यंदाच्या सणवारात किमान दरातील सोने खरेदीची नामी संधी असली तरी परताव्याबाबत मावळत्या संवस्तराने मौल्यवान धातूबाबत निराशाजनक कामगिरी बजाविली आहे. सध्याच्या दिवाळीच्या मोसमात सोन्याचे तोळ्याचे दर २८ हजार रुपयांखालीच आहेत. मात्र वर्षभरापूर्वीच्या हंगामात ते ३० ते ३२ हजार रुपये दरम्यान होते.
सोने दरातील संवस्तर २०७० चा प्रवास पाहिला तर गुंतवणुकीच्या बाबत आधीच्या वर्षांच्या तुलनेत ते जवळपास १० टक्क्य़ांनी कमी परतावा देणारे ठरले आहे. त्यामुळे परताव्याच्या बाबत या संवस्तराने १९९७ नंतरची सुमार नोंद केली आहे. त्या वेळी सोन्याचा भाव ४,२५० रुपये प्रति १० ग्रॅम होता. त्या वर्षांत सोने दरात १७.३ टक्क्य़ांची आपटी नोंदली गेली होती.

रुपया सप्ताहाच्या उंचीवर
सलग चौथ्या व्यवहारात वधारताना रुपया सप्ताह उंचीवर पोहोचला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयात बुधवारी ४ पैशांची वाढ होऊन ते ६१.२७ वर गेले. संवतअखेरच्या सत्रात ६१.३० पर्यंत घसरल्यानंतर चलनाने ६१.१५ पर्यंत झेप घेतली. व्यवहार अखेर त्यात मंगळवारच्या तुलनेत ०.९१ टक्क्याची वाढ राखली गेली. सलग चौथ्या व्यवहारात भारतीय चलन उंचावले आहे. यादरम्यान रुपयात तब्बल ५६ पैशांची भर पडली आहे.

सोने दरात नरमाई
गेल्या काही दिवस सतत वाढत असलेल्या सोने-चांदीच्या दरांमध्ये बुधवारी ऐन लक्ष्मीपूजनाच्या तोंडावर घसरण दिसली. सणानिमित्ताने होणारी खरेदी लक्षात घेऊन चालू आठवडय़ात दोन ते तीन सत्रांत सोन्याचे भाव वधारत होते. बुधवारी मात्र तोळ्यामागे सोन्यात ८५ रुपयांची घट झाली. स्टॅण्डर्ड सोन्याला १० ग्रॅमसाठी २७,३१५ रुपयांचा भाव मिळाला. तर चांदीही किलोमागे २१० रुपयांनी नरम होत ३९,४७५ रुपयांवर आली.

अमेरिकेनंतर आता युरोपमध्येही मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आर्थिक सवलतींचे चक्र पुन्हा सुरू होत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भाव वाढण्याचे संकेत आहेत. भारतात सोन्याच्या वाढत्या आयातीबद्दल सरकार पातळीवर चिंता व्यक्त केली जात असली तरी सोन्यामधील गुंतवणूक वाढत आहे. दिवाळीसारख्या सणात तर सोने खरेदी अधिक होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दर कमी असल्याने ते अधिक जाणवते आहे.
– अमित मोडक, वायदा वस्तू तज्ज्ञ, पु. ना. गाडगीळ आणि सन्स

सणांच्या मोसमात खरेदीदारांकडून होणारा मागणीचा मारा क्रमप्राप्त आहे. भांडवली बाजारातील निवडक समभागांच्या बाबतही गुंतवणूकदारांनी हेच धोरण अनुसरले. केंद्र सरकारच्या कोळसा खाणींच्या ई-लिलाव निर्णयामुळे भांडवली वस्तूंचे समभाग मूल्य दुसऱ्या दिवशीही उंचावले. जागतिक आशावादी चित्रांवर येथेही गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.
– संजीव झारबडे,उपाध्यक्ष, कोटक सिक्युरिटीज

सलग तिसऱ्या व्यवहारात रुपया डॉलरच्या तुलनेत ६१.२०च्या वर राहिला आहे. स्थानिक पातळीवर खरेदीचा दबाव या कालावधीत वाढता राहिला. चलन बाजारपेठेवर भांडवली बाजाराइतका विपरीत परिणाम जाणवला नाही. जागतिक स्तरावर आगामी कालावधीत अमेरिकेतील महागाई दराच्या आकडय़ावर नजर राहील. हा दर आशादायक राहिल्यास डॉलर अधिक भक्कम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुपया पुन्हा ६२ पर्यंत गेल्यास आश्चर्य वाटायला नको.
– अभिषेक गोयंका, इंडिया फॉरेक्स अ‍ॅडव्हायजर्स
ec05