गेल्या निवडणुकीत ज्या मतदान केंद्रात ९० टक्क्य़ांहून अधिक मतदान झाले आहे आणि एखाद्या उमेदवाराला ७५ टक्क्य़ांहून अधिक मते मिळाली आहेत, अशी मतदान केंद्रे संवेदनक्षम म्हणून अधोरेखित करावी, अशा सूचना निवडणूक आयोगाने आपल्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. निवडणुका उधळण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सदर आदेश देण्यात आले आहेत. मुक्त आणि मोकळ्या वातावरणात निवडणुका पार पडाव्या यासाठी सदर आदेश देण्यात आले असून मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी गेल्या निवडणुकीचे निकाल पाहून संवेदनक्षम मतदान केंद्रे निश्चित करावयाची आहेत.
श्रीरामलू यांच्या भाजप प्रवेशाने सुषमा नाराज
नवी दिल्ली-बंगळुरु :खाणसम्राट जनार्दन रेड्डी यांचे निकटवर्तीय बी.एस.श्रीरामलू यांचा भाजप प्रवेश वादात सापडला आहे. आपला विरोध असताना देखील त्यांना पक्षात घेण्यात आल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी व्यक्त केली आहे. २०११ मध्येश्रीरामलू यांनी भाजपसोडून बीआरएस काँग्रेसची स्थापना केली होती. त्यांना बेल्लारीतून भाजपची उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत. स्वराज यांचा विरोध डावलून भाजपने श्रीरामलू स्वागत केले आहे.
बीजेडीची दुसरी यादी जाहीर
भुवनेश्वर : ओदिशातील लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या १८ मतदारसंघातील उमेदवारांची दुसरी यादी बीजेडीने शुक्रवारी जाहीर केली. यामध्ये मलकानगिरी आणि देवगड मतदारसंघातील उमेदवारांना तिकीट नाकारण्यात आले आहे. संबलपूर, बारगड आणि नवरंगपूर लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी तीन नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. माजी मंत्री नागेंद्र प्रधान यांना संबलपूरमधून तर बालभद्र माझी यांना नवरंगपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसमधून बीजेडीमध्ये आलेले अनुप साई यांना ब्रजराजनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
अळ्ळगिरींचा भाजपकडे पाठिंब्याचा प्रस्ताव
नवी दिल्ली:अळ्ळगिरी यांनी भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याचा प्रस्ताव दिला. अळ्ळगिरी यांना द्रमुकमधून निलंबित करण्यात आले आहे. तमिळनाडूच्या दक्षिण भागातील सात लोकसभा मतदार संघात अळ्ळगिरी यांचा प्रभाव असल्याचे मानले जाते. तमिळनाडूतील एका भाजपच्या नेत्याच्या मार्फत ही भेट झाली.दरम्यान अळगिरी यांनी शुक्रवारी तामिळ सुपरस्टार रजनीकांत यांची त्यांच्या चेन्नईतील निवासस्थानी भेट घेतली. रजनीकांत हे आपले हितचिंतक असल्याने आपण त्यांची भेट घेतल्याचे अळगिरी यांनी वार्ताहरांना सांगितले. रजनीकांत यांची भेट घेतल्याने त्यामधून कोणतेही राजकीय निष्कर्ष काढू नयेत, रजनीकांत हे आपले मित्र आहेत, चर्चा राजकीय स्वरूपाची नव्हती.