एखाद्या व्यक्तीच्या कर्तव्यनिष्ठेविषयी चर्चा सुरु असताना, काही जणांच्या तोंडून ड्युटी फर्स्ट हे शब्द बाहेर पडतात. ड्युटी फर्स्ट म्हणजे अन्य संसारीक जबाबदाऱ्यांऐवजी नोकरीच्या ठिकाणी कामाला पहिले प्राधान्य. अर्थ मंत्रालयात डेप्युटी मॅनेजर पदावर काम करणाऱ्या कुलदीप कुमार शर्मा यांनी ड्युटी फर्स्ट म्हणजे काय ते आपल्या कामातून दाखवून दिले आहे.

उद्या अर्थसंकल्प सादर होणार आहे. कुलदीप कुमार शर्मा यांच्याकडे बजेट संदर्भातील महत्वाची जबाबदारी होती. बजेटच्या कामामध्ये गुंतलेल्या सर्वांनाच गोपनीयता बाळगावी लागते. बजेटचे कामकाज सुरु असताना, कुलदीप कुमार शर्मा यांच्या वडिलांचे निधन झाले. पण या दु:खद प्रसंगात त्यांनी आपली कौटुंबिक जबाबदारी मागे सोडून कर्तव्याला पहिले प्राधान्य दिले.

कुलदीप कुमार शर्मा २२ जानेवारीपासून बजेट प्रिंटिंगच्या कामामध्ये व्यस्त आहेत. २६ जानेवारी रोजी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या निवासस्थानी जाणे अपेक्षित होते. पण कुलदीप कामावरच राहिले. ते अजूनही नॉर्थ ब्लॉकमध्ये बजेट छपाईच्या कामामध्ये व्यस्त आहेत. अर्थमंत्रालयाने कुलदीप कुमार शर्मा यांच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.

२२ जानेवारीला हलवा सेरेमनी नंतर नॉर्थ ब्लॉकमध्ये बजेटच्या प्रिंटिंगचे काम सुरु झाले. एक फेब्रुवारीलाच ही टीम बाहेर पडेल. सलग दहा दिवस बजेट प्रिंटिंगचे काम चालते. बजेटची गोपनीयता कायम रहावी यासाठी कोणीही बाहेर येऊ शकत नाही. जवळच्या नातेवाईकाचे अचानक निधन झाले तर तुम्ही बाहेर येऊ शकता. पण कुलदीप शर्मा यांनी आपल्या कामाला पहिले प्राधान्य दिले.

Story img Loader