|| धवल कुलकर्णी
रात्री चालणारी बेकायदेशीर जंगल सफारी, रस्त्याच्या कडेवर इतरत्र पडलेला प्लास्टिकचा कचरा, वाळूची आणि खनिजांची जड वाहनांतून सुरू असलेली बेकायदेशीर वाहतूक आणि वाहनांच्या वेगाला बळी पडणारे पक्षी आणि सरपटणारे प्राणी. काही महिन्यांपूर्वी हे चित्र नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात्त असलेल्या कोका वन्यजीव अभयारण्यात होतं. एकूण 100.14 चौरस किलोमीटर चे कोका वन्यजीव अभयारण्य हे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर एरियामध्ये असल्यामुळे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
पण जिल्हा प्रशासनाने आणि वनविभागाने प्रयत्न करून इथे रात्रीच्या वेळेला जड वाहनांसाठी रस्ता बंद केल्यामुळे आत्ता परिस्थिती बदलू लागली आहे. भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी म. जे. प्रदीप चंद्रन यांनी आदेश काढून या वन्यजीव अधिवास आतून जाणाऱ्या तीन रस्त्यांवरच्या वाहतुकीवर आता निर्बंध घातले आहेत.
यापूर्वी २०१५ मध्ये बुलढाणा जिल्ह्यातल्या ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यामध्ये राज्य महामार्ग २४ वर रात्री १० ते सकाळी ६ दरम्यान अशीच वाहतूक बंद करण्यात आली होती कारण वाहनांच्या खाली एका प्राण्याचा बळी गेला होता. २०१८ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात विशाळगड ते आंबा हा २१ किलोमीटरचा रस्ता पावसाळ्यात साधारणपणे तीन आठवडे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.
“कोका वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र हे हाताच्या बोटाच्या प्रमाणे पसरलेलं आहे. इथे बायोटिक प्रेशर प्रचंड आहे आणि कोअर परिसराला लागून २३ ते २४ गावं आहेत. साधारणपणे पाच ते सहा रस्ते इथून जातात त्यापैकी तीन रस्ते प्रमुख आहेत म्हणजेच भंडारा ते करडी मार्गे पलाडी, भंडारा ते करडी मार्गे सालेहेटी आणि साकोली ते तुमसर राज्य महामार्ग. या वन्यजीव अभयारण्याच्या उत्तरेला वैनगंगा नदी आहे. या नदीतून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होतो. ही वाळू घेऊन जाणारे ट्रॅक्टर आणि टिप्पर हे या बेकायदेशीर वाहतुकीसाठी या रस्त्याचा वापर करतात. या रस्त्यांपैकी तुमसर साकोली रस्त्याला पर्यायी रस्ता नाही त्यामुळे इथे आम्ही जोड वाहतुकीला बंदी घातली आहे असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.
मागच्या महिन्यात जिल्हाधिकार्यांनी काढलेल्या आदेशाप्रमाणे आता भंडारा करडी व्हाया पलाडी हा १२ किमीचा रस्ता आणि भंडारा करडी व्हाया सलेहेटी हा १.५४ किमीचा रस्ता संध्याकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यावेळेस रस्ता वापर करणाऱ्या मंडळींना भंडारा करडी मार्गे धीवरवाडी रस्त्याचा वापर करता येईल मात्र या क्षेत्रातील स्थानिक गावांच्या लोकांना येण्या-जाण्यासाठी सूट देण्यात येईल.रुग्णवाहिका आणि अग्निशमन वाहने यांना या नियमातून सूट देण्यात आली आहे.
इथे कोअर मध्ये असलेल्या एका गावात गावकऱ्यांनी सुरु केलेल्या ढाब्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असत. रात्रीच्या वेळी दारु पिऊन वाहनांमधून जंगल सफारीला जात असत. कारण या भागांमध्ये बिबटे दिसतात. मात्र या प्रकारामुळे चितळ, माकड यांसारखे प्राणी आणि घुबडासारखे पक्षी चिरडले जात आणि त्यांचा मृत्यू होत असे. चिरडून मरणाऱ्या साप आणि बेडकांची तर गणतीच नव्हती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्लास्टिकचा कचरा आणि दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच सापडायचा अशी माहिती या वन खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली. मात्र हे सगळे प्रकार आता नियंत्रणात आणण्यात आले आहेत.
कोका जंगलात वाघांचा अधिवास सुद्धा आहे. इथे एक नर आणि एक मादी आणि त्यांचे तीन बछडे सुद्धा आहेत. एवढंच नाही तर या जंगलात बिबट्या, अस्वल हे प्राणीही आहेत. या प्राण्यांच्या सुरक्षेसाठी मार्च २०१९ पासून वनविभागाने या तिन्ही रस्त्यांचा अभ्यास सुरू केला. अभ्यासामध्ये या तिन्ही रस्त्यावरची वाहतूक त्याचे स्वरूप आणि पर्याय याचा विचार झाला.अशाच पद्धतीने इतर वन्यजीव अधिवासामध्ये सुद्धा हा प्रयोग होऊ शकतो. कारण जंगल हे मानवाच्या मालकीचा नाही तर हे प्राण्यांचा आहे हा मुद्दा महत्त्वाचा…