दिग्दर्शक गोविंद निहलानी यांची ओळख हिंदी सिनेसृष्टीत नवनवे प्रयोग करणाऱ्या दिग्दर्शकांपैकी एक अशी आहे. कलात्मक, समांतर सिनेमाच्या निर्मितीकडे त्यांचा अधिक भर असतो. गोविंद निहलानी यांचा सिनेमा येणार म्हटल्यावर त्यात झाडाखाली गाणी गाणाऱ्या नटांपेक्षा बुद्धीला खाद्य पुरवलं जाईल अशीच गोष्ट बघायला आपण जातोय हे लक्षात ठेवूनच प्रेक्षक चित्रपटगृहात जात असतो. ‘आक्रोश’, ‘अर्धसत्य’, ‘देव’, ‘दृष्टी’ या सिनेमांतून गोविंद यांचा विषयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन किती वेगळा आहे हे स्पष्ट दिसून येतं. एखादा सिनेमा दिग्दर्शित करताना आपल्याला प्रेक्षकांना काय दाखवायचे आहे हे त्यांना स्पष्ट माहित असतं.
‘शांतता कोर्ट सुरु आहे’ या सिनेमाचं दिग्दर्शन केल्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा ‘ती आणि इतर’ हा एक विचार करायला लावणारा विषय सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणला आहे. ‘ती आणि इतर’ हा सिनेमा ‘लाइट हाऊस’ या नाटकावर आधारित आहे. आतापर्यंत नाटकाच्या कथेवर आधारित अनेक सिनेमे मराठीमध्ये येऊन गेले. पण काही बाबतीत नाटकाचा विषय हा कितीही ताकदीचा वाटला तरी तो सिनेमात वापरता येऊ शकत नाही हे हा सिनेमा बघताना प्रकर्षाने जाणवतं. काही कथा या नाटकासाठीच लिहिल्या जातात. त्याचपद्धतीने त्याची रचना केलेली असते.
या सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण एका घरातच करण्यात आले आहे. सोनाली कुलकर्णी (नयना गोडबोले) आणि सुबोध भावे (अनिरुद्ध गोडबोले) हे त्यांच्या घरी एका छोटेखानी पार्टीचं आयोजन करतात. मित्र-परिवारासोबत गप्पा रंगत आल्या असताना अचानक त्यांना मुलीची किंकाळी ऐकू येते. सुरुवातीला त्या किंकाळीकडे लक्ष दिले जात नाही. पण नंतर त्यातले गांभीर्य लक्षात येत जाते आणि सिनेमा खरा सुरू होतो. बाहेरच्या राज्यातून नोकरी देतो असे सांगून गरिब अल्पवयीन मुलींना मुंबईत देहविक्रीसाठी आणले जाते. त्यांच्यावर अत्याचार करणारे किती निष्ठूर असतात हे या सिनेमात मांडण्यात आलं आहे.
‘ती आणि इतर’ या सिनेमात स्वतःला सुसंस्कृत म्हणवणाऱ्यांच्यावरच प्रश्न चिन्ह उभं केलं आहे. समोर एखादी चुकीची घटना सुरू असतानाही आपण त्यात का पडा? इतर ते पाहून घेतील… यातून आपल्याला काही झालं तर? अशा अनेक प्रश्नांमुळे सुसंस्कृत माणूस समोर होणाऱ्या अन्यायाकडे दुर्लक्ष करतो. पण यामुळे समाज कुठे चालला आहे याकडे कोणाचे लक्ष जात नाही. चुकीच्या माणसांना याचा फायदाच होतो हे कोणाच्याही लक्षात येत नाही. हा विषय जितक्या ताकदीचा आहे तेवढ्या ताकदीने तो मांडण्यात अपयश आलं असं म्हणावं लागेल.
अमृता सुभाष, प्रिया मराठे, अविनाश दार्वेकर, भूषण प्रधान या कलाकारांचे अभिनयही फार लक्षात राहतील असे नाहीत. त्यातही सोनाली कुलकर्णीने निराशाच केली असे म्हणावे लागेल. आतापर्यंत तिच्या अभिनयात सहजता दिसली होती. ती अभिनय करते असे कधी वाटले नाही. पण हा सिनेमा त्याला अपवाद ठरावा असाच आहे. सिनेमातील तिच्या प्रत्येक हालचाली या कृतिम वाटतात.
हा सिनेमा अंर्तमुख होऊन विचार करायला लावतो. आपण काय आहोत आणि आपल्याला काय व्हायचे आहे याचा पुनर्विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे. कोणत्याही संवेदशील माणसाला विचारात पाडणारा असा हा सिनेमा आहे. एखादा आशयघन सिनेमा पाहणाऱ्यांसाठी हा सिनेमा नक्कीच पर्वणी ठरेल.
-मधुरा नेरुरकर
madhura.nerurkar@indianexpress.com