फारूक नाईकवाडे
राज्य लोकसेवा आयोगाने जुलै २०२० मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये बदलाची घोषणा केली. या बदलांवर या विश्लेषणात्मक चर्चा लेखमालेमध्ये जुलै व ऑगस्ट २०२०मध्ये करण्यात आली. त्यानंतर नोव्हेंबर २०२०मध्ये आयोगाने नवीन अभ्यासक्रमामध्ये पुन्हा काही बदल/सुधारणा केल्या आहेत. या नवीन बदलांची चर्चा आणि त्यानुसार तयारी कशी करावी याबाबत या लेखापासून चर्चा करण्यात येत आहे. या लेखामध्ये इतिहास या घटक विषयाच्या अभ्यासक्रमातील बदलांबाबत पाहू.
पुनर्रचना
* सामाजिक आणि सांस्कृतिक जागृती हे शीर्षक वगळून त्यातील मुद्दे प्रबोधन काळ या शीर्षकाखाली ठेवण्यात आले आहेत.
* डाव्या चळवळी, शेतकरी आणि आदिवासी चळवळींचा समावेश आधी गांधी युगामध्ये केला होता. म्हणजे महात्मा गांधींच्या कालखंडापुरतीच त्यांची कारकीर्द अभ्यासणे अपेक्षित होते. आता त्यांचा सर्वंकष (संपूर्ण ब्रिटिश कालखंडातील घटनांचा) अभ्यास करायचा आहे.
* सामाजिक सांस्कृतिक जागृती मुद्यामध्ये महत्त्वाच्या व्यक्तींची भूमिका आणि निवडक समाजसुधारक असे काढून टाकले आहे.
* आधी गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ या शीर्षकाखाली अस्पृश्यता, सांप्रदायिकता या मुद्यांचाही समावेश करण्यात आला होता. यातील सांप्रदायिकतेचा मुद्दा वेगळा काढला असला तरी अस्पृश्यतेबाबतचा मुद्दा शीर्षकामध्येही समाविष्ट करून राजकीय व सामाजिक मुद्याची अजूनच सरमिसळ करून ठेवण्यात आली आहे.
* मुस्लीम राजकारण, नेते व हिंदू महासभा हे मुद्दे आधी गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ या उपघटकामध्ये समाविष्ट होते. आता सांप्रदायिकतेचा विकास आणि फाळणी या स्वतंत्र शीर्षकांतर्गत समर्पकपणे समाविष्ट करण्यात आले आहेत.
* याआधी स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास या घटकाचा अभ्यासक्रम खूपच विस्कळीत होता. मुद्यांची सलगता, परस्परसंबंध यांचा कसलाही विचार न करता नुसते मुद्दे कोंबले होते. तयारी करताना सुसंबद्धपणे करत यावी यासाठी या घटकाची आपल्यापुरती पुन्हा मांडणी करून घेणे उमेदवारांना क्रमप्राप्त होते. आयोगाने हा घटक व्यवस्थित व सुसंबद्धपणे मांडण्याची संधी पुन्हा गमावली आहे. केवळ लालबहादूर शास्त्रींचा उल्लेख एवढीच काय ती ‘सुधारणा’ यामध्ये दिसते. कालानुक्रम, विषय, मुद्दा अशा कुठल्याही प्रकारे यातील मुद्दे सुसंगतपणे मांडलेले नाहीत. त्यामुळे तयारीसाठी अभ्यासक्रमाची आपल्या सोयीसाठी वेगली मांडणी करावी लागणार आहे.
नवीन मुद्दे
* ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना या शीर्षकामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा उल्लेख यापूर्वी नसला तरी त्यावर प्रश्न विचारले गेले होतेच. आता या मुद्याचा उल्लेख केला असल्याने यावर बारकाईने अभ्यास आवश्यक ठरतो.
* सामाजिक धार्मिक सुधारणांच्या चळवळींमध्ये रामकृष्ण मिशन आणि थिओसोफिकल सोसायटी यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
* सामाजिक आणि आर्थिक जागृती असे शीर्षक असूनही आधीच्या अभ्यासक्रमामध्ये आर्थिक मुद्यांचा समावेशच नव्हता. सुधारित अभ्यासक्रमामध्ये आर्थिक मुद्दा समाविष्ट करण्यात आला आहे. यामध्ये समाविष्ट सर्वच मुद्दे नवीन आहेत. ते पुढीलप्रमाणे –
वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था – व्यापारिक टप्पा, संपत्तीचे वहन, दादाभाई नौरोजी यांचा संपत्ती वहन सिद्धांत, अनौद्योगिकीकरण, भारतीय हस्तोद्योगांचा ºहास, भारतीय कृषी व्यवस्थेचे वाणिज्यीकरण,
आधुनिक उद्योगांचा उदय – भारतीय व्यापारी समुदायाची भूमिका, ब्रिटिश वित्तीय भांडवलाचे भारतात आगमन, टिळक स्वराज्य निधी (फंड) व गो. कृ. गोखले यांचे योगदान
भारतीय राष्ट्रवादाचा उदय या मुद्यात महत्त्वाच्या घटनांचा व टप्प्यांचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. बंगालची फाळणी व होमरूल चळवळ या मुद्यांचा नव्याने उल्लेख केलेला आहे. महत्त्वाच्या व्यक्तींची भूमिका हा मुद्दा समाविष्ट करून व्यक्तींची यादी पुढीलप्रमाणे दिली आहे –
* सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशहा मेहता, दादाभाई नौरोजी, ए. ओ. ह्यूम, बिपीनचंद्र पाल, लाला लजपतराय, अॅनी बेझंट, अरविंदो घोष, बाळ गंगाधर टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू व इतर. (इतर अशा उल्लेखामुळे उल्लेख नसलेल्या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांवरही प्रश्न विचारले जाऊ शकतात.)
* गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ या शीर्षकामध्ये फैजपूर अधिवेशनाचा उल्लेख करण्यात आला आहे.
* ब्रिटिश काळातील घटनात्मक सुधारणांचा समावेश आधीच्या अभ्यासामध्ये नसला तरी त्यावर प्रश्न विचारण्यात येत होते. आता या मुद्याचा समावेश केल्यामुळे उमेदवारांचा गोंधळ कमी होईल. यामध्ये उल्लेख करण्यात आलेले मुद्दे पुढीलप्रमाणे:
ब्रिटिश प्रशासनाधीन घटनात्मक विकास – भारतीय परिषद कायदा, १८६१; भारतीय परिषद कायदा, १८९२; भारतीय परिषद कायदा, १९०९ (मोर्ले – मिंटो सुधारणा); भारत सरकारचा कायदा, १९१९ (माँट -फोर्ड सुधारणा); भारत सरकारचा कायदा, १९३५
* सत्ता हस्तांतरणासाठीचे विविध प्रयत्न व टप्पे याही मुद्यांवर अप्रत्यक्षपणे प्रश्न विचारण्यात आले होते. आता या मुद्यांचा अभ्यासक्रमामध्ये पुढीलप्रमाणे उल्लेख करण्यात आला आहे.
* सत्ता हस्तांतरणाकडे : ऑगस्ट घोषणा- १९४०; क्प्र्स योजना-१९४२; वेव्हेल योजना- १९४५; कॅ बिनेट मिशन योजना – १९४६; माउंटबॅटन योजना – १९४७; भारतीय स्वातंत्र्याचा कायदा – १९४७.
महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारकांची यादी वाढवण्यात आली आहे. महात्मा गांधी यांचे विचार व कार्य याबाबत एक संपूर्ण घटक समाविष्ट आहेच. त्यामुळे बहुधा पुनरुक्ती टाळण्यासाठी त्यांचे नाव या यादीतून कमी करण्यात आले असावे. नव्याने समाविष्ट व्यक्तिमत्त्वे पुढीलप्रमाणे-
* सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी; पंडिता रमाबाई; दादोबा पांडुरंग तर्खडकर; डॉ. पंजाबराव देशमुख; लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, न्यायमूर्ती का. त्र्यं. तेलंग; डॉ. भाऊ दाजी लाड; आचार्य बाळशास्त्री जांभेकर; जगन्नाथ शंकरशेट, गोपाळ कृष्ण गोखले; काळकर्ते शिवराम महादेव परांजपे; विष्णुशास्त्री चिपळूणकर; धों. के. कर्वे; र. धों. कर्वे; विष्णुबुवा ब्रह्मचारी; सेनापती बापट; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज; बाबा आमटे; संत गाडगेबाबा
* महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा या शीर्षकामध्ये कान्हेरी, एलिफंटा, अजिंठा, वेरूळ येथील लेणी, लोणार सरोवर, महाराष्ट्रातील किल्ले या नव्या मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे.