केंद्रात नवे स्थिर सरकार येण्याच्या आशेवर सर्वोच्च शिखराला पोहोचलेल्या भांडवली बाजाराबाबत गुंतवणूकदारांचा उत्साह शिगेला पोहोचला असून यातून बाजाराबाबत छोटे गुंतवणूकदाराही आशादायक चित्र रंगवू लागले आहेत. पुढील दशकभरात गुंतवणुकीच्या उत्तम संधी उपलब्ध होतील, असा विश्वास ‘फ्रँकलिन टेम्पल्टन’ने केलेल्या सर्वेक्षणात व्यक्तिगत (रिटेल) गुंतवणूकदारांनी व्यक्त केला आहे. तर विदेशी गुंतवणूकदारांच्या नजरेतही भारतीय भांडवली बाजार हा आशियाई बाजारातील दुसऱ्या क्रमांकाचा बाजार राहील, असे हे सर्वेक्षण सांगते.
‘फ्रँकलिन टेम्पल्टन ग्लोबल इन्व्हेस्टर सेंटिमेन्ट’ नावाने करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात भांडवली बाजाराबाबत भारतासह विविध २२ देशांतील सुमारे १,११,११३ गुंतवणूकदारांचे मत जाणून घेण्यात आले. विद्यमान स्थितीबरोबरच आगामी दहा वर्षांतील या बाजारातील कलहही याद्वारे ज्ञात करून घेण्यात आला. यात भारतीय गुंतवणूकदारांनी मालमत्ता, समभाग आणि मौल्यवान वस्तूंचे दर आगामी कालावधीत चढेच राहतील, असे निरीक्षण नोंदविले. दीर्घ कालावधीसाठी भारताला आर्थिक उद्दिष्टे गाठण्यात यश येईल, असे तब्बल ९७ टक्के गुंतवणूकदारांनी मत मांडले.
२००८-०९ मधील जागतिक आर्थिक मंदीची आठवण अद्यापही आंतरराष्ट्रीय स्तरावर गुंतवणूकदारांच्या मनी कायम आहे. म्हणूनच आगामी कालावधीत त्यांची जोखीम स्वीकारण्याची तयारी कमी आहे. जगातील ५२ टक्के गुंतवणूकदारांनी धोरणात्मक निर्णय घेऊन अल्प परताव्यावर समाधानी राहण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ५७ टक्के गुंतवणूकदार याबाबत अगदी तटस्थ आहेत. सर्वेक्षण करण्यात आलेल्या पाचपैकी चार गुंतवणूकदारांनी यंदा आर्थिक उद्दिष्ट गाठले जाईल, असे म्हटले आहे. यंदा भांडवली बाजार उत्तम कामगिरी करेल, असे वाटत असले तरी जोखमेबाबत गुंतवणूकदार अधिक तटस्थ असल्याचे जाणवते, असे ‘फ्रँकलिन टेम्पल्टन’चे हर्षेलू बिंदल यांनी म्हटले आहे. भारतात गुंतवणुकीसाठी बांधकाम कंपन्यांचे समभाग तसेच माध्यमे ही क्षेत्रे उत्तम असल्याचेही सर्वेक्षणात म्हटले आहे. सोने-चांदी पाठोपाठ म्युच्युअल फंडही सर्वेक्षणानुसार आकर्षक ठरतील. एकूण २०१४मध्ये भांडवली बाजाराच्या निर्देशांकाची सरस वाढ होईल, असे ८२ टक्के सहभागींनी म्हटले आहे. यापुढे दशकभर गुंतवणुकीसाठी संधी असल्याच्या विश्वासावर भारतीय शेअर बाजार पसंतीच्या बाबतीत आशियात दुसरे स्थान पटकावेल, असेही अहावालने नमूद केले आहे. परताव्याच्या दृष्टीनेही २०१३च्या तुलनेत २०१४ हे वर्ष लाभदायी ठरू शकते, असेही या अहवालाचे मत आहे.
शेअर बाजाराबाबत गुंतवणूकदारांमध्ये ‘विश्वासा’ची पेरणी
केंद्रात नवे स्थिर सरकार येण्याच्या आशेवर सर्वोच्च शिखराला पोहोचलेल्या भांडवली बाजाराबाबत गुंतवणूकदारांचा उत्साह शिगेला पोहोचला असून यातून बाजाराबाबत छोटे गुंतवणूकदाराही आशादायक चित्र रंगवू लागले आहेत.
First published on: 15-04-2014 at 12:06 IST
Web Title: Investors hope in new india government