येत्या लोकसभा निवडणुकांत काळ्या पैशांचा वापर होऊ नये, म्हणून प्राप्तिकर विभागाने बिहार आणि झारखंडमध्ये ६५ अधिकारी आणि १३० निरीक्षक तैनात केले आहेत़  निवडणुकीदरम्यान पैसे आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या अनधिकृतरीत्या होणाऱ्या वाटपावर हे अधिकारी नजर ठेवणार असल्याची माहिती प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली़. या दोन राज्यांतील काळ्या पैशाच्या व्यवहारावर नजर ठेवण्यासाठी पाटणा आणि रांची येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत़  तसेच तेथे सर्वसामान्य नागरिकांसाठी चोवीस तास विनामूल्य दूरध्वनी क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असेही प्राप्तिकर विभागाचे महासंचालक उज्ज्वल चौधरी यांनी सांगितल़े

आंध्र प्रदेशातील यादी २८ मार्चला  
हैदराबाद : काँग्रेसचे आंध्र प्रदेशातील उमेदवार २८ मार्चपर्यंत निश्चित करण्यात येतील, अशी माहिती पक्षाचे आंध्र प्रदेशातील प्रभारी दिग्विजय सिंह यांनी गुरुवारी दिली़  तेलंगण आणि सीमांध्रासाठी काँग्रेसने स्वतंत्र प्रदेश समिती स्थापन केल्यानंतर दोन्ही समितीच्या कार्यालयांना दिग्विजय यांनी मार्गदर्शन केल़े  
तेलंगण काँग्रेस समितीची बैठक गुरुवारी आणि सीमांध्र काँग्रेस समितीची बैठक १५ मार्चला आयोजित करण्यात आली आह़े  या बैठकांमध्ये जिल्हा आणि ब्लॉग स्तरावरून आलेली संभाव्य उमेदवारांची नावे अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या छाननी समितीपुढे मांडण्यात येतील़  

मुंब्य्रातील मतदार याद्यांमध्ये घोळ..
ठाणे : मुंब्रा येथील मतदार याद्यांमधील नाव, पत्त्यांमध्ये अनेक त्रुटी असून या याद्यांमधून अनेक मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे मुंब्य्रातील अनेक मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागणार आहे, असा आरोप मुंब्य्रातील डॉक्टरांच्या संघटनेने गुरूवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन केला. तसेच या मतदार याद्यांचे काम करण्याची जबाबदारी असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.