रीय संघाकडून खेळताना तो महत्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास आहे. रॅमॉसप्रमाणेच एस्कोदेखील ‘युइएफए’च्या विजयी हंगामानंतर ही स्पर्धा खेळण्यास आला आहे. गेल्या हंगामात त्याने ९ गोल केले आणि ८ गोलमध्ये श्य्य्क खेळाडूची भूमिका पार पडली.
५. आंद्रेस इनिएस्टा – रॅमोस वगळता इनिएस्टा हा याआधी विश्वचषक स्पर्धा खेळलेला एकमेव खेळाडू आहे. आता त्याचे वय ३४ वर्षे असून त्याचा हा शेवटचा विश्वचषक असणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या स्पर्धेत तो आपला सर्वोत्तम खेळ खेळेल. मिडफिल्डर म्हणून इनिएस्टाची कारकीर्द उल्लेखनीय आहे. त्याने एकूण ३७ मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यातील ५ स्पर्धा त्याने स्पेनचे प्रतिनिधित्व करताना जिंकल्या आहेत.