पुनर्गठित भारत-ब्रिटन मुख्याधिकारी मंचाच्या पहिल्यावहिल्या बैठकीत उभय देशांतील उद्योगधुरीणांपुढे बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देश आर्थिकदृष्टय़ा एकमेकांचे नैसर्गिक सांगाती असल्याचे प्रतिपादन केले. या बैठकीतून उभय देशांमध्ये कार्यरत कंपन्यांचे स्वामित्व हक्क विवाद मार्गी लागण्याबरोबरच, प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीचे करारमदार होणेही अपेक्षित आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्या १० डाऊनिंग स्ट्रीटस्थित कार्यालयाशेजारील सभागृहात आयोजित या बैठकीत भारतीय उद्योजकांच्या गटाचे नेतृत्व हे टाटा समूहाचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी केले. तर बैठकीला हजेरी लावणाऱ्या उद्योजकांमध्ये भारती एंटरप्राइजेसचे सुनील भारती मित्तल, टीसीएसचे मुख्याधिकारी व व्यवस्थापकीय संचालक एन. चंद्रशेखरन आणि भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांचा समावेश होता.
पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान कॅमेरून या दोन्ही देशांच्या प्रमुखांनी बैठकीसंबंधाने प्रसृत केलेल्या संयुक्त पत्रकात, व्यापार आणि गुंतवणूकविषयक उद्योगक्षेत्रांच्या सूचना व शिफारशींबाबत दोन्ही पंतप्रधानांचे उचित दिशादर्शनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बैठक असे तिचे वर्णन केले. ब्रिटनच्या नियोजित दौऱ्याला निघण्यापूर्वी विविध १५ उद्योगक्षेत्रांतील प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीची मर्यादा शिथिल करण्याच्या निर्णयाचा हवाला देत पंतप्रधान मोदी यांनी भारत हे विदेशी गुंतवणुकीचे सर्वोत्तम केंद्र असल्याचे सांगितले. भारतातील अक्षय्य ऊर्जा आणि पायाभूत सोयीसुविधा क्षेत्रात ब्रिटिश कंपन्यांची गुंतवणूक ही दोन्ही देशांसाठी ‘सफल भागीदारी’ची राहील, असेही त्यांनी प्रतिपादन केले.
भारतीय आणि ब्रिटिश नागरिक यांची परस्परांशी सहज सुसंगती हा संवादांतील एक महत्त्वाचा गुणविशेष असून, आर्थिक आदानप्रदानाचाही तो पाया ठरेल, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी उद्योगक्षेत्रांतील या वाटाघाटींचे स्वागत केले. ते म्हणाले, ‘‘मेक इन इंडिया मोहिमेचा प्रमुख कणा म्हणून संरक्षण क्षेत्राला लागणाऱ्या सामग्रीचे देशांतर्गत निर्माणावर आमचा भर आहे. आमची रेल्वे स्थानकेही आम्ही खासगी-सार्वजनिक भागीदारीच्या तत्त्वावर विकसित करू पाहत आहोत.’’

व्होडाफोनकडून १३००० कोटींची गुंतवणूक
भारतात अनेक प्रकारच्या कर विवादांचे जंजाळ मागे लागले असतानाही ब्रिटिश दूरसंचार कंपनी व्होडाफोनने १.३ अब्ज पौंडाची (सुमारे १३००० कोटी रुपये) गुंतवणुकीचा मानस व्यक्त करणे हे या बैठकीचे सर्वात मोठे फलित ठरले. पंतप्रधानांच्या ब्रिटन दौऱ्याच्या पहिल्या दोन दिवसांत विविध २८ व्यवसाय ते व्यवसाय स्वरूपाचे आणि तब्बल ९.२ अब्ज पौंड मूल्याचे करारमदार घडून आले आहेत.

१००० ब्रिटिश पदवीधरांना टीसीएसकडून प्रशिक्षण
देशातील सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रातील अग्रणी टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसने ब्रिटिश कौन्सिलशी भागीदारी करीत तेथील विद्यापीठातून बाहेर पडणाऱ्या १००० पदवीधरांना आपल्या नावीन्यता प्रयोगशाळा आणि सॉफ्टवेअर विकास केंद्रात सामावून घेऊन प्रशिक्षित करण्याची घोषणा शुक्रवारी केली. भारतभरातील या केंद्रातून २०१६ ते २०२० दरम्यान हे प्रशिक्षण सुरू राहील. ब्रिटनमधील वेगाने विस्तारत असलेल्या आयटी क्षेत्रात या प्रशिक्षित पदवीधरांना नंतर सेवेत सामावून घेतले जाईल.