भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती, पण त्या सामन्यात फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारताला न्यूझीलंड विरूद्ध पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेत भारतापुढे तुलनेने कमकुवत असलेल्या अफगाणिस्तानने भारताला नाकीनऊ आणले. अफगाणिस्तानने भारताला प्रथम फलंदाजी देत २२४ धावांवर रोखले होते. तर आव्हानाचा पाठलाग करत अफगाणिस्तानने २१३ धावांपर्यंत मजल मारली होती. या सामन्यात अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीने भारताला विजयासाठी चांगलेच झुंजवले होते. तोच मोहम्मद नबी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे.

मोहम्मद नबी

 

सध्या अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात एकमेव कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यानंतर मोहम्मद नबी कसोटी कारकिर्दीला रामराम ठोकणार आहे, अशी माहिती अफगाणिस्तान संघाचे व्यवस्थापक नझीम झार अब्दुर्रहीमझाई यांनी दिली. निर्धारित षटकांच्या सामन्यात अधिक काळ खेळता यावे आणि चांगली कारकिर्द घडवता यावी म्हणून त्याने असा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. अफगाणिस्तानच्या संघाला सध्या सुरू असलेल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी करण्यात आलेले नाही. ICC चे पूर्ण सदस्यत्व असलेले संघच या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

दरम्यान, विश्वचषक स्पर्धेतील भारत-अफगाणिस्तान सामन्यात मोहम्मद नबीने २ बळी तर टिपले होतेच. त्यासह मोहम्मद नबीने अर्धशतक करत चांगली झुंज दिली. त्याने सामन्यात शेवटच्या षटकापर्यंत नाबाद रहात भारताच्या नाकीनऊ आणले होते, पण शेवटच्या षटकात आवश्यक धावा मिळवण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला आणि अफगाणिस्तानला सामना गमवावा लागला.