युरोझोनमधून बाहेर पडण्याची शक्यता असल्याने भारतातही त्याचे आर्थिक परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. हे परिणाम कमी करण्यासाठी आधीपासून सज्जता सुरू आहे. यापूर्वीच्या आर्थिक पेचप्रसंगांमध्ये भारत बेसावध होता पण आता तशी परिस्थिती नाही, असे विश्लेषकांनी मत व्यक्त केले. ग्रीसमधील अरिष्टाचे भारतावर थेट परिणाम घडताना दिसून येत नाही. परंतु या घटनेच्या परिणामी युरोपातील व्याजाचे दर वाढतील. व्याजदरातील या वाढीमुळे तेथून भारतात होणाऱ्या भांडवली गुंतवणुकीला गळती लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे केंद्रीय अर्थसचिव राजीव मेहिरीषी यांनी यासंबंधी भाष्य करताना सांगितले.

१ रुपया घसरण्याची शक्यता: जर ग्रीस युरोझोनमधून बाहेर पडला तर रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत कमी होण्याची शक्यता आहे. आज रुपयाची किंमत डॉलरला ६३.५६००/५७ होती, आधीच्या व्यापारात ती ६३.४४/४५ होती.
२  गुंतवणुकीला गळती : भारताच्या भांडवली बाजारात विशेषत: युरोपातून झालेली गुंतवणूक बाहेर जाऊ शकते. त्यासाठी सरकार रिझर्व बँक ऑफ इंडियाशी सल्लामसलत करीत आहे.
३  सॉफ्टवेअर व अभियांत्रिकी निर्यातीवर परिणाम : भारताच्या सॉफ्टवेअर व अभियांत्रिकी वस्तू निर्यातीला फटका बसू शकतो. या उद्योगातील धुरिणांनीही तीच भीती व्यक्त केली आहे. अभियांत्रिकी निर्यात संस्था ईईपीसीने म्हटले आहे, की ग्रीसमधील आर्थिक पेचप्रसंगामुळे अभियांत्रिकी वस्तूंच्या भारतातून होणाऱ्या निर्यातीला फटका बसेल. युरोपीय समुदायात भारताच्या अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात मोठय़ा प्रमाणात होते. ब्रिटन, इटली, तुर्कस्तान व फ्रान्समधील निर्यातीवरही परिणाम होईल.
४  पुरेशी परकीय चलन गंगाजळी : रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या मते ग्रीसच्या पेचप्रसंगाचा परिणाम कमी करण्यासाठी परकीय चलनाचा साठा जास्त राखण्यात आला आहे. सध्या भारताकडे ३५५ अब्ज डॉलर परकीय चलन असून तो आतापर्यंतचा उच्चांक आहे. त्यामुळे या पेचप्रंसगात भारताला मोठी झळ बसणार नाही.

Story img Loader