सलामीवीर मयांक अग्रवालने झळकावलेल्या द्विशतकाच्या जोरावर पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने धावांचा डोंगर उभा केला. विशाखापट्टणम कसोटी सामन्यावर भारतीय संघाने आपली मजबूत पकड बसवली. पहिल्या दिवशी बिनबाद २०२ धावांपर्यंत मजल मारल्यानंतर, दुसऱ्या दिवशीही भारतीय फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल यांनी आफ्रिकन गोलंदाजांवर प्रहार करत दमदार खेळी केली.

IND vs SA : रोहितच्या शतकाने साधला अनोखा योगायोग

मयांक अग्रवालने ३७१ चेंडूत २१५ धावा केल्या. त्याने कसोटी क्रिकेटमधलं पहिलं द्विशतक झळकावलं. तर रोहितने २४४ चेंडूत १७६ धावा केल्या. दोघांनीही आपल्या खेळीत २३ चौकार आणि ६ षटकार खेचले. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ३१७ धावांची भागीदारी केली. पण अखेरीस केशव महाराजच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित यष्टीचीत होऊन माघारी परतला. रोहित आणि मयांक हे दोघेही भारतात प्रथमच कसोटी सामन्यात सलामीवीर म्हणून आले होते. पण त्या दोघांनीही दमदार खेळ केला. त्यामुळे सामना खेळत नसणारा लोकेश राहुल उगाचच ट्रोल झाला.

 

दरम्यान, दुसऱ्या दिवशी चहापानापर्यंतच्या सत्रापर्यंत भारताने ५ गडी गमावत ४५० धावांपर्यंत मजल मारली होती. रोहित शर्मा माघारी परतल्यानंतर मयांकने अन्य फलंदाजांना हाताशी धरत फटकेबाजी सुरु ठेवली. कसोटी क्रिकेटमधलं आपलं पहिलं शतक झळकावणाऱ्या मयांकने या शतकी खेळीचं द्विशतकी खेळीत रुपांतर केलं. त्याने ३७१ चेंडूत २१५ धावांची खेळी केली. पण भारताच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी पहिल्या डावात थोडीशी निराशा केली. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे हे फलंदाज झटपट माघारी परतले. मात्र मयांकने एक बाजू लावून धरली.