* प्रश्न: मी दर वर्षी विवरणपत्र वेळेवर भरतो. या वर्षी काही कारणाने मी हे विवरणपत्र ३१ जुलैपर्यंत भरू शकलो नाही. विवरणपत्र नंतर भरले तर चालेल का? मला काही दंड भरावा लागेल का?
– निमेश कुलकणी, ईमेल द्वारे
उत्तर : ज्या करदात्यांना त्यांच्या लेख्यांचे लेखापरीक्षण (ऑडिट) बंधनकारक नाही त्यांना कलम १३९(१) नुसार विवरणपत्र ३१ जुलैपर्यंत भरावे लागते. विवरणपत्र ३१ जुलैनंतर भरले तर कोणताही दंड भरावा लागत नाही. परंतु विवरणपत्र उशिरा भरले तर प्रामुख्याने तीन तोटे होतात (१) कलम २३४(ए) आणि २३४(बी) प्रमाणे देय कर रकमेवर व्याज भरावे लागते. कर देय नसेल तर व्याज भरावे लागत नाही. (२) करदात्याला जर त्या वर्षी तोटा झाला असेल तर तो पुढील वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करता येत नाही. यासाठी विवरणपत्र वेळेवर भरणे गरजेचे असते. याला अपवाद घराच्या उत्पन्नावर झालेला तोटा आहे (३) मुदतीनंतर भरलेले विवरणपत्र सुधारता येत नाही. विवरणपत्र भरताना काही चुका झाल्या असतील तर त्या सुधारण्याची तरतूद आहे, चुका सुधारून सुधारित विवरणपत्र भारता येते. परंतु हे विवरणपत्र उशिरा भरल्यास असे सुधारित विवरणपत्र भरता येत नाही.
या वर्षीच्या अर्थसंकल्पात पुढील वर्षांपासून मूळ विवरणपत्र उशिरा भरले तरी सुधारित विवरणपत्र दाखल करता येणार आहे अशी तरतूद करण्यात आली आहे.
तथापि, या वर्षी विहित ३१ जुलैची मुदत संपून गेली तर चिंतेचे कारण नाही, कारण या वर्षांसाठी विवरणपत्र भरण्याची मुदत ५ ऑगस्टपर्यंत वाढविली गेली आहे. म्हणून ५ ऑगस्टपर्यंत भरल्यास कलम २३४(अ) नुसार भरावे लागणारे व्याज भरावे लागणार नाही आणि तोटासुद्धा पुढील वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करता येईल. परंतु कलम २३४(ब) नुसार भरावे लागणारे व्याज मात्र भरावे लागणार आहे.
* प्रश्न: आमचा घाऊक/ किरकोळ ग्राहकोपयोगी वस्तूंच्या व्रिक्रीचा धंदा आहे. आमच्या धंद्याची आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये उलाढाल एक कोटीच्या आत आहे, पण सर्व खर्च वजा करता २.५० टक्के निव्वळ नफा मिळतो. तर मला ८ टक्के निव्वळ नफा दाखविणे बंधनकारक आहे का? याबाबत मार्गदर्शन करावे.
सुधीर, ईमेलद्वारे
उत्तर : प्राप्तिकर कायदा ‘कलम ४४ एडी’नुसार आपल्या धंद्याची उलाढाल १ कोटी रुपयांपेक्षा कमी असल्यास आपण विक्रीच्या ८ टक्के निव्वळ नफा हा करपात्र उत्पन्न दाखविल्यास आपल्याला लेखे ठेवणे बंधनकारक नाही आणि त्याचे लेखापरीक्षण सनदी लेखापालाकडून करणेसुद्धा बंधनकारक नाही. प्राप्तिकर कायद्यातील काही तरतुदींची पूर्तता करण्यात सूट मिळते. जर निव्वळ नफा उलाढालीच्या ८ टक्केपेक्षा कमी असेल तर लेखे ठेवून त्याचे लेखापरीक्षण करणे बंधनकारक आहे.
* प्रश्न: माझे सल्लागार म्हणून ३,५४,००० रुपयांचे उत्पन्न आहे. या रकमेवर ३१,५०० रुपयांचा उद्गम कर (टीडीएस) कापला गेला आहे. मी माझ्या मुलीच्या कॉलेजची ८०,५४० रुपये फी भरली आहे. याची मला सवलत मिळेल का? मला कापलेला संपूर्ण कर परत मिळेल का?
– विनायक, ईमेल द्वारे :
उत्तर : कॉलेजच्या फीची वजावट ‘कलम ८०सी’ नुसार घेता येते. या फीमध्ये शाळा किंवा कॉलेजला दिलेली देणगी, दंड, हॉस्टेल फी, वगैरेचा समावेश होत नाही. ज्या अभ्यासवर्गासाठी फी भरली असेल तो पूर्ण वेळ असला पाहिजे. भारताबाहेरील संस्थेला भरलेल्या फीवर मात्र ही सवलत मिळत नाही. या अटींची पूर्तता होत असेल तर ‘कलम ८० सी’नुसार वजावट घेता येते. या शिवाय हे उत्पन्न मिळविण्यासाठी झालेल्या खर्चाची वजावटसुद्धा आपणाला घेता येते. ही वजावट विचारात घेऊन आपले करपात्र उत्पन्न खालीलप्रमाणे :
व्यवसायातील उत्पन्न ३,५४,००० रुपये
वजा : उत्पन्न मिळविण्यासाठी झालेला खर्च (गृहीत) १०,००० रुपये
एकूण उत्पन्न ३,४४,००० रुपये
वजा : ‘कलम ८० सी’प्रमाणे वजावट ८०,५४० रुपये
करपात्र उत्पन्न २,६३,४६० रुपये
देय कर
प्रथम २,५०,००० रुपयांवर शून्य रुपये
बाकी १३,४६० रुपयांवर १० टक्के १,३४६ रुपये
एकूण कर १,३६४ रुपये
‘कलम ८७ ए’नुसार वजावट १,३६४ रुपये
देय कर शून्य रुपये
आपला देय कर शू्न्य असल्यामुळे उद्गम कराचा (टीडीएस) पूर्णपणे परतावा (रिफंड) मागता येईल.
* प्रश्न: मी जून २०१० मध्ये ७,२०,००० रुपयांना एक घर विकत घेतले होते, हे घर मी जानेवारी २०१६ मध्ये ७५,००,००० रुपयांना विकले यावर १ टक्केप्रमाणे उद्गम कर (टीडीएस) कापला गेला. मी हे पैसे फेब्रुवारी २०१६ मध्ये दुसऱ्या घरात ७०,००,००० रुपये इतके गुंतविले. मला या व्यवहारावर अजून कर भरावा लागेल का? – संपदा गिरकर, मुंबई
उत्तर : आपण जून २०१० मध्ये घेतलेले घर जानेवारी २०१६ मध्ये विकले या व्यवहारावर झालेला भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा आहे. यावर होणारा नफा खालीलप्रमाणे:
घराची विक्री किंमत : ७५,००,००० रुपये
घराची खरेदी किंमत ७,२०,००० रुपये
महागाई निर्देशकानुसार खरेदी मूल्य:
२०१०-११ सालचा महागाई निर्देशांक ७११
२०१५-१६ सालचा महागाई निर्देशांक १०८१
महागाई निर्देशकानुसार खरेदी मूल्य :
७,२०,००० १०८१ / ७११ = १०,९४,६८४
दीर्घ मुदतीचा भांडवली नफा = ६४,०५,३१६ रुपये
या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्याएवढी रक्कम किंवा त्यापेक्षा जास्त, नवीन घरात गुंतविली तर कलम ५४ प्रमाणे या नफ्यावर कर भरावा लागणार नाही. त्यामुळे घराच्या विक्रीवर झालेला ७५,००० रुपयांच्या उद्गम कराच्या (टीडीएस) परताव्याचा दावा विवरणपत्र भरून करता येईल.
* प्रश्न: माझे वय ६५ वर्षे आहे. आमचे रत्नागिरी येथे एक वडिलोपार्जित घर आहे. हे घर माझ्या आजोबांनी विकत घेतले होते. मी त्यांचा एकुलता एक वारस आहे. हे घर मला आता विकावयाचे आहे. यावर भांडवली नफ्यावर कर भरावा लागेल का? आणि तो कसा गणला जाईल? – प्रशांत गाडगीळ, ईमेलद्वारे
उत्तर : घर विक्रीवर झालेला दीर्घ मुदतीचा नफा हा करपात्र असतो. हे घर १ एप्रिल १९८१ पूर्वी घेतले असेल तर १ एप्रिल १९८१ सालच्या वाजवी बाजार मूल्यावर, महागाई निर्देशांक मूल्यानुसार येणाऱ्या खरेदी किमत आणि विक्री किंमत यामधील फरक हा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा असेल. जर घर १ एप्रिल १९८१ नंतर घेतले असेल तर महागाई निर्देशांक मूल्यानुसार येणाऱ्या खरेदी किंमत आणि विक्री किमत यामधील फरक हा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा असेल. दुसऱ्या घरात गुंतवणूक करून किंवा भांडवली नफा योजनेतील रोख्यांमध्ये गुंतवणूक करून हा कर वाचविता येऊ शकतो.

* प्रश्न: मी एका खासगी कंपनीचे शेअर्स जे मी जून २००२ साली १,५०,००० रुपयांना विकत घेतले होते. हे शेअर्स मी आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये ३४,००,००० रुपयांना विकले. या व्यवहारावर मला कर भरावा लागेल का? आणि जर भरावा लागेल तर किती भरावा लागेल? हा कर मला वाचविता येईल का?
– सचिन खोत, ईमेलद्वारे
उत्तर : हे शेअर्स खासगी कंपनीचे (खासगी म्हणजे शेअर बाजारात सूचिबद्ध नसलेली कंपनी असा अर्थ गृहित धरला आहे!) असल्यामुळे त्यावर होणारा नफा हा करपात्र असेल. या व्यवहारावर दीर्घ मुदतीचा नफा हा खालीलप्रमाणे :
शेअर्सची विक्री किंमत ३४,००,००० रुपये
शेअर्सची खरेदी किंमत १,५०,००० रुपये
महागाई निर्देशकानुसार खरेदी मूल्य :
२००२-०३ सालचा महागाई निर्देशांक ४४७
२०१५-१६ सालचा महागाई निर्देशांक १०८१
महागाई निर्देशकानुसार खरेदी मूल्य :
१,५०,००० १०८१ / ४४७ = ३,६२,७५२
दीर्घ मुदतीचा भांडवली नफा = ३०,३७,२४८ रुपये
या रकमेवर आपल्याला २०.६० टक्के (शैक्षणिक करासहित) इतका कर भरावा लागेल. हा कर वाचवायचा असेल तर भांडवली नफ्याएवढी म्हणजेच ३०,३७,२४८ रुपयांची गुंतवणूक भांडवली नफा रोख्यांमध्ये करावी लागेल किंवा विक्री किमतीएवढी म्हणजेच ३४,००,००० रुपये इतकी गुंतवणूक आपल्याला नवीन घरात करावी लागेल. यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागेल.
* प्रश्न: माझे कर्करोगावर उपचार चालू आहेत. या उपचारासाठी आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये १,७५,००० रुपये इतका खर्च झाला. माझा मेडिक्लेम विमा आहे. या विमाअंतर्गत मला १,२५,००० रुपये इतकी भरपाई मिळाली. बाकीच्या खर्चाचा विम्यामध्ये समावेश होत नसल्यामुळे त्याची भरपाई मिळाली नाही. मला प्राप्तिकर कायद्यात काही सूट मिळेल का?
– वर्षां सावंत, नाशिक
उत्तर : ‘कलम ८० डीडीबी’नुसार कर्करोगाच्या उपचारासाठी झालेल्या खर्चाची वजावट मिळते. या कलमांतर्गत उपचारासाठी झालेला खर्च किंवा ४०,००० रुपयांपर्यंतची (ज्येष्ठ नागरिकांना ६०,००० रुपयांपर्यंत) उत्पन्नातून वजावट मिळते. उपचारासाठी झालेल्या खर्चाची भरपाई विमा कंपनी किंवा नोकरदारांच्या मालकाने केली असेल तर त्या रकमेवर ही वजावट मिळत नाही. आपल्या बाबतीत एकूण खर्च १,७५,००० रुपये इतका झाला आहे. आपल्याला १,२५,००० रुपये इतकी भरपाई विमा कंपनीकडून मिळाली आहे. बाकी ५०,००० रुपये या कलमानुसार वजावटीस पात्र आहेत. आपले वय ६० वर्षांपेक्षा कमी असेल तर ४०,००० रुपयांची आणि ज्येष्ठ नागरिक असाल तर संपूर्ण ५०,००० रुपयांची वजावट आपण उत्पन्नातून घेता येईल. पुढील वर्षांपासून अति ज्येष्ठ नागरिकांसाठी (ज्यांचे वय ८० वर्षांपेक्षा जास्त आहे) ‘कलम ८० डीडीबी’नुसार वजावटीची मर्यादा ८०,००० रुपये इतकी करण्यात आली आहे.
* लेखक मुंबईस्थित सनदी लेखाकार असून, वाचक त्यांना pravin3966@rediffmail.com या ई-मेलवर आपले प्रश्न पाठवू शकतील.

Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…
home prices increase due to gst
नवीन वर्षात घरे महागणार? सरकारच्या नव्या प्रस्तावामुळे घरांच्या किमती वाढण्याची भीती
MPSC GR
MPSC च्या विद्यार्थ्यांना खूशखबर! कमाल वयोमर्यादेत वाढ; राज्य सरकारच्या जीआरमध्ये नेमकं काय म्हटलंय?
Ajit Pawar On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Ajit Pawar : भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांचं मोठं विधान; उपायाबाबत म्हणाले, “आम्ही आमच्या पद्धतीने…”!
rte admissions process
आरटीईमध्ये प्रवेश हवा, मग ही माहिती जाणून घ्या… ‘या’ तारखेपासून प्रक्रिया…
29 559 sarees are still pending in saree distribution scheme of Mahayuti
आचारसंहिता संपूनही मोफत साडी वाटपास मुहूर्त लागेना, उत्तर महाराष्ट्रात २९ हजार साड्या पडून
Story img Loader