डॉलरच्या तुलनेत साठीपार प्रवास करणाऱ्या रुपयाला सावरण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने गेल्या महिन्यात दोनदा केलेल्या उपाययोजना परिणामशून्य ठरताना दिसत आहेत. स्थानिक चलनाने शुक्रवारी प्रति डॉलर ६१.१० असा नवा सार्वकालिक नीचांक नोंदविला. रुपया शुक्रवारी ६७ पैशांनी कमकुवत बनला.
२५ मेपासून भारतीय चलनाचा ६० कडील प्रवास सुरू राहिला आहे. तर रुपयाने दिवसाच्या व्यवहारात ६१.२१ असा सर्वात खालचा तळ ८ जुलै रोजी गाठला होता, तर बंद होताना २६ जून रोजी ६०.७२ असा ऐतिहासिक नीचांक रुपयाने नोंदविला आहे. सलग दोन दिवसांच्या घसरणीने रुपया ७० पैशांनी खालावला आहे. चालू आठवडय़ातच चलनाने प्रति डॉलर १०६ पैशांनी गटांगळी घेतली आहे.
भांडवली बाजारातील विदेशी संस्थागत गुंतवणुकीचा ओघ कायम आहे. त्यासाठी तसेच आयातदारांकडून अमेरिकन चलनाला असलेली मागणी दिवसेंदिवस विस्तारत चालल्याचे चित्र आहे. याकामी रुपयाच्या घसरणीला रोखू पाहणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या दुहेरी उपाययोजना गेल्या महिन्याने अनुभवल्या. तरीदेखील रुपया शुक्रवारी ६०.१० अशा नव्या तळात घुसलाच. सुरुवातीच्या व्यवहारात ६०.६१ नरम असणाऱ्या रुपयाने लगेचच ६१चा खालचा स्तर गाठला आणि दिवसभरात तो ६१.१७ पर्यंत खालावला. अखेर कालच्या तुलनेत त्याने तब्बल ६७ पैशांची आपटी घेत ६०.१० असा नवा नीचांक नोंदविला. दरम्यान त्याने दिवसभरात ६०.५८ अशी झेप घेतली मात्र दिवसअखेर विक्रमी तळ गाठण्यापासून तो परतला नाही.
तरलता नियंत्रण उपायांत  तूर्त माघार नाही : सुब्बराव
रुपयातील घसरण सावरण्यासाठी गेल्या महिन्यात दोनदा केलेले रोख-तरलता नियंत्रणाचे उपाय नजीकच्या दिवसात तरी माघारी घेता येणार नाही, असे स्पष्ट संकेत रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी दिले. हैदराबाद येथील एका व्याख्यानादरम्यान बोलताना सुब्बराव यांनी सांगितले की, रुपया जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत बँकांसाठी संकुचित करण्यात आलेली रोकड सुलभता खुली केली जाणार नाही. चलन दरातील अस्थिरता ही विकासाच्या दृष्टीने हानीकारक असून त्यात स्थिरता लवकरच दिसून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.