राष्ट्रवादी काँग्रेसचेआमदार रोहित पवार यांच्या अनोख्या संकल्पनेतून साकारलेल्या विक्रमी उंचीच्या भगव्या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना आज विजयादशमीच्या मुहूर्तावर होत आहे. कर्जत-जामखेडकरांसह अवघ्या राज्यभरातच या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड तालुक्यातील खर्ड्याच्या ऐतिहासिक शिवपट्टण किल्ल्यासमोर ‘स्वराज्य ध्वज प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम सुरू आहे.
हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ६ जून १६७४ रोजी झालेल्या राज्याभिषेकाचे स्मरण म्हणून या ध्वजाची उंची ७४ मीटर ठेवण्यात आली आहे. या ध्वजाचा आकार ९६X६४ फूट आहे. ध्वज स्तंभाचे वजन १८ टन असून नुसत्या ध्वजाचे वजन ९० किलो आहे. साडे पंचावन्न हजार चौरस फूट आकार असलेला हा ध्वज देशात सर्वांचे आकर्षण ठरला आहे. ध्वज प्रतिष्ठापना आणि ध्वजारोहणाच्या निमित्ताने या किल्ल्याची डागडुजी केली गेली आहे.