पालघरमध्ये गणेश विसर्जनादरम्यान बॅन्जो व इतर म्यूझिक सिस्टम बंद करण्यासाठी पोलिसांनी दमदाटी केल्याचा आरोप करत संतप्त गणेशभक्तांनी तब्बल दोन तास विसर्जन मिरवणुका थांबवत रस्त्यावर ठाण मांडले. अखेर दोन तासांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व स्थानिक नेत्यांनी गणेशभक्तांशी चर्चा करत त्यांना शांत केले आणि रात्री सव्वा बाराच्या सुमारास शहरात पुन्हा विसर्जनाला सुरुवात झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुधवारी सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाले. पालघरच्या श्री गणेश कुंडावर विसर्जनासाठी गणेशभक्तांची गर्दी झाली होती. पाचव्या दिवशी प्रमाणे बुधवारी देखील रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वाजवण्याची मुभा असल्याचे समजून अनेक गणेश मंडळाने आपले बेन्जो व इतर वाद्य सुरू ठेवली होती.

पालघर येथील कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने बॅन्जो बंद करण्यासाठी दमदाटी करताना बॅन्जो पथकातील तरुणांना लाथाबुक्क्यांनी तुडवले, असा आरोप गणेशभक्तांनी केला आहे. या वादादरम्यान बॅन्जोचे व डीजेचे साहित्य खाली पडल्याने संतप्त गणेश भक्तांनी सर्व मिरवणुका स्थगित केल्या. विसर्जनासाठी निघालेल्या गणेश मूर्ती रस्त्यावरच थांबल्या. यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत असल्याचे पालघर पोलिसांनी गणेश भक्तांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हाणामारी का केली, असा सवाल करीत गणेश मंडळांनी मिरवणुका थांबवून गणेश मूर्तीसह रस्त्यावर ठाण मांडून बसण्याचा निर्णय घेतला. रात्री बॅन्जो किंवा इतर वाद्य वाजवल्यास नाईलाजाने गुन्हा दाखल करावा लागेल असे सांगत पोलिसांनी शीघ्र कृती दल आणि दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केले. शेवटी पोलीस व स्थानिक नेत्यांनी गणेशभक्तांशी चर्चा करत त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. अखेर रात्री सव्वा बारानंतर पुन्हा विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh immersion 2018 seven day visarjan in palghar devotees police argument