कोणे एके काळी.. म्हणजे १९८२ साली भारतीय पुरुष हॉकी संघाने अ‍ॅम्स्टरडॅम येथे पाकिस्तानवर ५-४ असा विजय मिळवूक आंतरराष्ट्रीय स्पध्रेत कांस्यपदक पटकावले होते.. त्यानंतर जवळपास ३३ वष्रे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली पाटी कोरी राहिली, ती परवाच्या रविवारी जागतिक हॉकी लीग अंतिम फेरीत कांस्यपदक मिळेपर्यंत. ०-२ अशा पिछाडीवरून भारतीय संघाने गतविजेत्या नेदरलँड्सला निर्धारित वेळेत ५-५ असे बरोबरीत रोखले आणि पेनल्टी शूट आऊटमध्ये पी. आर. श्रीजेश या ‘अभेद्य भिंती’च्या जोरावर नेदरलँड्सला ३-२ असे नमवून हा ऐतिहासिक क्षण भारतीयांना, किंवा किमान हॉकीप्रेमींना तरी साजरा करण्याची संधी दिली! ऑलिम्पिकला अवघे काही महिने शिल्लक असताना हा विजय उमेद देणारा आहे. नेदरलँड्ससारख्या तुलनेने बलाढय़ प्रतिस्पर्धीला तोडीस तोड उत्तर देणाऱ्या भारतीय संघाच्या पाठीवर कौतुकाची थाप पडलीच पाहिजे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या या लढतीने भारतीय खेळाडूंची खरी कसोटी पाहिली. योग्य वेळी अचूक निर्णय घेण्याची कर्णधार सरदार सिंगच्या नेतृत्वकौशल्याची, आकाशदीप, रूपिंदरपाल सिंग, रमनदीप सिंग यांच्यावर असलेल्या आक्रमणाच्या जबाबदारीची, तर श्रीजेशच्या भक्कम बचावाची परीक्षाच या सामन्याने घेतली. या परीक्षेत हे खेळाडू उर्तीण झाले असले तरी ऑलिम्पिकच्या दृष्टीने त्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल, हेही संघाची गुणपत्रिका हाताळताना प्रकर्षांने जाणवले. चढउतारांच्या या स्पध्रेत खाच खळग्यातून स्वत:ला सावरत कांस्यपदक जिंकल्याचा अभिमान भारतीय खेळाडूंनी जरूर बाळगावा़, परंतु त्याच क्षणी पुढे येणाऱ्या आव्हानांची जाण ठेवून कामगिरी सुधारणाही करावी. या स्पध्रेत आकाशादीप सिंग, रमनदीप सिंग हे आघाडीपटू, तर रूपिंदर पाल सिंग (फुलबॅक), कर्णधार सरदार सिंग (हाफ बॅक), मनप्रीत सिंग (हाफबॅक) हे खेळाडू वगळता इतरांना साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पेनल्टी कॉर्नरचे गोल मध्ये रूपांतर करण्यात भारताला अजूनही अपयश येते; हा चिंतेचा विषय आहे. बचावातही अनेक त्रुटी आहेत आणि त्यासाठी बिरेंद्र लाक्रा, देवींदर वाल्मिकी, व्ही. रघुनाथ यांना बरीच मेहनत घ्यावी लागेल. आघाडीपटू, बचावपटू, मध्यरक्षक यांच्या कामगिरीपेक्षा भारताने अनेक विजय गोलरक्षक श्रीजेशच्या बळावर मिळवले आहेत, हे विसरता कामा नये. नेदरलँड्सविरुद्धच्या लढतीतही त्याची अभेद्य भिंत ओलांडण्यात डच खेळाडूंना अपयश आल्याने भारतीय खेळाडूंमध्ये विजयासाठी ऊर्जा निर्माण झाली. त्याचा परिणाम सर्वच जाणतो, परंतु याचवेळी अजून किती काळ आपण श्रीजेशवर अवलंबून राहणार, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. त्याला पर्यायी खेळाडू तयार करणेही तितकेच आवश्यक आहे. या स्पध्रेत भारतीय संघ ‘रोलरकोस्टर’वर स्वार होता. भारताची गाडी एका क्षणाला वर जात होती तिच दुसऱ्या क्षणी झटकन खाली येत होती. समान आणि सरळ मार्गावर ती धावायलाच तयार नव्हती. असे बोलून खेळाडूंची मेहनत नजरअंदाज करायची नाही, पण खेळाडूंमध्ये सातत्य नव्हते, हेही तितकेच खरे. आगामी काळात हीच भारताची डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे वेळीच धोक्याचा इशारा ओळखून आणि चुकांवर मात करून भारताला ऑलिम्पिकसाठी सज्ज व्हावे लागणार आहे. तर आणि तरच ऑलिम्पिकमधील पदकाचे स्वप्न रंगवण्यात अर्थ!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा