मेलबर्नच्या तिसऱ्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला नमवून विजयपताका फडकावली. या यशाचे श्रेय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला जाते. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अखेरच्या षटकांत प्रतिस्पर्धी संघाला जखडून ठेवणारा गोलंदाज अशी ओळख बुमराने वर्षभरापूर्वी कसोटी पदार्पण करेपर्यंत निर्माण केली होती. गोलंदाजी करतानाची त्याची शैली जरी वेगळी असली तरी अचूक यॉर्कर टाकण्याची क्षमता लाजवाब होती. त्यामुळेच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी आणि आयपीएलच्या व्यासपीठावर तो मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा गोलंदाज ठरला. त्या वेळी क्रिकेटमधील जाणकारांनी हा कसोटी क्रिकेटसाठी योग्य गोलंदाज नाही, असे मत त्याच्याविषयी प्रकट केले होते; परंतु त्याने यंदाच्या कॅलेंडर वर्षांत तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक ७८ बळी मिळवत त्यांचे म्हणणे खोटे ठरवले आहे. त्यामुळेच मेलबर्नच्या विजयानंतर बुमरा हा ‘जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे’, असे कौतुक भारतीय कर्णधार विराट कोहलीने केले.

ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत भारत सध्या २-१ असा आघाडीवर आहे. २०१८ मध्ये भारताने दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचेही दौरे केले. परदेशामधील भारताच्या उंचावलेल्या कामगिरीमध्ये वेगवान माऱ्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. बुमरासह अनुभवी इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पंडय़ा यांनी परदेशी वातावरणाशी जुळवून घेत तिथे दिमाखात गोलंदाजी केल्याचे अनपेक्षित चित्र भारतीय क्रिकेटरसिकांना पाहायला मिळाले. अन्यथा, देशात फिरकीला अनुकूल खेळपट्टय़ांवर मर्दुमकी गाजवायची आणि परदेशात विशेषत: ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका यांच्यासारख्या वेगवान खेळपट्टय़ांवर हाराकिरी पत्करायची हाच भारतीय संघाचा रिवाज. कपिलदेव, जवागल श्रीनाथ, झहीर खान यांच्यासारखे दर्जेदार वेगवान गोलंदाज भारतात घडले; पण हे तिघेही एकांडे शिलेदार ठरले. त्यांना तोलामोलाची साथ मिळू शकली नाही आणि भारताच्या वेगवान माऱ्याचा दबदबाही कधीच निर्माण होऊ शकला नाही; पण आता भारताचा वेगवान मारा ऑस्ट्रेलियात वर्चस्वपूर्ण कामगिरी करीत आहे. एके काळी वेस्ट इंडिजकडे वेगवान गोलंदाजीचा तोफखाना होता. त्यांच्या वैविध्यपूर्ण माऱ्यापुढे जगातील मातबर फलंदाजांना धडकी भरायची. भारताच्या वेगवान माऱ्यानेही आपला एक रुबाब क्रिकेटमध्ये निर्माण केला आहे.

पर्थच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ चार वेगवान गोलंदाजांसह खेळला होता. बुमराचा गोलंदाजी करण्याचा सरासरी वेग हा १४२ किमी प्रतितास इतका आहे. अ‍ॅडलेड ओव्हलच्या पहिल्या कसोटीत तर त्याने ताशी १५३.२६ किमी वेगाने चेंडू टाकल्याची नोंद आहे. म्हणजेच वेगाच्या बाबतीत मिचेल स्टार्क किंवा पॅट कमिन्सइतकाच तो वेगाने गोलंदाजी करतो. आयपीएल वा झटपट सामन्यांपेक्षाही कसोटी क्रिकेटला प्राधान्य देणारा बुमरा हा भारताची संघशक्ती वाढवणारा गोलंदाज आहे!

Story img Loader