राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलीक यांना भाजपावर बीनबुडाचे आरोप करण्याची सवय झाली आहे. भंगाराचा व्यवसाय करता करता त्यांनी आपली मतीही भंगरात विकली आहेत, असा टोला भाजपचे नेते व आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे.
क्रूझवर धाड टाकली त्यावेळी त्या क्रूझवर तेराशे लोक प्रवास करत होते. त्यात तुमचेही काही जवळचे लोक होते. तपासानंतर ज्यांच्यावरती गुन्हा सिद्ध झाला त्यांनाच फक्त एनसीबीने अटक केली. उर्वरित लोकांना एनसीबीने सोडलेले आहे. मुळात तुमचे वसूली सरकार हे वसूलीत गुंग असल्यामुळे एनसीबी असो की दिल्लीतली एटीएस यांनाच कारवाई करावी लागतेय, असंही पडळकर म्हणाले आहेत.
“तुमच्या स्वत:च्या जावयाला ड्रग्स केसमध्ये अटक झाली असताना तेव्हा तुम्ही कशासाठी गप्प बसले होता? नवाब मलिकांना मुळात आर्यन शाहरूख खानची चिंता आहे की त्यांना ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळक्यांची चिंता आहे हे त्यांनी स्पष्ट करावे,” अशी मागणीही पडळकर यांनी केली. या प्रकरणाचा सखोल तपास केल्यास तुमचे ड्रग्स टोळक्यांशी असणारे लागेबांधे उघडे पडणार आहेत असा काही प्रकार नाहीय ना? या भितीपोटी तर तुम्हाला झोप लागत नाहीये ना?, असे प्रश्नही पडळकर यांनी उपस्थित केलेत.
मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर २ ऑक्टोबर रोजी केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने म्हणजेच एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये भाजपाचे नेते मोहित कम्बोज यांचा मेहुणा ऋषभ सचदेवालासुद्धा ताब्यात घेण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. आज मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी एनसीबीने ११ जणांना क्रूझवरुन ताब्यात घेतल्यानंतर तीन जणांना भाजपा नेत्यांच्या आदेशाने सोडून देण्यात आल्याचा आरोप केलाय. यावेळी त्यांनी मुंबईमधील भाजपाच्या युवा विभागाचे माजी अध्यक्ष महीत कंबोज यांच्या मेहुण्याचाही समावेश असल्याचं म्हटलंय.