अग्रलेखात (२९ ऑक्टो.) वर्णिलेला ‘नवा ‘मार्क’वाद’ भारतीयांच्या अंगवळणी पडणे तर दूरच; त्यास तत्त्व म्हणून प्राथमिक स्वीकारार्हता मिळणे हेच दुरापास्त आहे. एखादा कल्पक आहे, बुद्धिमान आहे की त्याही पुढे हे सर्व व्यावसायिक रूपात आणण्याचे गुण व वकूब त्याच्यात आहे या कशाचेही मोल, मूल्यांकन करण्याची आवश्यकताच आपल्या समाजाला वाटत नाही. त्यात एखाद्याने या पुंजीवर मोठय़ा उद्योगाचा पाया घातला जाईल असे म्हटल्यास, राहत्या भवनांपासून संसद भवनापर्यंत त्याला वेडय़ातच काढले जाते. उद्योग उभारण्यासाठी जी ‘पुंजी व गुण’ लागतात ती ही नव्हे, असेही व्यावहारिक डोस पाजले जातात. स्वत:च्या क्षमतांवर केलेले संशोधन बाजारात प्राथमिक चाचणीकरिता द्यायचे म्हटले तरी त्यास ‘संधी मिळाली’ असे म्हणण्याचे धाडस कोणी शहाणा करणार नाही. कारण त्यामागे कोण छगनभाई-मगनभाई टपून बसले असतील हे वेगळे सांगावयास नको! अशा समाजात पेटंट वगरे गोष्टी या केवळ तोंडदेखल्या कौतुकाचा भाग तरी असतात किंवा अनुल्लेखाने मारण्याच्या! न्यायदेवता ‘डोळ्यांवर पट्टी बांधून’ तुमच्या पाठीशी आहेच. ‘फेसबुक’ किंवा ‘अॅपल’ यांसारख्या संकल्पना कोणी भारतात प्राथमिक चाचणीसाठी देऊन बघण्याची िहमत करूनच पाहावी! त्यातही कुठे उच्च संस्थांतून कौतुकाची फुले झेलून कोणा ‘व्हेंचर कॅपिटलिस्ट’ किंवा गुंतवणूकदाराचे उंबरठे झिजवून पाहावेत, बँकांकडे प्रस्ताव देऊन ‘झापडबंद’ प्रबंधकाची किंवा संचालकाची मधाळ मात्रा चाखावी. त्यातून काही उरलेच तर जगण्याची उमेद शोधावी, जवळच्या लोकांत स्वत:ची ओळख शोधावी.
गंमत म्हणजे, ज्या संशोधकांना केंद्र शासनाने अनुदान देऊन जी तंत्रज्ञाने प्रत्यक्षात आली, त्यावर पुढे उद्योग उभारावा यासाठी ठोस कार्यक्रम काही नाही. ‘एक कोटी रुपयांत नवे तंत्रज्ञान बाजारात आणा’ म्हणतात, तेही अर्धी गुंतवणूक संशोधकाची! शासन ५० लाख देईल, बाकी बँका देतात का, ते तुमचे तुम्ही पाहा! संबंधित अधिकारी खुशाल याच फेसबुक, अॅपलची नावे घेऊन असे काही प्रस्ताव असतील तर सांगा म्हणतात. इतर देशांतील कोणाशी संपर्क आल्यावर अगदी सहज प्रश्न विचारला जातो, मग तुमचे शासन यासाठी पुढे मदत करीत नाही काय? आता, यांना काय रामकहाण्या ऐकवायच्या!
अमेरिकेतील विद्यापीठे व संबंधित संस्था, कंपन्या आता बाहेरील देशांतील संशोधकाने कुटुंब-कबिल्यासह तेथे येऊन कंपन्या उभाराव्यात म्हणून प्रयत्नशील आहेत. तेथे प्राथमिक चाचणीसाठी उत्पादने वापरावयास देणे, पेटंटचा मान राखणे या सामाजिक जाणिवेचा भाग आहेत व त्याचा अर्थव्यवस्थेशी, जागतिक व्यापाराशी संबंध आहे, हेदेखील तिथला सामान्य माणूस जाणतो. मुख्य म्हणजे सदर संशोधक निर्धास्तपणे आपला चमू बनवू शकतो व त्याला एकूण प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान असते. आपल्याकडचा अनुभव म्हणजे, हे संशोधन विकसित करायला तुम्हाला किती खर्च आला, तुम्ही स्वत: पुढे किती गुंतवणूक करणार व त्याही पुढे ‘आय नो, व्हेअर डु यू कम फ्रॉम..’ म्हणत ‘ज्ञानेश्वरी’सुद्धा किलोच्या भावात काढतात. आपल्यासाठी पारंपरिक साठेबाजी, करबुडवेगिरी, हाताशी धरून करावयाचे ‘धवलचौर्य’, ठेकेदारी, बांधकाम व्यवसाय अशी ‘नगदी’ पिके असताना हे तोंडाला ‘फेस’ आणणारे नस्ते उद्योग कोण करणार? हे असले पुराणे ‘मारक वाद’ जोवर आपल्याकडे आहेत तोवर हे नवे ‘मार्क वाद’ म्हणजे, लंकेत सोन्याच्या विटा..!
– सतीश पाठक, पुणे
कंत्राटीकरणाबद्दल सारेच गप्प कसे?
कामगारांच्या प्रश्नाबद्दल आजची वृत्तपत्रे लिहीत नाहीत, असे डॉ. पां. रा. किनरे यांनी त्यांच्या लेखात (लोकसत्ता, २९ ऑक्टो.) लिहिले आहे, ते खरे आहे. परंतु आजच्या दुरवस्थेला आमचा कामगारही जबाबदार आहे. कामगारांनी त्यांच्या संघटना दहाही बोटांत सोन्याच्या अंगठय़ा घालणाऱ्या तथाकथित पुढाऱ्यांच्या स्वाधीन केल्या. कायद्याचे ज्ञान नसलेले हे असे नेते मालकाशी हातमिळवणी करून कामचलाऊ करार करतात व अनेकदा मालकांच्या वकिलांनी केलेल्या कागदावर सह्या ठोकतात. विरोध करणाऱ्यांना धमक्या ठरलेल्याच.
कंत्राटी कायदा १९८० च्या सुमारास अमलात आला. अधूनमधून असणारे काम करण्यासाठी हा कायदा. नियमित कामासाठी कंत्राटी कामगार ठेवता येत नाहीत, असा कायदा आजही आहे. त्याची कठोर अंमलबजावणी होत नाही. कामगार आयुक्त कार्यालये आता नावापुरतीच आहेत. ठाणे येथील व्होल्टास कंपनीत दोन दशकांपूर्वी जवळपास चार हजार कायम कामगार होते. आजही तेच उत्पादन घेतले जाते, मात्र कायम कामगार जेमतेम २००. शेकडो कामगार कंत्राटी म्हणून काम करतात. राज्यातील महापालिका, सरकारी रुग्णालये येथे नियमित कामासाठी कंत्राटी कामगार राबवले जातात हे सरकारला दिसते; मग ते गप्प का? कामगार नेते रस्त्यावर का येत नाहीत? राज्य/ केंद्र सरकार कामगार कायद्यात बदल करणार आहे. हे सर्व बदल मालकधार्जणिे असणार हे सांगण्यासाठी ज्योतिषाची जरुरी नाही. आजही असा कायदा आहे की नियमित कामासाठी कारखान्यात काम करणाऱ्याला १८० व ऑफिसमध्ये कारकुनी करणाऱ्याला ९० दिवसांत कायम केले जावे. या नियमाची अंमलबजावणी सरकारने करावी. शेवटी, जर कामगार रस्त्यावर येणार नसतील तर देवसुद्धा त्याना वाचवू शकणार नाही!
– मार्कुस डाबरे (माजी सरचिटणीस, अ. भा. व्होल्टास कामगार संघटना) पापडी, वसई
‘असहिष्णुतेचा प्रचंड उद्रेक’ की ‘किंचितशी संवेदनशीलता’ वा ‘अस्मितेचा हुंकार’ ?
‘संशयकल्लोळ’ हा अन्वयार्थ (२९ ऑक्टो.) वाचला. इथे ‘हे प्रकरण वाटते तेवढे सरळ व सोपे नाही’ हे अन्वयार्थमधलेच वाक्य वापरण्याचा मोह आवरत नाही. सध्या देशात एकूणच गाय, गोहत्या, गोमांसबंदी इत्यादीवरून जे काही चालले आहे, तेही प्रकरण खरे तर वाटते तेवढे सरळ व सोपे नाही. या संदर्भात काही मुद्दे असे :
१) खरे तर घटनाकारांना देशभरात गोहत्याबंदी अभिप्रेत होती, हे त्यांनी घटनेत त्यासंबंधी केलेल्या तरतुदींवरून स्पष्ट आहे. (भारताची राज्यघटना : भाग पाचवा : राज्यांसाठी दिशानिर्देश : अनुच्छेद ४८ : शेती आणि जनावरपालन). देशात अनेक राज्यांत बऱ्याच पूर्वीपासून गोहत्याबंदी लागू आहे. (उदा. अन्वयार्थमध्येच म्हटल्याप्रमाणे दिल्लीत १९९४ पासून) असे असूनही, आजवर या संदर्भात कधीही अशी अशांतता, संशयाचे वातावरण किंवा िहसेचा उद्रेक झाला नाही, याचे कारण देशभर या कायद्यांचे कटाक्षाने, तंतोतंत होणारे पालन हे नसून, देशातील बहुसंख्य िहदू समाजाची याबाबतीतली उदासीनता (इन्डिफरन्स) हेच होय. वास्तविक बहुसंख्य िहदू, अजूनही गाईला (धार्मिक कारणाने) पूज्य मानतात, गोमांसभक्षण निषिद्ध मानतात. पण हा बहुसंख्य समाज शतकानुशतके आपल्या धार्मिक भावना इतरांकडून राजरोस पायदळी तुडवल्या जाण्याविषयी कमालीचा उदासीन राहिला आहे. गेली दीड-दोन वष्रे भाजपच्या शासनकाळात या विषयासंदर्भात बहुसंख्य समाजात किंचितशी संवेदनशीलता दिसत आहे. आणि ती तेवढीशी संवेदनशीलता, हा जणू काही ‘असहिष्णुतेचा प्रचंड उद्रेक’ असावा, अशा थाटात माध्यमांकडून मांडली, प्रदíशत केली जात आहे – व टीकेचे लक्ष्य होत आहे. हा खरे तर असहिष्णुतेचा उद्रेक वगरे नसून, शतकानुशतकांच्या पराभूत, उदासीन मानसिकतेतून- बऱ्याच उशिराने का होईना- जाग्या झालेल्या अस्मितेचा हुंकार आहे.
२) इथे एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल की, गाय, गोमांसभक्षण, गोहत्या वगरे बाबतीत स्वा. सावरकरांची मते काय होती, हा मुद्दा इथे पूर्णपणे गरलागू आहे. बहुसंख्य िहदू समाज, स्वा. सावरकरांइतका प्रखर विज्ञाननिष्ठ होईल, अशी अपेक्षा ठेवणे चूक आहे. बहुसंख्य िहदू धार्मिक बाबतीत पारंपरिकच आहेत. गाईला पूज्य मानणे, गोमांसभक्षण निषिद्ध मानणे, या जर त्यांच्या धार्मिक श्रद्धा असतील तर त्या तुच्छ लेखणे योग्य नाही. जर लोकशाही व्यवस्थेत बहुमताचा आदर अभिप्रेत आहे, तर बहुसंख्यांच्या धार्मिक भावनांचा आदर व्हावा, ही अपेक्षा रास्तच म्हटली पाहिजे. ‘कुठलीही स्त्री कधीही ‘कुमारीमाता’ असूच शकत नाही’ – हे वैज्ञानिक सत्य – कोणी कधी श्रद्धाळू ख्रिश्चनाला सांगायला जाईल का? जर नाही; तर – ‘गाय हा केवळ उपयुक्त पशू आहे’ – हे वैज्ञानिक सत्य, िहदूंच्या गळी उतरवण्याचा अट्टहास कशासाठी?
३) दादरी घटनेनंतर देशातल्या पुरोगामी, निधर्मी, विचारवंतांकडून निषेधाची, कठोर टीकेची जी लाट उसळली आहे, तिचा एकूण सूर- ‘देशात असहिष्णुतेचा वणवा पेटलाय आणि त्यात (जणू काही) सारे संपून जाईल’ – असा आहे. हे सर्व फार एकतर्फी होत आहे. याला जी दुसरी बाजू आहे, तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचे (किंवा मुद्दाम केल्याचे) दिसून येते. दुसरी बाजू अशी की, तुम्ही जिला असहिष्णुतेचा उद्रेक म्हणताय, ती खरे तर सहनशीलतेच्या पराकाष्ठेतून, कडेलोटातून आलेली अगतिकता, वैफल्यग्रस्तता असू शकते! देशातला पुरोगामी, प्रज्ञावंत वर्ग, हा पारंपरिक बहुसंख्य समाजापासून वैचारिकदृष्टय़ा फार दुरावलेला आहे, हे उघड आहे. परंपरेच्या जोखडाखालून समाजाला बाहेर काढणे, त्याला आधुनिक, विज्ञाननिष्ठ बनवणे ही फार कष्टाची, दीर्घकाळ चालणारी किचकट कामे आहेत. ते न करता केवळ धार्मिक परंपरावादी समाजाला तुच्छ लेखून काहीच साध्य होणार नाही. समाजातील प्रथितयश धुरीणांनी ‘होय, मी खातो गोमांस- या मला मारायला’ – अशी भाषा वापरणे, हे वैचारिक प्रगल्भतेचे लक्षण नाही.
४) आपल्याला तुच्छ लेखले जाते, ही भावना माणसाला किंवा समाजाच्या एखाद्या वर्गाला केव्हा ना केव्हा तरी आक्रमक बनवल्यावाचून राहत नाही. त्यामुळे आज खरी गरज असेल, तर ही की समाजाच्या या दोन टोकांमधली एकीकडे आधुनिक, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरोगामी वर्ग नि दुसरीकडे धार्मिक परंपरावादी श्रद्धाळू वर्ग यांच्यामधली वैचारिक दरी भरून काढण्याची. निदान शक्य तितकी कमी करण्याची. त्याकडे दुर्लक्ष करून त्याऐवजी केवळ परंपरावाद्यांना हीन, तुच्छ लेखत राहिल्याने काही साध्य होणार नाहीच, उलट ही दोन टोके अधिकाधिक दुरावत जाऊन परंपरावादी अधिकाधिक उग्र, आक्रमक होत जातील, जे अंतिमत: देशहिताचे नाही. कारण निदान सध्या तरी संख्याबळ परंपरावादी वर्गाकडेच आहे, असे दिसते.
– श्रीकांत पटवर्धन, कांदिवली पूर्व (मुंबई)
आस्तिक/ नास्तिक हे प्रकार की पायऱ्या?
‘नास्तिक म्हणजे दुर्जन?’ या लेखात त्यात लेखकानी लोकांची आस्तिक आणि नास्तिक या दोन मुख्य प्रकारांत विभागणी केली आहे. नास्तिक या शब्दात बुद्धिप्रामाण्यवाद अभिप्रेत असेल तर आस्तिक व नास्तिक हे प्रकार नसून त्या माणसाच्या वैचारिक उत्क्रांतीच्या पायऱ्या आहेत असं आपण म्हणू शकतो.
कोणीही माणूस जन्मल्यापासून बुद्धिप्रामाण्यवादी असू शकत नाही. कारण सुरुवातीच्या काही वर्षांत तो आपल्या बहुतेक गरजांसाठी इतरांवरच अवलंबून असतो. वैचारिकतेसाठी लागणारा स्वानुभव त्याच्याकडे नसतो. पुढे अनुभव वाढतो तसतसा तो नास्तिक (बुद्धिप्रामाण्यवादी) होण्याची शक्यता निर्माण होते. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर त्याचा आस्तिकतेकडून नास्तिकतेकडे प्रवास सुरू होतो. हे सर्व तो आयुष्यातल्या अनुभवांकडे कसं पाहायला शिकतो त्यावर अवलंबून असतं. या प्रवासात कोणाची गती कमी तर कोणाची अधिक. अशा परिस्थितीत नास्तिकांनी आस्तिकांचा उपहास करणं म्हणजे वरच्या इयत्तेतल्या विद्यार्थ्यांनी खालच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना आपल्याइतकं येत नाही म्हणून नावं ठेवण्यासारखं आहे. आज स्वत:ला जे अभिमानाने नास्तिक म्हणवतात त्यांनी आपलं पूर्वायुष्य आठवून पहावं. सागायचा मुद्दा हा की नास्तिक्याचाही दुराभिमान नको.
– शरद कोर्डे, ठाणे.
तो आहे तिथेच बरा!
मुंबईत खून, खंडण्या व अनेक बेकायदा व्यवहारांत हात असलेला व अनेक वष्रे बेपत्ताच असलेला गुंड टोळीप्रमुख छोटा राजन अखेर इंडोनेशियाच्या पोलिसांना सापडल्यानंतर, आता त्याला भारतात आणून त्याच्यावर खटले भरण्याची खटपट सुरू झाली आहे. पोर्तुगालहून अबू सालेमला आणून त्याच्यावर खटले चालवले गेले, त्यास अनेक वष्रे होऊनही त्याला शिक्षा झाली का? उलट त्याची तब्येत खूप सुधारलेली दिसते, त्याच्या बंदोबस्तावर तसेच खटल्यावर होत असलेला खर्च करदात्यांचा असतो, बनावट मुद्रांकांचा व्यवहार करून अब्जावधी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या तेलगीचा साथीदार सुरेश जैन आज तुरुंगात मजेत आहे, मग छोटा राजनला भारतात आणून आपली यंत्रणा, तिजोरी आणि सुसज्ज रुग्णालये यांवर अनावश्यक भार कशासाठी? तो आहे तिथेच बरा आहे!
– श्रीराम गुलगुंद, चारकोप (मुंबई)
हा निष्कर्ष निराधार!
ईश्वर व धर्म न मानणाऱ्यांची नीती ‘शुद्ध’ असते व धर्म आणि ईश्वर मानणाऱ्यांची नीती तुलनेने ‘हिणकस’ असते असे शरद बेडेकर (मानव विजय, २६ ऑक्टो.) कशाच्या आधारे म्हणतात? हे म्हणजे प्रत्येक सात्विक, सहृदय व सत्कर्म करणारा माणूस हा ‘निरीश्वरवादी’ असतो असे म्हणण्यासारखे होईल. प्रत्येक धार्मिक, ईश्वरवादी माणसाचे सत्कृत्य ‘पुण्यसंचयासाठी’ असते व प्रत्येक निरीश्वरवादी माणसाचे सत्कृत्य हे शुद्ध, जनहितार्थ व निरपेक्ष बुद्धीने असते असे म्हणणे हे निरपेक्षपणे सत्कृत्य करणाऱ्या ईश्वरवादींवर अन्याय करणारे आहे. अगदी ‘पुण्यसंचय हा हेतू’ आहे असे धरूले तरी फार तर असे सत्कृत्य दुय्यम दर्जाचे असे म्हणू शकतो, पण ‘हिणकस’ नक्की नाही. उलट धार्मिक व ईश्वरवादी मनुष्याचा सत्कृत्य करण्याकडे कल असण्याची शक्यता अधिक आहे.
परिचित व्यक्तीच्या वर्तनाचा किंवा सद्वर्तनाचा अंतस्थ हेतू असतो किंवा नसतो हे आपण फारफार तर पूर्वानुभवावरून म्हणू शकतो. पण, कुठल्याही दोन ईश्वरवादी व निरीश्वरवादी त्रयस्थ व्यक्तींच्या सद्वर्तनामागे अंतस्थ हेतू असेल किंवा नसेल हे आपण छातीठोकपणे कसे सांगू शकू? खेरीज, रोज ‘पाप’ करणारे, भ्रष्टाचार करणारे हे खरे ‘धार्मिक व ईश्वरवादी’ नसतातच.
– चिंतामणी भिडे, ठाणे
‘मानव-विजया’च्या साध्यासाठी लढा अटळ
‘नास्तिक म्हणजे दुर्जन?’ हा लेख (मानव विजय, २६ ऑक्टो.) व ‘‘असते’पाशी प्रश्न का थांबतात?’ ही प्रतिक्रिया (लोकमानस, २७ ऑक्टो.) वाचली. पृथ्वीवरील सजीव सृष्टीत आढळणारे चतन्याचे आविष्कार पाहता या चतन्याचा स्रोत असणारी एक ऊर्जा अस्तित्वात आहे यात शंका नाही. मात्र ‘तीच शक्ती हे सर्व जग चालवते’ की ‘त्या शक्तीमुळे जग (आपोआप) चालते’ हा प्रश्न आहे. या शक्तीची जी अभिव्यक्ती आपल्याला दिसते त्या प्रक्रियेमागे काही विचारसरणी, विवेक, संवेदनशीलता अशा काही प्रेरणा आहेत काय? म्हणजे ही शक्ती माणसाप्रमाणे विचार करू शकते काय? की ही शक्ती केवळ निसर्गनियमांनुसार, अनियंत्रित प्रवाहाप्रमाणे वाहत असते? ही शक्ती घडणाऱ्या घटना, दुर्घटना, उलथापालथ यांचे उत्तरदायित्व आणि जबाबदारी स्वीकारण्यास सक्षम आणि लायक आहे काय हाही महत्त्वाचा प्रश्न आहे.
जगाची आजची भरकटलेली अवस्था पाहता जगाच्या रहाटगाडग्याचे न्याय्य व्यवस्थापन करणारी अशी एखादी शक्ती एकतर अस्तित्वातच नाही किंवा त्या शक्तीने जगाचा कारभार माणसाच्या मनातल्या सद्विवेकाच्या (त्या शक्तीनेच योजलेल्या) गुणसूत्रावर सोपवून स्वत: इतरत्र दंग/व्यस्त असावी. सद्विवेकाच्या गुणसूत्राचे हे ‘अॅण्टिव्हायरस’ आता मुदत संपल्यामुळे कालबाह्य़ झाले आहे. ‘अॅण्टिव्हायरस’चे नूतनीकरण हे (िहदू धर्माच्या प्रतिपादनानुसार ईश्वराचाच अंश असलेल्या) स्वत मानवालाच स्वयंचिकित्सेच्या आधारे करणे प्राप्त आहे.
समाजातील विचारवंतांनी समाजात हे ‘अॅण्टिव्हायरस’ प्रस्थापित करण्याच्या कार्यास सुरुवात केलेलीच आहे. समाजविघातक विषाणूंचा कडवा प्रतिकार करताना त्यातले काही विचारवंत या विषाणूंच्या हल्ल्यास बळी देखील पडत आहेत. त्याच्यापुढील आव्हान कडवे आहे. मात्र ही लढाई मानवाच्या अस्तित्वासाठी अटळ आहे.
– प्रमोद तावडे, डोंबिवली
‘चर्चेतले’ अजित डोवल आणि आदर्श गुप्तचर काव
छोटा राजनच्या अटकेच्या निमित्ताने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व माजी गुप्तवार्ता विभाग (आयबी) प्रमुख अजित डोवल यांचे नाव पुन्हा चच्रेत आले आहे. डोवल यांनी छोटा राजनच्या अटकेत मोलाची भूमिका निभावली असावी, असा कयास माध्यमांमध्ये बांधण्यात येत आहे. याबाबतच्या अनेक दंतकथाही प्रसृत करण्यात येत आहेत. याचा उल्लेख ‘अन्वयार्थ’मध्ये (२८ ऑक्टो.) अशा प्रकरणांमधील प्रमुखांच्या कथित सहभागाची चर्चा होणे व ती होऊ देणे आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने अनुचित व घातक आहे. गुप्तहेरांबद्दलच्या त्यांच्या भूतकाळातील घटना व भविष्यातील चाली व डावपेचांबाबत नेहमीच गुप्तता राखणे हे प्रगल्भतेचे लक्षण मानले जाते. आपल्या देशात मात्र सर्वच गोष्टीचे श्रेय घेण्याची धडपड दिसून येते. प्रसिद्धीच्या हव्यासाने अतिसंवेदनशील अशा अधिकाऱ्यांनाही ग्रासले आहे असे वाटते. आजच डोवल यांनी जनरल मुशर्रफ यांच्या वक्तव्यावर दिलेली प्रतिक्रिया अनावश्यक असून आपल्या धोरणातील उथळपणा दर्शविते. असे बोलणे टाळता आले असते तर हितावह ठरले असते. याला एकमेव सन्माननीय अपवाद म्हणजे रॉ-चे प्रथम प्रमुख रामेश्वरनाथ काव हे आहेत हे आवर्जून सांगावेसे वाटते. म्हणूनच त्यांच्याबरोबर काम केलेले सर्व सहकारी त्यांची मुक्तकंठाने स्तुती करताना आढळतात.
या पाश्र्वभूमीवर अजित डोवल यांची वर्तणूकपदाला साजेशी आहे असे म्हणता येणार नाही. त्यांच्या कर्तृत्वाबद्दल पूर्ण आदर राखूनही दुर्दैवाने असे म्हणावे लागते. पुढे घेतल्या जाणाऱ्या कार्यवाहीच्या अनुषंगाने त्यांच्या नावाचा वापर होणे हे मारक असून आपले डावपेच उघडे होण्याची भीती त्यात सामावलेली आहे. ‘कोव्हर्ट अॅक्शन’ जर अशा प्रकारे ‘ओव्हर्ट’ होऊ लागली तर उद्दिष्ट गाठणे दुरापास्त होते हे गुप्तहेर जगतातील मूलतत्त्व आहे. म्यानमारमध्ये कार्यवाही केल्यावर ज्या प्रकारे नको तितका तपशील देण्यात आला व डोवल यांनी यात कधी कसे व काय केले या बातम्यांना पाय फुटले व फुटू दिले हे देशहिताचे नक्कीच नव्हते.
बांगलादेश मुक्त करण्यात रामेश्वरनाथ काव यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी मात्र याचे श्रेय स्वत:कडे कधीच घेतले नाही. सार्वजनिक मंचावर त्यांना श्रेय देण्याचा प्रयत्न केला असता असे करणाऱ्यांना त्यांनी यापासून परावृत्त केले. ‘इदं न् मम’ या भूमिकेतूनच त्यांनी कर्तव्य पार पाडले. इतकेच नव्हे तर सर्व श्रेय बांगलादेशवासीयांनाच दिले. १९७७ साली जनता पक्ष सत्तेत आल्यावर मोरारजी देसाई व अटलबिहारी वाजपेयी यांनी काव यांना अपमानास्पद वागणूक दिली. मात्र बराच काळ लोटल्यानंतर १९९९ च्या कारगिल युद्धानंतर आपल्या यंत्रणेचे कोठे चुकले व आपण कुठे कमी पडलो हे जाणून घेण्यासाठी वाजपेयींना याच रामनाथ काव यांचा सल्ला घ्यावासा वाटला. काव यांनीही आधीचा अपमान मनात न ठेवता वाजपेयी सरकारला मोलाचा सल्ला देऊन आपल्या देशनिष्ठेचे व सचोटीचे दर्शन घडविले. निकटचे सहकारी सोडल्यास कोणासही त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबाबत मागोवा लागणार नाही याची त्यांनी खबरदारी घेतली. म्हणूनच ते आदर्श हेर मानले जातात. आंतरराष्ट्रीय स्तरावरही गुप्तहेर जगतात त्यांना मानाचे स्थान होते. १९५५ साली चिनी पंतप्रधान चाऊ-एन-लाय यांनी त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ त्यांना विशेष पदक बहाल केले होते. असा सन्मान आपल्या देशातील इतर कोणत्याही गुप्तहेर अधिकाऱ्याला प्राप्त झाल्याचे स्मरत नाही. या ‘अनसंग हिरो’ने २० जानेवारी २००२ रोजी अनेक संवेदनशील गुपिते कवटाळत व गौरवशाली मोहिमांच्या स्मृती मागे ठेवत या जगाचा निरोप घेतला. काव यांच्या या तेजस्वी पाश्र्वभूमीवर डोवल यांचा माध्यमातील झगमगाट उथळ व अपरिपक्व वाटतो.
– सतीश भा. मराठे, नागपूर</strong>