छडी लागे छमछम, विद्या येई घमघम असं म्हणतात…पण उत्तर चुकलं म्हणून शिक्षकाने तिच लाकडी छडी विद्यार्थ्याच्या घशात घुसवल्याचं कधी ऐकलंय का…मुंबईच्या कर्जतमध्ये ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथे इयत्ता दुसरीमध्ये शिकणा-या एका विद्यार्थ्याला शिक्षकाने विचारलेल्या प्रश्नाचं चुकीचं उत्तर देणं चांगलंच महागात पडलं आहे. चुकीचं उत्तर दिलं म्हणून येथे शिक्षकाने विद्यार्थ्याच्या घशातच चक्क लाकडी छडी घुसवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, मंगळवारी ही घटना घडली. कर्जत पोलीस स्थानकातील पोलीस अधिकारी एस.बी म्हेत्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळागावच्या जिल्हा परिषद शाळेतील ही घटना आहे. मंगळवारी इयत्ता दुसरीमध्ये शिकणा-या रोहन जंजीरे याला शिक्षक चंद्रकांत सोपान शिंदेंनी गणिताचा प्रश्न विचारला. रोहनला प्रश्नाचं बरोबर उत्तर देताना आलं नाही, त्यावर शिक्षकाचा चांगलाच संताप झाला.
चुकीचं उत्तर देण्याचा शिक्षकाला ऐवढा राग आला की त्यांनी आपली लाकडी छडी उचलली आणि रोहनच्या थेट गळ्यात त्यांनी घुसवली. त्यामुळे रोहनला श्वास घेण्याच्या नलिकेला प्रचंड त्रास झाला. या घटनेनंतर रोहनला बोलताही येत नव्हते व तो थेट जमिनीवर कोसळला. त्यानंतर शाळा प्रशासनाला हा प्रकार समजला व विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रकृती गंभीर असल्याने तेथील डॉक्टरांनी त्याला पुण्याला हलवण्याचा सल्ला दिला. सध्या हा विद्यार्थी पुण्याच्या रुग्णालयात असून आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान आरोपी शिक्षकाला शाळा प्रशासनाने निलंबीत केलं असून घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्याच्याआईने आरोपी शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली असून शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप शिक्षकाला अटक करण्यात आलेली नाही.