निद्रिस्त हनुमानाची मंदिरे आपल्याला खुलताबाद, लोणार, अलाहाबाद इथे पाहायला मिळतात. पण निद्रिस्त गणेशाचे मंदिर हे एकमेवाद्वितीयच असेल. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातल्या तिसगावपासून अंदाजे १५ किलोमीटर अंतरावर आव्हाणे हे गाव आहे. गावात पूर्वी कोणी दादोबा देव नावाचे गणेशभक्त राहात होते. ते दरवर्षी मोरगावची वारी करायचे. वयोमानाप्रमाणे त्यांना वारी करणे झेपेना. तेव्हा त्यांना मोरया गोसावींचा दृष्टांत झाला की, आता त्यांनी वारी करू नये. तरीसुद्धा निस्सीम गणेशभक्त दादोबांनी आपला हट्ट सोडला नाही आणि ते वारीला निघाले. वाटेत असलेल्या ओढय़ाला मोठा पूर आला होता. मोरयाचे नाव घेऊन दादोबा त्या ओढय़ात उतरले खरे, पण पाण्याच्या त्या प्रचंड प्रवाहाबरोबर लांब वाहात गेले. वाटेत असलेल्या एका बेटावर ते थांबले असता तेव्हा त्यांना गणपतीचा दृष्टांत झाला की मीच तुझ्या गावी येतो. कालांतराने दादोबा देवांचे निधन झाले. त्यानंतर आव्हाणे गावात एक शेतकरी शेत नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ कुठल्याशा वस्तूला लागून अडला. पाहतात तो काय एक स्वयंभू गणेशमूर्ती जमिनीत होती. ती मूर्ती म्हणजेच हा निद्रिस्त गणेश होय, अशी या मूर्तीची कथा आहे. मूर्तीच्या छातीवर नांगराच्या फाळाची खूण अजूनही दिसते. प्रशस्त बांधलेल्या मंदिरातील गाभाऱ्यात जमिनीखाली दोन फुटांवर स्वयंभू गणेशमूर्ती आहे. मंदिराचे प्रांगण प्रशस्त फरसबंदी आहे. चारही बाजूंनी भिंतीलगत मोठा ओटा बांधलेला आहे. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी हे मंदिर बांधून दिले. तसेच दादोबा देवांच्या वंशजांना वतन म्हणून जमिनी दिल्या. त्यामुळे त्यांची नावे जहागीरदार भालेराव अशी पडली.
आशुतोष बापट – ashutosh.treks @gmail.com
आडवाटेवरची वारसास्थळे : पाथर्डीतील निद्रिस्त गणपती
निद्रिस्त हनुमानाची मंदिरे आपल्याला खुलताबाद, लोणार, अलाहाबाद इथे पाहायला मिळतात.
Written by आशुतोष बापट
आणखी वाचा
First published on: 27-04-2016 at 03:36 IST
Web Title: Ganesh temple in ahmednagar district