प्रसिध्द चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत, अमेरिकेतल्या बी.एम.एम. च्या १६ व्या अधिवेशनाला आज सुरुवात झाली. परदेशात राहणारी मराठी मंडळी इतक्या मोठ्या संख्येने आवर्जून एकत्र येऊन आपल्या भाषेच्या जपणुकीसाठी प्रयत्न करत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य आणि आनंद व्यक्त केला. “मराठी माणसांनी आपल्या मुलांना मराठी शिकवावीच पण इंग्रजीचा तर आग्रहच धरला पाहिजे पाहिजे. कारण त्यामुळेच तुम्ही सगळेजण आज इथे आहात. या बाबतीत महाराष्ट्रात थोडा गोंधळ झाला आहे. मात्र तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र येऊन जे काम करता आहात, ते कौतुकास्पद आहे,” असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. अधिवेशनाच्या या उद्घाटन सोहळ्याला भारताचे न्यूयॉर्कमधले कौन्सुल जनरल ज्ञानेश्वर मुळे, प्रॉव्हिडन्स शहराचे महापौर अँजेल टॅव्हेरास, अधिवेशनाचे प्रमुख वक्ते डॉ. बाळ फोंडके, बी.एम.एम.चे अध्यक्ष आशिष चौघुले, निमंत्रक बाळ महाले, कॉसमॉस बँकेचे संचालक जयंत शाळीग्राम आणि बी.एम.एम.चे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
प्रॉव्हिडन्स शहरात हे अधिवेशन व्हावे यासाठी आपण खास प्रयत्न केले आणि इतक्या मोठ्या संख्येने मराठी माणसे आपल्या शहरात जमा झाल्याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचं, महापौर अँजेल टॅव्हेरास यांनी सांगितलं. आपल्या शहरात बी.एम.एम. अधिवेशनातल्या उपस्थितांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्यात यासाठी आपण स्वतः जातीने लक्ष घालत असल्याचं त्यांनी सांगितलं. केवळ एवढं सांगून ते थांबले नाहीत तर कुणाला काही अडचण आल्यास आपल्याशी संपर्क साधणे सोपे जावे यासाठी त्यांनी खुल्या सभेत स्वतःचा मोबाईल नंबरही सर्वांना सांगून टाकला. त्यांच्या या आतिथ्यशील स्वागताने उपस्थित भारावून गेले.
उद्घाटन सोहळ्याचाच भाग म्हणून बोस्टनच्या स्थानिक कलावंतांनी ‘इये मराठीचिये नगरी’ हा कार्यक्रम सादर केला. मराठी भाषेचा इतिहास आणि प्रवास सांगणार्या या कार्यक्रमाच्या अभिनव सादरीकरणाने सर्वांची मने जिंकून घेतली. अधिवेशनातल्या या पहिल्याच कार्यक्रमाने सगळ्यांचा उत्साह अगदी शिगेला पोचला. आणि त्यानंतर दिवसभरात सादर झालेल्या अनेक वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनंतर हे अधिवेशन ‘याचि सम हे’ होणार असल्याची खात्री सर्वांना वाटू लागली आहे. कन्व्हेंशन सेंटरच्या वेगवेगळ्या सभागृहात झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच बिझनेस कॉन्फरन्स, एज्युकेटर्स समिट आणि कॉलेज कॉन्फरन्सलाही तुडुंब प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी सभागृह पूर्ण भरल्यानंतर, दर्जेदार कार्यक्रम चुकू नये यासाठी प्रेक्षकांनी जमिनीवर बसूनही कार्यक्रम पाहिले. एकाचवेळी अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम सुरु असूनही, नेटक्या आयोजनामुळे वेळापत्रकाचा जराही गोंधळ उडाला नाही.
आजच्या दिवसभरात – ‘फॅमिली ड्रामा’ हे मराठी नाटक, ‘संगीत वस्त्रहरण’ या गाजलेल्या मराठी नाटकाचा शिकागोच्या मराठी मंडळींनी सादर केलेला प्रयोग, ‘चाहूल’ हे कॅलिफोर्नियाच्या कलाकारांनी सादर केलेलं नाटक, खास लहान मुलांसाठी आयोजित केलेले अनेक कार्यक्रम, ‘स्वरगंगेच्या काठावरती’ हा मीना नेरुरकरांनी सादर केलेला प्रयोग – विशेष गाजले. या अधिवेशनानिमित्त पहिल्यांदाच आयोजित होत असलेल्या ‘एज्युकेटर्स समिट’च्या पहिल्या दिवशी देशी-परदेशी शिक्षणतज्ज्ञांनी गर्दी केली होती. एकूण पाच दिवस, म्हणजे अधिवेशन संपल्यानंतरही पुढचे दोन दिवस ही परिषद सुरु राहणार आहे.
इथे जमलेल्या जवळपास सव्वातीन हजार मंडळींना एकत्र बसून वेळेवर संपूर्णपणे मराठी पध्दतीचं भोजन मिळेल अशी व्यवस्था आयोजकांनी केली आहे. त्यामुळेही उपस्थितांच्या आनंदात आणि समाधानात भर पडली. यावर कडी म्हणजे उपस्थितांना आपसूक घडणार्या सेलिब्रिटींच्या भेटीगाठी. अधिवेशनाला आलेले महेश मांजरेकर, पद्मजा फेणाणी, सुकन्या कुलकर्णी यांच्यासह सर्वच मान्यवर अगदी सहजी उपस्थितांमधे मिसळत आहेत. या सर्वामुळे हे अधिवेशन उपस्थितांना वैविध्यपूर्ण अनुभव देणार यात शंका उरलेली नाही.
उद्या या अधिवेशनात – ‘सुरांच्या पलिकडले: संगीतकार अजय-अतुल’ हा विशेष कार्यक्रम, प्रमुख वक्ते डॉ. बाळ फोंडके यांचे भाषण, राहुल देशपांडे आणि त्यांच्या सहकार्यांचे ‘संगीत मानापमान’ नाटक, आणि अमेरिकेतल्या अनेक नामवंत कलाकारांचे लावणी, शास्त्रीय संगीत, स्टँड-अप कॉमेडी, एकांकिका या प्रकारचे कार्यक्रम सादर होणार आहेत.
प्रॉव्हिडन्स शहर ‘मराठी’मय
प्रसिध्द चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत, अमेरिकेतल्या बी.एम.एम. च्या १६ व्या अधिवेशनाला आज सुरुवात झाली. परदेशात राहणारी मराठी मंडळी इतक्या मोठ्या संख्येने आवर्जून एकत्र येऊन आपल्या भाषेच्या जपणुकीसाठी प्रयत्न करत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य आणि
First published on: 06-07-2013 at 05:08 IST
मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First day of bmm convetion