उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्भूमीवर योगी सरकारचा नाव बदलण्याचा कार्यक्रम सुरूच आहे. योगी सरकारने आता झाशी रेल्वे स्थानकाचे नाव बदलले आहे. आतापासून हे स्थानक वीरांगना लक्ष्मीबाई स्थानक म्हणून ओळखले जाईल. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे की यूपीमधील झाशी रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन’ असे करण्यात आले आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून अधिकृत आदेश प्राप्त होताच विभागीय रेल्वे प्रशासन नाव बदलण्याची विभागीय प्रक्रिया सुरू करणार असल्याचे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. आताचे, झाशी हे नाव पुढील काही दिवस तसेच राहील. या अंतर्गत, स्टेशन कोड देखील बदलला जाईल. झाशी रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव तीन महिन्यांपूर्वी गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता.

भाजपाचे राज्यसभा खासदार प्रभात झा यांच्यासह अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींनी काही वर्षांपूर्वी झाशी येथे झालेल्या रेल्वे बैठकीत झाशीला राणी लक्ष्मीबाई यांचे नाव देण्याची मागणी केली होती. त्याचवेळी या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर झाशीचे खासदार अनुराग शर्मा म्हणाले की, बुंदेलखंडच्या लोकांसाठी ही अभिमानाची बाब आहे. यामुळे बुंदेलखंडला आर्थिक फायदाही होईल. राज्यात पर्यटनाच्या शक्यता वाढणार आहेत.

केंद्र सरकारने हा प्रस्ताव मान्य केल्यानंतर नाव बदलण्याच्या यादीत झाशी रेल्वे स्थानक सर्वात नवीन ठरले आहे. झाशी रेल्वे स्टेशन २०२२ मध्ये १३३ वर्षांचे होईल. हे स्थानक १८८९ मध्ये स्थापन झाले. तत्पूर्वी, योगी आदित्यनाथ सरकारने फैजाबादचे नाव बदलून अयोध्या, अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज आणि मुगलसराय रेल्वे जंक्शनचे नाव बदलून पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन केले आहे. उत्तरप्रदेशशिवाय संपूर्ण देशात नाव बदलाचा खेळ सुरू आहे. अलीकडेच मध्यप्रदेशातील हबीबगंज रेल्वे स्थानकाचे नावही बदलून राणी कमलापती असे करण्यात आले आहे.