जवान प्रकाश उर्फ भोजराज पुंडलिक जाधव (वय २८) यांना जम्मू काश्मीर येथे दहशतवाद्यांशी दोन हात करताना वीरमरण आले. मंगळवारी पहाटे जम्मूतील अनंतनागमध्ये सीमाभागात झालेल्या चकमकीत प्रकाश जाधव यांच्या पायाला गोळी लागली. त्या जखमेतून प्रचंड रक्तस्त्राव झाला. प्रकाश जाधव हे निपाणीजवळील बुद्धीहाळ येथील रहिवाशी होते. प्रकाश यांना वीरमरण प्राप्त झाल्याची माहिती मिळताच बुद्धीहाळसह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

बुद्धीहाळ येथील भोजराज जाधव हे काही वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते. दीड वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना दोन महिन्यांची मुलगीही आहे. त्यांनी आतापर्यंत विविध ठिकाणी सेवा बजावली होती. काही महिन्यांपूर्वीच जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथील सीमेवर त्यांची बदली झाली होती. दिवाळीसाठी त्यांनी एक महिन्याची सुट्टी बुद्धीहाळ गावात घालवली होती. ते पुन्हा अनंतनाग येथे रुजू झाले होते. अनंतनाग येथून आपली खुशाली त्यांनी दोन दिवसांपूर्वी कुटुंबातील सदस्यांना कळविली होती.

मंगळवारी रात्री अनंतनाग भागात अतिरेक्यांनी बेछूट गोळीबर केला. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी जाधव यांच्यासह सहकाऱ्यांनीही प्रयत्न केला. यावेळी एक अतिरेकीही ठार झाला. यामध्ये प्रकाश जाधव यांना वीरमरण आले. याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना बुधवारी सकाळी देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातील सर्वच व्यवहार बंद ठेवण्यात आले. त्यांच्या मागे आई- वडील भाऊ, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.

Story img Loader