बॉलिवूड क्वीन कंगना रनौतचा आगामी ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी’ हा चित्रपट परत एकदा वादात सापडला आहे. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण होतांना दिसत आहे. एकानंतर एक वाद झाल्यानंतर आता चित्रपटाच्या क्रु मेंबर्सने चित्रपट निर्मात्यांवर पैसे थकविल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या समोर नवं संकंट उभं राहिलं आहे. ‘मणिकर्णिका’च्या निर्मात्यांनी जवळपास १.५ कोटी रुपये थकविल्याचा आरोप या क्रू मेंबर्सनी केला आहे.
चित्रपट निर्मात्यांनी पैसे देण्याचं केवळ आश्वासन दिलं मात्र आजपर्यंत त्यांनी पैसे न दिल्याचा आरोप या क्रु मेंबर्सने केला आहे. त्यामुळेच चित्रपट निर्माते आणि त्यांच्यात वाद निर्माण झाला आहे. गेल्या ३ महिन्यांपासून चित्रपटासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे अजूनही पैसे दिले नसून ज्यूनिअर कलाकारांचेही २५ लाख रूपये देणे बाकी असल्याचे, वेस्टर्न इंडियाच्या सिने कर्माचाऱ्यांच्या संघाने म्हटलं आहे.
चित्रपट निर्माते कमल जैन यांना याबाबत विचारणा करण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. याबाबत आता मजूर समितीशी संपर्क साधण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये एकानंतर एक विघ्न येतच आहेत. आधी चित्रपटाच्या कथानकाला विरोध झाला, त्यानंतर दिग्दर्शकांनी चित्रपट सोडला आणि जेव्हा कंगनाने दिग्दर्शनाची धुरा आपल्या खांद्यांवर घेतली, तेव्हा अभिनेता सोनू सूदने चित्रपटातून काढता पाय घेतला. इतकंच नाही तर यानंतर दिग्दर्शक क्रिश यांनी ‘मणिकर्णिका’ हा चित्रपट सोडल्याचं सामोर आलं होतं. त्यातच आता या क्रु मेंबर्सने केलेल्या या आरोपांमुळे चित्रपटाच्या मार्गात नवा अडथळा निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.