आपल्या मर्यादांची जाणीव ठेवूनही सतत प्रसन्न राहून दुसऱ्याच्याही आयुष्यात फुलबाज्या उडतील, यासाठी जे जे करता येईल, ते दमांनी आयुष्यभर निरलसपणे केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जातिवंत मराठी माणसाची दोन विरोधाभासी वैशिष्टय़े. एक तर तो तुसडा तरी असतो. किंवा गोष्टीवेल्हाळ. म्हणून निबंध आणि कथा/लघुकथा हे वाङ्मय प्रकार या मराठीत एकाच वेळी रुजले. निबंधांत कोरडा मोजकेपणा तर कथेत छोटय़ाशाच बिंदूभोवती कथानकाची गुंफण. विनोदी कथा हे गोष्टीवेल्हाळतेचे विस्तारित रूप. त्यातल्या कथेत मोठा जीव असेल/नसेल. पण ती अशा तऱ्हेने रंगवायची की समोरच्यास त्यातली पात्रे, त्यांचे तऱ्हेवाईक वागणे, त्यांच्या लकबी हे सारे ऐकताना ‘दिसायला’ हवे. मराठी माणसांस अशी कथा पाहायची सवय तीन लेखकांनी लावली. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार यांची ही पुण्याई. दमांच्या निधनाने यातील शेवटचा शिलेदारही काळाच्या पडद्याआड गेला.

त्याच त्या कथांच्या चाकोरीतून बाहेर पडून एका नव्या साहित्य प्रकारात दमा आयुष्यभर रंगले. त्यांच्या कथांनी मराठी साहित्यात अस्सल ग्रामीण शैलीतील विनोदाची भर घातली. त्यांचा ग्रामीण बाज हा शंकर पाटील यांच्यापेक्षा वेगळा. अलीकडेपर्यंत माणसे शहरवासीय झाली तरी त्यांच्या जगण्यातील ग्रामीणपणा दिसून येत असे. दमांनी तो बरोबर पकडला. पाटील यांच्या कथेतला भूगोल ग्रामीण होता. दमांची कथा शहरी पृष्ठभागाखालच्या ग्रामीणतेला वर आणणारी. ग्रामीण कथांना या दोघांच्या बरोबरीने व्यंकटेश माडगूळकर यांनीही समृद्धी दिली. या तिघांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आपल्या कथाकथनाने तिथल्या नागरिकांच्या कढलेल्या आयुष्यात हास्याचे चार शिंतोडे उडवले. अरविंद गोखले, दि. बा. मोकाशी, गंगाधर गाडगीळ यांच्यासारख्या लेखकांनी साठच्या दशकात कथेला नवा बाज दिला. त्यांची कथा ‘वाचायची’ होती. पाटील, दमा, माडगूळकर यांची कथा सांगता येणारी होती.

कथा हा साहित्यप्रकार अतिशय तरलपणे हाताळणाऱ्या त्या काळातील नवकथेहून निराळा बाज घेऊन दमा साहित्यविश्वात अवतरले. त्यांच्या चित्रमय शैलीने वाचणारा नुसता गालातल्या गालात स्मित करीत नाही, तर खळखळून हसतो. जणू काही ती घटना आपल्या समोरच घडते आहे, असा सुखद भास व्हावा, अशी त्यांची कथा. वाचनाएवढेच त्यांच्या कथा त्यांच्या मुखातून ऐकणे अधिक बहर आणणारे. उत्तम वक्ता असणे वेगळे आणि कथा रंगवून सांगणे वेगळे. मिरासदारांकडे हे दोन्ही गुण होते. त्यांची कथा ऐकणे म्हणजे शब्दांतून रंगणारा चित्रपट. त्यातील पात्रे, त्यांचे संवाद, घटना, त्यातील फजिती, त्याने येणारे कसनुसेपण हे सारे त्यांच्या कथाकथनात अशा बाजाने येत असे, की श्रोता हसून हसून दमून जाई. मिरासदार, पाटील आणि माडगूळकर या लेखकत्रयीने महाराष्ट्राला त्याची खरीखुरी ओळख करून दिली. शहरी लेखकांच्या कथा वाचणाऱ्या वाचकांनाही मिरासदारांनी अतिशय अलगदपणे आपल्या तंबूत आणून ठेवले. केवळ विनोद एवढय़ाच भांडवलावर ते शक्य नव्हतेच. माणसे वाचत असताना, त्यांच्या भोवतालचा परिसर, त्यांच्या लकबी, त्यांच्यातील पापभीरूपणा, टागरटपणा, इरसालपणा, बेरकीपणा, वाह्य़ातपणा, सौजन्य आणि औद्धत्य या सगळ्या गुणांचा दमा आपल्या कथांमधून सहजपणे परिचय करून देतात. त्यामुळे त्या कथांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.

मराठीमध्ये विनोदाची एक संपन्न परंपरा आहे. चिं. वि. जोशी, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे यांनी हा विनोद नेहमी खळाळता ठेवला. तो कुणाच्या शारीरिक व्यंगावर आधारित नव्हता. निर्विष असणे हा त्या विनोदाचा गुणधर्म होता. दमांनी तोच धागा पकडला आणि किस्से, गावाकडच्या गोष्टी, हकिकती आणि माणसांच्या गोष्टी खुमासदार रीतीने सांगायला सुरुवात केली. त्या कथा वाचताना आणि त्यांच्या तोंडून ऐकताना ते सारे प्रसंग डोळ्यासमोर तरळत ठेवण्याचे अचाट सामर्थ्य दमांकडे होते. त्यामुळेच ‘व्यंकूची शिकवणी’ या कथेतील व्यंकू, ‘दळण’ आणि ‘गणा मास्तर’मधील मास्तर, ‘भुताचा जन्म’मधील तुकाराम, अशा अनेक व्यक्तिरेखा रोजच्या जगण्यात सतत दिसत असूनही त्यातील विसंगती नेमकी टिपल्याचा आनंद वाचकाला येतो आणि त्याच्या आनंदाला पारावार उरत नाही. कथनातील नाटय़मयता आणि त्यातील शब्दनाटय़ हे मिरासदारांचे खास विशेष. अस्सल गावरान भाषेचा लहेजा सांभाळत ते कथा अशी काही रंगवायचे, की प्रत्येक वेळी ती ते पहिल्यांदाच सांगत आहेत की काय असे वाटावे. या सगळ्या कथांचा एक महत्त्वाचा विशेष म्हणजे त्यांनी कधीही चावटपणाची मर्यादा ओलांडली नाही. त्यामुळे समाजातल्या सर्व थरांत त्यांची लोकप्रियता टिकून राहिली. दळण या त्यांच्या कथेतील मास्तर खटय़ाळ आहे खरा, परंतु त्याचे वर्तन कधीही चावटपणाच्या पलीकडे गेले नाही. त्यांच्यातला मिश्कील स्वभाव त्यांच्या कथांमधूनही तसाच टवटवीत राहिला. ‘मिरासदारी’सारखा कथासंग्रह त्याचे अतिशय सुंदर दर्शन घडवतो.

विनोदी कथाकार म्हणून मिरासदारांची ओळख असली, तरी त्यांचे अन्य साहित्यही दुर्लक्षिण्यासारखे नाही. ‘सरमिसळ’, ‘गप्पांगण’ हे ललित लेखांचे संग्रह, डझनभर चित्रपटांच्या पटकथा, बालसाहित्य, वगनाटय़, एकांकिका या साहित्य प्रकारांतही त्यांनी मुशाफिरी केली. अध्यापन हा त्यांचा व्यवसाय. तो त्यांनी इतका मन लावून केला की, त्यांच्या शिकवण्यामुळे अनेक तरुणांना लेखक होण्याची काकणभर तरी प्रेरणा मिळाली. पुण्याच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयात त्यांच्या तासाला बसण्यासाठी अन्य महाविद्यालयांतील तसेच साहित्य विषय न घेतलेल्या विद्यार्थ्यांचीही झुंबड उडत असे. साहित्य हा विषय तल्लीनपणे शिकवणाऱ्या दमांनी, आपण कुणी प्रसिद्ध कथाकार आहोत, आपले हजारो चाहते आहेत, असा तोरा आयुष्यभर कधी मिरवला नाही. आपल्या मर्यादांची जाणीव ठेवूनही सतत प्रसन्न राहून दुसऱ्याच्याही आयुष्यात फुलबाज्या उडतील, यासाठी जे जे करता येईल, ते त्यांनी आयुष्यभर निरलसपणे केले. अवघ्या महाराष्ट्राचे तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूरसारख्या गावात त्यांचे बालपण गेले. परंतु ते बालपणही त्यांनी अतिशय डोळसपणे अनुभवले. तीच त्यांच्या निरीक्षणांची, अनुभवांची शिदोरी होती. चातुर्मासातील कथेकऱ्याचे कथाकथन, मठांमध्ये चालणारे पोथीवाचन, तिथे येणारे भाविक, गाव छोटे असल्याने घराघरात असणाऱ्या माणसांचे चेहरे आणि सवयी, कीर्तनकाराची कथनशैली हे मिरासदारांच्या कथांचे मूलद्रव्य होते. त्यामुळे शाब्दिक कोटय़ा करण्यापेक्षा माणसांच्या जीवनात घडणाऱ्या प्रसंगांमधून निर्माण होणारा विनोद नेमका शब्दांत पकडण्याची किमया त्यांना साधली होती.

हजारोंचा समुदाय असो की मित्रांचे कोंडाळे. दमा सतत केंद्रस्थानी राहिले. गप्पांचा फड असो, की मित्रांची मैफल. दमांचे तिथे असणे प्रसन्न असे. त्यांच्या चेहऱ्यावर विलसणारे समाधान आणि तृप्तता ही त्यांची सर्वात मोठी पुंजी. त्यामुळे कोणत्याही माणसाच्या जवळ जाणे त्यांना सहजशक्य झाले. त्यांच्या वाचकांमध्येही, या लेखकाने आपल्याला बरोबर ओळखलेले दिसते, असा भाव असतो, तो याच कारणामुळे. दमांनी मराठी साहित्याला दिलेले दान म्हणूनच आनंददायी ठरते. पुण्याच्या शुक्रवार पेठेतील माडीवाले कॉलनी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वसाहतीत एकाच इमारतीत ज्येष्ठ हास्यचित्रकार शि. द. फडणीस आणि द. मा. मिरासदार हे अनेक वर्षे सख्खे शेजारी होते. त्यांच्यातील सौहार्द हा त्यांच्या परिघातील प्रत्येकाला आश्चर्यचकित करायला लावणारा होता. खरेतर त्याचे कारण या दोन्ही कलावंतांकडे असलेली ममता आणि एकमेकांच्या क्षमतांची असलेली पुरेपूर जाणीव हेच होते. द. मा. मिरासदार हे लेखक म्हणून लोकप्रिय राहिले खरे, परंतु त्यांनी माणूसपणाचा धागा आयुष्यभर प्राणपणाने जपला. त्यामुळेच त्यांना अजातशत्रू राहता आले. ते रा. स्व. संघाशी संबंधित होते. पण या देशाच्या भवितव्याची जबाबदारी आपल्याच खांद्यावर आहे अशी भावना त्यांची नव्हती. वैचारिकतेचे वजन अनेकदा हास्यमारक ठरते. दमांबाबत असे कधीही झाले नाही. आधुनिक जीवनशैली, वाढते शहरीकरण आणि यामुळे उगाचच जगण्यास आलेल्या गतीने आपल्यातून एक आनंद हिरावून घेतला. तो म्हणजे गोष्टीवेल्हाळपणा. आता सगळ्याची घाई असते आणि सारे काही पटकन सांगायचे असते. गोष्ट सांगण्यातली आणि ऐकण्यातली गंमत आपण हरवत चाललो आहोत. परिणामी कथाकथनच आता कालबाह्य़ होऊ लागले आहे. दळणवळणाची साधने वाढली. संदेशवहन अधिक गतिमान झाले. या वाढत्या गतीने गोडवा गिळून टाकला आहे. दमा त्या निवांत, गोष्टीवेल्हाळ काळातले. तो काळ मागे पडला. आता दमाही त्या काळाच्या पडद्याआड गेले. या निर्मळ, निर्विष गोष्टीवेल्हाळास ‘लोकसत्ता’ परिवाराची श्रद्धांजली.