अनेकविध रंगांची डिझाइन्स अंगावर लेवून पंखांची अलगद उघडझाप करणाऱ्या आणि डोळे किलकिलवणाऱ्या तसंच फुलावर बसून फुलाच्या परागकणांमधून मध शोषून घेणाऱ्या फुलपाखराचा क्लोज-अप, डराव-डराव आवाज करत ओरडणाऱ्या बेडकाचा तोंडाखालचा भाग फुग्याप्रमाणे फुगताना घेतलेला क्लोज-अप, आकाशातून खूप उंचीवरून घेतलेला पण तरीही डोंगर-दऱ्यांमधल्या वृक्षराजीचा खडान्खडा तपशील देणारा ‘स्कायशॉट’ किंवा आकाशातून झेपावून पाण्यात सूर मारून पाण्याखाली पोहत असलेला मासा टिपून उडून जाणाऱ्या समुद्रपक्ष्याचा शॉट, अशी दृश्यं आपण काही वाहिन्यांवर पाहतो आणि या स्वच्छ तसंच तपशीलवार दृश्य टिपणाऱ्या छायाचित्रणाला नकळत दाद देतो. पण खरंतर, छायाचित्रणातल्या कौशल्याबरोबरच यात सिंहाचा वाटा असतो, तो आजच्या तंत्रज्ञानातल्या सुधारणेचा! हेच तंत्रज्ञान ‘हाय डेफिनेशन’ तंत्रज्ञान म्हणून ओळखलं जातं. १९८२साली आपल्या देशातली त्या वेळची एकमेव दूरचित्रवाणी वाहिनी असलेलं दूरदर्शन कृष्णधवल चित्रणाच्या युगातून बाहेर पडून रंगीत झालं. १९९०च्या दशकापासून प्रसारणाची पद्धत ‘अॅनालॉग’ऐवजी ‘डिजिटल’ झाली आणि आता २०१३साली पुन्हा एकदा नव्याने कात टाकत, या सरकारी वाहिनीने ‘डिजिटल’ऐवजी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या ‘एचडी’ अर्थात ‘हाय डेफिनेशन’ तंत्राचा अवलंब करायला सुरुवात केली आहे. अलीकडेच उद्घाटन झालेल्या दूरदर्शनच्या या नव्या ‘एचडी’ स्टुडिओमध्ये केवळ प्रसारणच नाही, तर छायाचित्रण आणि संकलनही एचडी पद्धतीने होणार आहे. त्यासाठी नव्या ‘एचडी’ कॅमेऱ्यांद्वारे छायाचित्रण करायची सोय असून चित्रफितीच्या वापराशिवाय पाचपट अधिक स्वच्छ चित्र देण्याबरोबरच ३६० अंशांमध्ये आवाज घुमवू शकणाऱ्या डॉल्बी तंत्रज्ञानाचाही वापर केला आहे. लवकरच हे बदल सर्वच दूरचित्रवाहिन्यांवर होतील आणि त्यामुळे नोकरी किंवा स्वयंरोजगाराच्या अनेक संधी या बदलांमुळे निर्माण होणार आहेत. नजीकच्या काळात ‘डीटीटी’ किंवा ‘डीटी-टू’ या नावाने अधिक प्रसिद्ध असलेलं ‘डिजिटल टेरेस्ट्रियल ट्रान्समिशन’ हे प्रसारण तंत्रज्ञानातलं नवं दालन खुलं होणार आहे. या नव्या बदलांमुळे चालत्या गाडीत किंवा प्रवासात असताना अॅण्ड्रॉइड प्रणाली असलेल्या मोबाइलवर अथवा आयपॅडवर दूरचित्रवाणी वाहिन्या पाहायची सोयही उपलब्ध होणार आहे. याचबरोबर तुम्ही पावसात पाणी तुंबल्यामुळे किंवा ट्रॅफिकमध्ये एखाद्या ठिकाणी अडकला असाल आणि त्याचं छायाचित्रण तुमच्या मोबाइल कॅमेऱ्याद्वारे करून ते दूरचित्रवाहिनीकडे पाठवलं, तर वाहिनीवरून ते प्रसारित करून इतरांना तिथे जाण्यापासून सावध करायची सोयही या तंत्रज्ञानाद्वारे उपलब्ध होऊ शकते. म्हणजेच कार्यक्रम निवेदक आणि प्रेक्षक यांच्यात परस्पर आणि थेट संवाद साधून आता दूरचित्रवाणी वाहिन्यांवरूनही सादर करता येणार आहेत.
तंत्रज्ञानात झालेल्या आणि होऊ घातलेल्या या सर्व नवीन बदलांमुळे अनेक प्रकारच्या नोकऱ्या किंवा रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. या प्रकारचं तंत्रज्ञान वापरणाऱ्या माध्यम कंपन्यांमध्ये मुख्यत: दोन प्रकारच्या रोजगार संधी उपलब्ध असतील. त्यापकी एक अभियांत्रिकी क्षेत्राशी निगडित असेल, तर दुसरं क्षेत्र हे कला विश्वाशी निगडित असेल. ४०फूट बाय ६०फूट इतक्या आकाराच्या एका विस्तीर्ण एचडी स्टुडिओत सुमारे ५० ‘मायक्रोफोन्स’ अर्थात ध्वनिक्षेपक असतात. ते ध्वनिवर्धक स्टुडिओच्या कोणत्याही ठिकाणी किंवा छतापर्यंत कितीही उंचीवर विविध ठिकाणी ठेवता येतात. विशेषत: स्टुडिओतल्या प्रेक्षकांसमोर जर संगीताची मफल होत असेल आणि त्याचं ध्वनिचित्रमुद्रण किंवा थेट प्रसारण होत असेल, तर गायक, वादक संचातले सर्व वादक, कार्यक्रमाचे निवेदक आणि प्रेक्षकांची प्रतिक्रिया विचारायची असेल, तर प्रेक्षकांमध्येही अनेकांना हे ध्वनिक्षेपक एकाच वेळी देता येऊ शकतात. अशाप्रकारे सर्वच दिशांमधून येणाऱ्या आवाजाचं नियंत्रण आणि ध्वनिमुद्रण करण्यासाठी ‘ऑडिओ इंजिनीअर्स’ अर्थात आवाजाच्या क्षेत्रातल्या अभियंत्यांची गरज लागणार आहे. याबरोबरच गायकाकडे रोखलेल्या कॅमेऱ्यावरून स्टुडिओतल्या प्रेक्षकांकडे रोखलेल्या दुसऱ्या कॅमेऱ्याकडून टिपलं जाणारं दृश्य दाखवताना दृश्यात जो हळुवार पद्धतीने बदल व्हावा, यासाठी दृश्यमिश्रण करावं लागतं. तसंच स्टुडिओत असलेल्या पाच ते सहा कॅमेऱ्यांपकी कुठल्या वेळी कोणता कॅमेरा कोणत्या दिशेने रोखायचा, याचं नियंत्रण करणारं ‘सीसीयू’ अर्थात ‘कॅमेरा कंट्रोल युनिट’, तसंच कॅमेऱ्याकडून किंवा दृश्यमिश्रणातून येणारे आणि जाणारे सिग्नल्स नोंदवणारा ‘व्हिटिआर’ अर्थात ‘व्हिडीओ ट्रान्समिशन रेकॉर्ड’ हा विभाग, असे विविध विभाग हाताळण्याकरताही अभियंत्यांची गरज असते. या सर्व यंत्रणेची देखभाल, दुरुस्ती ज्यांच्या अखत्यारीत येते, अशा ‘मेन्टेनन्स इंजिनीअर्स’चीही या क्षेत्रात आवश्यकता असते. इलेक्ट्रॉनिक्स आणि विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतलेले अभियंते या क्षेत्रासाठी लागतात. याच शाखेत पदविका घेतलेल्यांनाही तंत्रज्ञ म्हणून या क्षेत्रात काम करता येते.
कला आणि तंत्र यांच्या सीमारेषेवर असलेल्या व्यवसायसंधीही या क्षेत्रात आहेत. आधुनिक तंत्रावर चालणारे कॅमेरे हाताळणे तसेच स्टुडिओत आणि बाहेर जाऊनही छायाचित्रण करण्यासाठी पुण्याची फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट तसेच इतर काही खासगी इन्स्टिटय़ूटस्मधून छायाचित्रणाचा अभ्यास करता येईल. छायाचित्रकारांना आज या उद्योगक्षेत्रात उत्तम ‘मान’ आणि ‘धन’ मिळतं, हे वेगळं सांगायची गरजच नाही.
या क्षेत्रात असलेली दुसरी एक महत्त्वाची व्यवसायसंधी म्हणजे ‘लायटिंग डिझायनर’ची! संगणकाच्या साहाय्याने हाताळल्या जाणाऱ्या आणि विविध दिशांमध्ये फिरणाऱ्या तसंच एकाच दिव्यातून विविधरंगी प्रकाशछटा फेकणाऱ्या अनेकविध प्रकारच्या दिव्यांचं व्यवस्थापन लायटिंग डिझायनरला करावं लागतं. कार्यक्रमाचा आशय आणि विषय लक्षात घेऊन स्कॅनर, मुिव्हग हेड्स, लेड लाइट्स यांचा वापर आणि या सर्वाचं प्रत्येक क्षणागणिक केलं जाणारं मिश्रण यातून नेत्रदीपक अशी दिव्यांची रचना करायचं काम या डिझायनरला करावं लागतं.
या व्यतिरिक्त, पूर्णत: कलाक्षेत्राशी निगडित असलेली अशी पदंही या स्टुडिओत असतात. लेड पॅनल्सवर ग्राफिक्स तसंच पूर्वचित्रमुद्रित केलेली शेकडो डिझाइन्स प्रोजेक्टरच्या माध्यमातून प्रसारित करून विविध ‘बॅकग्राऊंड्स’ अर्थात कार्यक्रमाच्या मागच्या बाजूला कार्यक्रमाची पाश्र्वभूमी पडद्यावर साकारण्याचं काम करणारा ग्राफिक डिझायनर हाही तितकाच महत्त्वाचा असतो. नेपथ्य रचनाकार हा कार्यक्रमाचं नेपथ्य करत असताना, आधी कार्यक्रमाचं स्वरूप लक्षात घेऊन त्रिमितीत खरी वाटतील अशी ‘परस्पेक्टिव्ह ड्रॉइंग्ज’ तयार करतो. मग कार्यक्रमाच्या निर्मात्याशी चर्चा करून अंतिम रेखाटनं केल्यावर त्यांचा आराखडा आणि नेपथ्याची उभारणी करताना दिव्यांच्या जागा लक्षात घेऊन नेपथ्याची मांडणी करतो. नेपथ्यकार, दिव्यांचा व्यवस्थापक, ध्वनिक्षेपकाच्या जागा निश्चित करणारा साऊंड इंजिनीअर अशा सगळ्या चमूचं निर्मात्याबरोबर चर्चा करून समन्वय साधण्याचं काम ‘आर्ट डायरेक्टर’ अर्थात कला दिग्दर्शक करत असतो. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स किंवा तत्सम एखाद्या संस्थेतून फाइन आर्ट्स किंवा कमर्शिअल आर्ट्सचा अभ्यासक्रम केल्यानंतर या क्षेत्रातला दांडगा अनुभव गाठीशी असलेली व्यक्ती कलादिग्दर्शक म्हणून काम करू शकते. या सगळ्याबरोबरच कार्यक्रमाचं सूत्रसंचालन किंवा निवेदन करणाऱ्यांनाही या क्षेत्रात पुष्कळ वाव आहे. तसंच कार्यक्रमाच्या संहिता लेखकांचीही गरज या क्षेत्राला आहे. या सगळ्या मध्यम आणि मोठय़ा स्तरावरच्या पदांबरोबरच इतर लहान लहान व्यावसायिकांनाही इथे रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात. रंगारी, सुतार, थर्माकॉलची डिझाइन्स तयार करणारे कारागीर यांनाही मोठी मागणी असणार आहे.
अशाप्रकारे अनेकविध रोजगारांची निर्मिती करणाऱ्या या ‘हाय डेफिनेशन’च्या क्षेत्रात तंत्र आणि कला यांचा सुरेख आविष्कार साधला जातो. त्यामुळे अभियंत्यांपासून कलाकारांपर्यंत आणि तंत्रज्ञांपासून ते कारागिरांपर्यंत अनेकांना रोजगार मिळवून देणारं हे ‘हाय डेफिनेशन’चं क्षेत्र त्यांच्या यशस्वी करिअरच्या वाटा खुल्या करणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा