India vs England 4th test Live Update : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने ८ बाद २६० धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावातही भारताच्या गोलंदाजांना झुंजवले. त्यामुळे इंग्लंडकडे आता २३३ धावांची आघाडी आहे. इंग्लंडने आज पहिल्या सत्रात ३, दुसऱ्या सत्रात २ तर चहापानानंतर ३ गडी गमावले. भारताकडून मोहम्मद शमीने ३, इशांत शर्माने २ तर बुमराह आणि अश्विनने १-१ बळी टिपला.
काल दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने बिनबाद ६ धावा केल्या होत्या. त्यापुढे खेळताना आज पहिल्या सत्रात अॅलिस्टर कूक, मोईन अली आणि कीटन जेनिंग्स हे तीन गडी इंग्लंडने गमावले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात उपहारानंतर लगेचच इंग्लंडला चौथा धक्का बसला. जॉनी बेअरस्टो शून्यावर त्रिफळाचीत झाला. कर्णधार जो रूटदेखील ४८ धावांवर धावचीत झाला. पण अखेर स्टोक्स-बटलर जोडीने डाव सावरला. तिसऱ्या सत्रात मात्र आधी स्टोक्स (३०) तंबूत परतला. नंतर बटलर ६९ धावांवर बाद झाला. त्यानंतर आदिल रशीद बाद झाला आणि दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. आता सॅम कुर्रान नाबाद ३७ धावांवर खेळत आहे.
त्याआधी भारताचा पहिला डाव २७३ धावांवर आटोपला. चेतेश्वर पुजाराने एकाकी झुंज देत नाबाद १३२ धावांची खेळी केली. पण त्याला इतर फलंदाजांची अपेक्षित साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताला डावाअखेरीस केवळ २७ धावांची आघाडी मिळवता आली. पहिल्या दिवसअखेर भारताने बिनबाद १९ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्या सत्रात भारताने शिखर धवन (२३) आणि लोकेश राहुल (१९) असे दोन गडी गमावले. हे दोघेही ब्रॉडच्या गोलंदाजीवर बाद झाले. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली या जोडीने डाव सावरला. पण दुसऱ्या सत्रात कोहली ४६ धावांवर बाद झाला. पाठोपाठ उपकर्णधार अजिंक्य रहाणे ११ तर नवोदित ऋषभ पंत ० धावांवर माघारी परतला. त्यामुळे चहापानापर्यंत भारताची अवस्ठा ५ बाद १८१ अशी झाली होती. तिसऱ्या सत्रातही फिरकीपटू मोईन अलीने आपल्या फिरकीची जादू कायम ठेवली. त्याने हार्दिक पांड्या (४), अश्विन (१) आणि मोहम्मद शमी (०) यांना झटपट तंबूत धाडले. बुमराने पुजाराला चांगली साथ दिली. पण अखेर तो बाद झाला. इंग्लंडकडून मोईन अलीने ५, ब्रॉडने ३ तर स्टोक्स आणि कुर्रानने १-१ बळी टिपला.
त्याआधी काल इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद २४६ धावा केल्या. या सामन्यात संधी मिळालेल्या सॅम कुरानने आपली निवड सार्थ ठरवत भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. त्याने १३६ चेंडूंत ७८ धावांची झुंजार खेळी केली. त्याला मोईन अलीने चांगली साथ दिली. पहिल्या डावात भारताकडून बुमराहने ३, इशांत शर्मा, मोदम्मद शमी आणि अश्विनने प्रत्येकी २ आणि पांड्याने १ बळी टिपला.
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने ८ बाद २६० धावांपर्यंत मजल मारली. आता इंग्लंडकडे २३३ धावांची आघाडी आहे.
बटलरचे अर्धशतक, इंग्लंडची दोनशेपार मजल
पहिल्या सत्रातील पडझडीनंतर स्टोक्स आणि बटलरने इंग्लंडला सावरले. त्यामुळे चहापानापर्यंत इंग्लंड ५ बाद १५२ अशा स्थितीत आहे.
कर्णधार जो रूटचे अर्धशतक हुकले, इंग्लंडचा निम्मा संघ माघारी
उपहारानंतर लगेचच इंग्लंडला चौथा धक्का बसला. जॉनी बेअरस्टो त्रिफळाचीत झाला. शमीने घेतला दुसरा बळी
जेनिंग्स-रूट जोडीच्या अर्धशतकी भागीदारीने इंग्लंडचा डाव सावरला होता. पण अर्धशतकी भागीदारीनंतर सलामीवीर जेनिंग्स माघारी परतला. त्यामुळे उपहारापर्यंत इंग्लंडची धावसंख्या ३ बाद ९२ अशी झाली आहे.
दुसऱ्या डावात मोईन अलीला लवकर फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय फसला. मोईन अलीच्या रूपाने इंग्लंडचा दुसरा गडी माघारी परतला. इशांत शर्माने त्याला बाद केले.
इंग्लंडला पहिला धक्का बसला. दुसऱ्या डावातही अनुभवी अॅलिस्टर कूक अपयशी ठरला. जसप्रीत बुमराहने घेतला डावातील पहिला बळी.