निकोलस पूरनचे अर्धशतक आणि त्याला वॉल्श ज्युनियर याची नाबाद खेळी याच्या बळावर वेस्ट इंडिजने दुस-या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडचा १ गडी राखून पराभव केला. या विजयासह वेस्ट इंडिजने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. दमदार कामगिरी करणारा युवा गोलंदाज अल्झारी जोसेफ हा सामनावीर ठरला.

सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत निर्धारित ५० षटकांत ९ बाद २३७ धावा केल्या. आयर्लंडकडून फलंदाजीत पॉल स्टर्लिंग याने सर्वाधिक ६३ धावा केल्या. सिमी सिंग (३४), केविन ओ ब्रायन (३१) आणि विलियम पोर्टरफील्ड (२९) यांनीही काही काळ झुंज दिली. त्यामुळे आयर्लंडला द्विशतकी मजल मारता आली. वेस्ट इंडिजकडून गोलंदाजीत अल्झारी जोसेफने ३२ धावांत ४ बळी तर शेल्डन कॉट्रेलने ५१ धावांत ३ गडी बाद केले.

२३८ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज कडून निकोलस पूरनने ५२ धावा ठोकल्या. त्याला कायरन पोलार्ड (४०), शे होप (२५) आणि हेल्डन वॉल्श ज्युनियर (नाबाद ४६) यांनी सुंदर साथ दिली. या साऱ्यांच्या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने ४९.५ षटकांत ९ बाद २४२ धावा करत मालिकेतील दुसरा विजय नोंदविला आणि मालिकेत विजयी आघाडी घेतली. आयर्लंडकडून गोलंदाजीत सिमी सिंगने ३, अँडी मॅक ब्रायन आणि बॅरी मॅककार्थीने प्रत्येकी २ गडी बाद केले.