कावेरी पाणीवाटपावरुन तामिळनाडूत बिघडेलेल्या राजकीय वातावरणामुळे, अकराव्या हंगामात आयपीएल चेन्नईबाहेर हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन हंगामात चेन्नई सुपर किंग्ज पुण्याच्या मैदानात आपले घरचे सामने खेळणार आहे. मात्र त्याआधीच चेन्नईचा महत्वाचा फलंदाज सुरेश रैना पोटरीला झालेल्या दुखापतीमुळे १० दिवस संघाबाहेर गेला आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जला पुढचे दोन सामने सुरेश रैनाशिवाय खेळावे लागणार आहेत.

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात सुरेश रैनाच्या पोटरीला दुखापत झाल्याचं समजतं आहे. या सामन्यात रैना अवघ्या १४ धावा काढून माघारी परतला. त्यामुळे झालेल्या दुखापतीमुळे रैना किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाहीये. याआधी केदार जाधवही दुखापतीमुळे चेन्नई संघातून बाहेर पडला आहे. रैना आणि जाधव व्यतिरीक्त चेन्नई सुपर किंग्जचे मुरली विजय आणि फाफ डु प्लेसीस हे देखील दुखापतीमधून सावरत आहेत.

पहिल्या सामन्यात गतविजेते मुंबई इंडियन्स आणि त्यानंतर कोलकाता नाईड रायडर्सला पराभूत करत चेन्नईने अकराव्या हंगामाची सुरुवात धडाकेबाज पद्धतीने केली आहे. कोलकात्याविरोधात चेन्नईने २०३ धावांचं आव्हान पार करत आपला संघ यंदा विजयासाठीच मैदानात उतरला असल्याचं दाखवून दिलं.

Story img Loader