Ind Vs Eng : इंग्लंड आणि भारतादरम्यान सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सध्या भारताने इंग्लंडपुढे ५२१ धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यात दुसऱ्या डावात भारताने डाव घोषित केला. या डावात भारताकडून विराट कोहलीने शतक ठोकले, तर चेतेश्वर पुजारा आणि हार्दिक पांड्या यांनी अर्धशतक केले. या तिघांच्या खेळीच्या बळावर भारताने इंग्लंडपुढे विशाल आव्हान ठेवले.
या डावात चेतेश्वर पुजाराला लय सापडली. त्याने ७२ धावा ठोकल्या. विराट कोहलीबरोबर त्याने भक्कम भागीदारी केली आणि भारताच्या डावाला आकार दिला. या खेळीबाबत पुजाराने आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘सामन्यात इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांपुढे खेळणे हे आव्हानात्मक आणि दबावाचे होते. पण कौंटी क्रिकेटमध्ये खेळण्यामुळे मला चांगली फलंदाजी करता आली’, असे मत मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा याने व्यक्त केले.
नेट्समध्ये सराव करताना मला नेहमी फलंदाजी करताना समाधान वाटायचे. चेंडू टोलवण्याचे तंत्र आणि वेळ मला चांगले जमले होते, असे मला सराव करताना जाणवले होते. त्यामुळे मला महत्वाच्या सामन्यात मला चांगली कामगिरी करण्यासाठी आत्मविश्वास मिळाला. या सामन्यात मी जो खेळ करू शकलो, त्यात माझ्या नेट्समधील सरावाचा मोठा वाटा होता. गरजेच्या वेळी ७२ धावांची खेळी केल्याने मला अधिक आनंद झाला, असेही पुजारा म्हणाला.