FIFA World Cup 2018 Lionel Messi Argentinas sachin tendulkar fail under pressure : अर्जेन्टिनाचा क्रोएशियाकडून ३-० असा मानहानिकारक पराभव झाल्यामुळे यंदाच्या फिफा वर्ल्डकपमध्ये अर्जेन्टिनाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अर्जेंन्टिनाच्या या निराशाजनक प्रदर्शनासाठी सर्वचजण एकाच व्यक्तीला जबाबदार धरत आहेत तो म्हणजे लिओनेल मेस्सी. गत वर्ल्डकपमध्ये उपविजेत्या असलेल्या या संघाची कामगिरी साखळी फेरीतच इतकी ढेपाळेल अशी कोणीही अपेक्षा केली नव्हती. सर्व प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा आहे ती फक्त मेस्सीच्या नावाची.

पण फक्त मेस्सीला पराभवासाठी जबाबदार धरायचे मग संघातील इतर खेळाडू काय करत होते ? हा प्रश्न उपस्थित होतो. गोल करणे व गोलसाठी संधी निर्माण करणे ही सेंटर फॉरवर्डवर खेळणाऱ्या मेस्सीची मुख्य जबाबदारी आहे हे मान्य. पण सर्जियो अॅग्वेरो, गोन्झालो हिग्वेन, एंजल डी मारिया, एन्जो पेरेझ, हाविएर माशेरानो, निकोलस ओटामेंडी हे एकाहून एक सरस खेळाडू संघात आहेत त्याचे काय ? या खेळाडूंनी आपली कामगिरी का नाही उंचावली ? महत्वाच्या क्षणी त्यांनी कशी कच खाल्ली ? याची चर्चा कधी होणार.

मोक्याच्या क्षणी मेस्सी अपयशी ठरला म्हणून त्याच्यावर टीका होत असली तरी फुटबॉलच्या या किमयागाराने आपल्या जादुई खेळाने अनेकांना फुटबॉलचे वेड लावले हे विसरुन चालणार नाही. लिओनेल मेस्सीचे सोप्या शब्दात वर्णन करायचे झाल्यास तो म्हणजे अर्जेन्टिनाचा सचिन तेंडुलकर. भारतात सचिन तेंडुलकरचे जे स्थान आहे ते अर्जेन्टिनात लिओनेल मेस्सीचे. भारतीय क्रिकेटमध्ये काहीवर्षांपूर्वी आपण ज्या प्रमाणे सचिनशिवाय संघाची कल्पना करु शकत नव्हतो तसेच अर्जेन्टिनामध्ये मेस्सीच्या बाबतीत आहे.

भारतात सुनील गावसकर यांच्यानंतर सचिन तेंडुलकरने त्यांचा वारसा पुढे चालवला त्याप्रमाणे डिएगो मॅराडोना यांच्यानंतर मेस्सीने त्यांचा वारसा पुढे नेला आणि जगात अर्जेन्टिनाची शान उंचावली. याखेळाडूचे दुर्देव एवढेच कि, तो मॅराडोना यांच्याप्रमाणे संघाला विश्वविजेता बनवू शकला नाही. मागच्या वर्ल्डकपमध्ये ही संधी त्याला मिळाली होती. पण या गुणवान खेळाडूला त्या संधीचे गोलमध्ये रुपांतर करता आले नाही.

सचिन तेंडुलकर मैदानावर ज्यावेळी उतरायचा त्यावेळी त्याच्यावर कोटयावधी भारतीयांच्या अपेक्षांचे प्रचंड ओझे असायचे. काल क्रोएशिया विरुद्ध मेस्सी जेव्हा मैदानावर उतरला त्यावेळी त्याच्या खांद्यावर सुद्धा चार कोटी पेक्षा जास्त अर्जेन्टिनाच्या फुटबॉल चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे होते. कदाचित त्याखालीच मेस्सी दबून गेल्यामुळे या वर्ल्डकपमध्ये त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरी होऊ शकली नाही.

सचिन आणि मेस्सीमधले साम्य म्हणजे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात या दोन खेळाडूंना सर्वोत्तम खेळ करता आला नाही. त्यातल्या त्यात आपला सचिन सुदैवी कारण त्याच्या खात्यात एका वर्ल्डकप विजयाची नोंद आहे पण मेस्सीला जगातला सर्वोत्तम फुटबॉल खेळाडू असूनही वर्ल्डकप विजयाचा आनंद कधीच मिळणार नाही. दशकभर आपल्या खेळाने जगभरातल्या फुटबॉलप्रेमींवर गारुड करणाऱ्या या महान खेळाडूचा हा शेवटचा वर्ल्डकप ठरु शकतो.