भारताच्या जसप्रीत बुमराहने केलेल्या वेगवान माऱ्यापुढे दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिजची अवस्था ७ बाद ८७ अशी दयनीय झाली. जसप्रीत बुमराहने हॅटट्रीक घेत वेस्ट इंडिजचे सहा गडी  माघारी धाडले. त्यामुळे भारताकडे अद्याप ३२९ धावांची आघाडी आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत ४१६ धावांचा डोंगर उभारला. या डावात मयंक अग्रवाल, विराट कोहली आणि इशांत शर्मा या तिघांनी अर्धशतके झळकावली, तर हनुमा विहारीने दमदार शतक ठोकले.

या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा जसप्रीत बुमराह याने मोठा पराक्रम केला. कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक टिपणारा तिसरा भारतीय ठरण्याचा मान त्याला मिळाला. पण या मान त्याला विराट कोहलीमुळे मिळाला असून ही हॅटट्रिकदेखील कोहलीचीच आहे, असे एक विधान त्याने दिवसाचा खेळ संपल्यावर केले. विराट बुमराहची अनौपचारिक मुलाखत घेत असताना त्याने हे कबुल केले.

विराटच्या हॅटट्रिकच्या प्रश्नाला उत्तर देताना बुमराह म्हणाला की दोन गडी बाद झाल्यावर मी जेव्हा तिसरा चेंडू टाकला, तेव्हा तो चेंडू फलंदाजाच्या बॅटला लागून मग पॅडला लागला आहे असे मला वाटले. त्यामुळे मी चेंडू टाकून झाल्यावर अपील देखील केले नव्हते. पण कर्णधार म्हणून तू (विराट) रिव्ह्यूची मागणी केलीस आणि सुदैवाने ‘डीआरएस’मध्ये तो फलंदाज बाद ठरवण्यात आला. त्यामुळे खरं पाहता ही हॅटट्रिक कर्णधाराचीच आहे.

दरम्यान, वेस्ट इंडिजच्या सात गड्यांपैकी सहा गडी बुमराहने घेतले. त्यात बुमराहने वेस्ट इंडिजचा दुसरा, तिसरा आणि चौथा गडी बाद करून हॅटट्रिक पूर्ण केली. या पराक्रमासह तो कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला. या आधी फिरकीपटू हरभजन सिंगने ऑस्ट्रेलियाविरूद्ध तर इरफान पठाणने पाकिस्तानविरूद्ध हॅटट्रिक घेतली होती.