अमित सामंत

जोधपूरमध्ये मेहरानगडकडे जाणारी नई सडक क्लॉक टॉवरमार्गे जाते. हा क्लॉक टॉवर पार करून पुढे गेल्यावर उजव्या बाजूला एक ऑम्लेट शॉप आहे. लोन्ली प्लॅनेटसह अनेक परदेशी पुस्तकांनी गौरवलेल्या या दुकानात अंडय़ांचे विविध प्रकार मिळतात. उकडलेल्या अंडय़ापासून, फ्लपी ऑम्लेट, टोस्ट ऑम्लेट, पोटॅटो ऑम्लेटपर्यंत असंख्य प्रकार इथे मिळतात. नई सडक आणि क्लॉक टॉवरजवळील बाजारात अनेक स्थानिक कलाकुसरीच्या वस्तू, मोजडी इत्यादी मिळतात. त्यामुळे देशी, विदेशी पर्यटकांची गर्दी असते. नई सडकच्या टोकाला शाही समोसा नावाचे जोधपूरमधले समोसा आणि मसाला मिरचीचे स्थानिकांमध्ये लोकप्रिय असलेले दुकान आहे. जोधपूरमध्ये नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी लाल मांस, म्हणजे बकऱ्याचे लाल मसाल्यात केलेले मटण! रोटीबरोबर मटण खाल्ल्यावर जोधपूरकरांच्या सवयीप्रमाणे गोड खाणे आवश्यक आहे.

कैर सांग्री ही इथली स्थानिक भाजी, वाळवंटात उगवणाऱ्या खुरटय़ा काटेरी झुडपांवर येणाऱ्या शेंगा खुडून त्यापासून भाजी आणि लोणचे बनवले जाते. ही भाजी गोळा करण्यासाठी लागणाऱ्या कष्टांमुळे ती अतिशय महाग असते. नई सडकच्या वरच्या प्रिया रेस्टॉरंटमध्ये ही भाजी खायला मिळते.

Story img Loader