आपल्या रोजच्या व्यवहारात आपण ‘विश्व’ हा शब्द फारच ढिलेपणानं वापरतो. पण त्याचा नेमका अर्थ विज्ञानानं स्पष्ट केला आहे. विश्व (Universe) म्हणजे काय? आपली पृथ्वी, चंद्र, सूर्य, ग्रह, उपग्रह – या सर्व वस्तू जिचा (अगदी नगण्य असा) भाग आहे ती आकाशगंगा नावाची आपली दीर्घिका (galaxy), आपल्या दीर्घिकेसारख्या इतर अब्जावधी दीर्घिका आणि अनेक खगोलीय वस्तू यांनी आपलं विश्व बनलेलं आहे. अगदी अलीकडच्या संशोधनानुसार या विराट विश्वाचं आकारमान आहे १३.८२ अब्ज प्रकाशवर्ष एवढं! आता तुम्हांला ‘जग’ (world- Earth) आणि ‘विश्व’ या शब्दांमध्ये असलेला अतिप्रचंड फरक लक्षात आला असेल. त्यामुळं जागतिक (म्हणजे पृथ्वीच्या) पातळीवर होणाऱ्या सौंदर्य स्पर्धेत विजयी ठरणाऱ्या युवतीला ‘विश्वसुंदरी’न म्हणता ‘जगत् – सुंदरी’ म्हटलं पाहिजे. तीच गोष्ट ‘विश्वचषक’ स्पर्धाबाबत म्हणता येईल.
तर अशा या विराट विश्वाचा अभ्यास केला जातो खगोलशास्त्र या विषयात. त्यामुळं हा विषय सर्वसमावेशक (Superset) आणि म्हणूनच अतिशय आव्हानात्मक असा आहे. या विषयात मानवी प्रज्ञेचा ठायी ठायी कस लागवतो.
आपल्या विश्वाचं आकारमान किती आहे याचा उल्लेख आधी आला आहेच. पण त्याचा आकार कसा आहे? काही वैज्ञानिकांच्या मते ते सपाट आहे तर इतर काहींच्या मते ते बंदिस्त (उदा. गोलाकार) आहे. विश्वाचा जन्म एका महास्फोटात झाला असं बहुतेक वैज्ञानिक मानतात. हा स्फोट १३.८२ अब्ज वर्षांपूर्वी झाला असं गणित मांडण्यात आलं आहे. तेव्हापासून विश्वाचं प्रसरण सुरू झालं असून ते आजतागायत सुरू आहे. विश्व प्रसरण पावत असल्याचे प्रायोगिक पुरावे मिळाले आहेत. आता प्रश्न असा येतो की हे प्रसरण यापुढे किती काळ चालू राहील? समजा हे प्रसरण थांबले तर पुढे काय होईल? आकुंचनाला सुरूवात होईल?
आइनस्टाइनने १९१५ साली व्यापक सापेक्षता सिद्धांत मांडून विश्वाचं भवितव्य काय असेल याचा विचार केला. या सिद्धांताच्या आधारे त्यानं दहा समीकरणं मांडली. या समीकरणाचं महत्त्व हे, की त्यांच्या उत्तरांमधून विश्वाच्या भवितव्याबद्दलच्या विविध संभाव्यता मांडल्या गेल्या. (या संभाव्यतांचा संबंध विश्वाच्या आकाराशी (उदा. सपाट, बंदिस्त, खुलं,) आहे असं काही वैज्ञानिकांचं प्रतिपादन आहे.
जे वैज्ञानिक महास्फोट सिद्धांताचे समर्थक आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार या विश्वाला ‘सुरूवात’ होती. त्यामुळं त्याला ‘अंत’ ही असलाच पाहिजे. पण जे वैज्ञानिक हा सिद्धांत मानत नाहीत त्यांच्या म्हणण्यानुसार ‘या विश्वाला सुरुवात नव्हती. त्यामुळं त्याला अंत असणार नाही.’ दुसऱ्या शब्दात सांगायचं तर आपलं विश्व ‘अनादी आणि अनंत’ आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे की ही विधानं म्हणजे केवळ अंदाज नाहीत,शब्दांचे बुडबुडे नाहीत. ही विधानं करण्यापूर्वी सर्वच वैज्ञानिकांनी उच्च पातळीच्या गणिताचा वापर करून विश्वाचा अभ्यास केला आहे. यासंबंधात काही पुरावे मिळावेत म्हणून मानवाची मोठी धडपड चालू आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणजे अंतराळात सोडलेली प्लांक नावाची दुर्बीण. मॅक्स प्लांक हा विसाव्या शतकातला एक थोर वैज्ञानिक होता. भौतिकशास्त्रात क्रांती घडवून आणणाऱ्या पुंज सिद्धांताचा तो जनक होता. ही दुर्बीण २००९ मध्ये अंतराळात सोडण्यात आली असून पृथ्वीपासून १५ लक्ष कि.मी. एवढय़ा अंतरावर ती ‘ठेवण्यात’ आली आहे. ही दुर्बीण निर्मनुष्य असून तिचं सर्व नियंत्रण पृथ्वीवरूनच केलं जातं. या दुर्बिणीनं अलिकडेच संपूर्ण विश्वाचा एक सविस्तर नकाशा तयार केला आहे. त्या नकाशामुळं विश्वाचं वय १३.७ अब्ज वर्षांऐवजी १३.८२ अब्ज र्वष असल्याचं लक्षात आलं आहे. तसंच विश्वासंबंधी इतरही काही मूलभूत स्वरुपाची माहिती येत आहे.
या माहितीतून ‘बहु- विश्व (Multiverse) ही कल्पना पुढे येण्याची शक्यता आहे. काय आहे ही कल्पना? आपलं विश्व एवढं एकच विश्व (Uni-verse) अस्तित्वात आहे की आपल्यासारखी अनेक विश्वे अस्तित्वात आहेत, या दिशेनेही वैज्ञानिक विचार करत आहेत. म्हणजे या अनेक समांतर विश्वांनी (parallel Universes) मिळून हे बहु-विश्व तयार झालं आहे का, हा त्यांच्या संशोधनाचा विषय बनला आहे. या दिशेनं काही प्रगती झाली तर मानवी ज्ञानात अतिशय मोठी आणि मूलगामी स्वरुपाची भर पडेल यात शंकाच नाही. असं घडल्यास खगोल शास्त्राची व्याप्ती कैक पटींनी वाढून जाईल.
बहु-विश्व ही कल्पना मान्य केली तर त्याचे घटक असलेली समांतर विश्वे कशी निर्माण झाली, हा अगदी ओघानं येणारा प्रश्न. काही वैज्ञानिक म्हणतात, अनेक महास्फोटांनी ही विश्वे निर्माण झालेली असतील. विज्ञानात द्रव्य (matter) असतं तसंच प्रतिद्रव्यही (antimatter) असतं. उदा. इलेक्ट्रॉन या कणाचा पॉझ्रिटॉन हा प्रतिकण आहे. या दोघांचं एकत्रीकरण होतं तेव्हा त्यांच्या वस्तुमानाचं ऊर्जेत रुपांतर होतं. साहजिकपणे ते दोन्ही कण दिसेनासे होतात. या संकल्पनेचा आधार घेऊन निम्मी समांतर विश्वे द्रव्यांची, तर उरलेली प्रतिद्रव्यांची बनलेली असतील का असाही विचार मांडण्यात आला आहे.
अशा एखाद्या समांतर विश्वात जायचं झालं तर कोणत्या ‘मार्गानं’ जायचं? या संदर्भात काही व्यक्तींनी कृष्णविवरांचा (Black-hole) आधार घेतला आहे. ज्या ताऱ्यांचं वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या तिपटीपेक्षा अधिक असतं, त्या ताऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं कृष्णविवर तयार होतं. या विवरांचे गुरुत्वाकर्षण इतकं जबरदस्त असतं की ते प्रत्येक वस्तूला तर खेचून घेतंच, पण प्रकाशालाही खेचून घेतं. त्यामुळं त्याच्यापासून प्रकाशकिरण बाहेर पडू शकत नाहीत.
साहजिकपणे ते कृष्ण – म्हणजे काळं – दिसतं. खगोलशास्त्रातली ही एक अतिशय गूढ अशी गोष्ट आहे. एकेकाळी केवळ गणितात अस्तित्वात असलेली कृष्णविवरं आता दुर्बिणींनी प्रत्यक्षात शोधून काढलेली आहेत. आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी भलं मोठं कृष्णविवर असल्याचं आता सर्वमान्य झालं आहे. आता पुढचा प्रश्न असा येतो की कृष्णविवरांनं गिळलेल्या वस्तू पुढे कुठे जातात? या संदर्भात एक अतिशय थरारक कल्पना मांडण्यात आली आहे. कृष्णविवर म्हणजे एका भल्या मोठ्य़ा बोगद्याचं एक तोंड आहे, जे आपल्या विश्वात आहे. या बोगद्याचं दुसरं तोंड आहे दुसऱ्या विश्वात. कृष्णविवरानं (आपल्या विश्वात) गिळलेल्या वस्तू बोगद्याच्या दुसऱ्या तोंडातून दुसऱ्या विश्वात जात असाव्यात. हे दुसरं तोंड सगळ्याच वस्तू बाहेर टाकतं. म्हणून त्याला म्हणायचं श्वेत – विवर (White-hole)! अर्थात आजतरी या केवळ कल्पनाच आहेत; पण त्या भन्नाट आहेत हे मात्र नक्की. या संबंधात ठोस पुरावा मिळालाच तर तो क्षण मानवी इतिहासातला आजपर्यंतचा सर्वात क्रांतिकारी क्षण ठरेल, यात शंकाच नाही.
‘विश्वाबद्दल बोलू काही..’
आपल्या रोजच्या व्यवहारात आपण ‘विश्व’ हा शब्द फारच ढिलेपणानं वापरतो. पण त्याचा नेमका अर्थ विज्ञानानं स्पष्ट केला आहे. विश्व (वल्ल्र५ी१२ी) म्हणजे काय? आपली पृथ्वी, चंद्र, सूर्य, ग्रह, उपग्रह -
आणखी वाचा
First published on: 18-06-2013 at 09:41 IST
Web Title: Lets talks about the world