– चैतन्य प्रेम

अवधूतानं जे चोवीस गुरू केले त्यातील ‘समुद्र’ या दहाव्या गुरूची माहिती आता पूर्ण झाली. अकरावा गुरू आहे तो ‘पतंग’. दिव्यावर झेप घालून स्वत: जळून खाक होणारा हा पतंग कवींना अतिशय प्रिय आहे. प्रेमात सर्वस्व अर्पण करणाऱ्या प्रेमीसाठी पतंगाचं रूपक वापरलं जातं. अवधूतानं मात्र हा पतंग आपला अकरावा गुरू आहे, असं नमूद केलंय. आता ज्याच्याकडून चांगली गोष्ट आत्मसात करता येते, तो आपला गुरू असतोच. त्याचबरोबर अवधूताचे काही गुरू असेही आहेत, की जीवन कसं जगू नये, हे त्यांच्या जीवनावरून, त्या जीवनातील वाताहतीवरून शिकता येऊ शकतं. ‘पतंग’ हा नकळत अशीच शिकवण देणारा एक गुरू आहे!

या गुरूचं ‘माहात्म्य’ सांगताना अवधूताच्या माध्यमातून स्त्रीची, स्त्री देहाची निंदा केली गेली आहे, असा कुणाचाही स्वाभाविक समज होण्याची शक्यता आहे. केवळ स्त्रीमोहामुळे माणूस कामवासनेत फसून साधनेत उणावतो, असा या टीकेचा रोख आहे, असंही काहींना वाटेल. ‘चिरंजीव पदा’त तर नाथांनी अगदी स्पष्टपणे, ‘‘नको नको स्त्रियांचा सांगात। नको नको स्त्रियांचा एकांत। नको नको स्त्रियांचा परमार्थ। करिती आघात पुरुषांसी।।’’ असं म्हटलंय. पण याचा अर्थ ते स्त्रियांविरोधात होते का? तर, निश्चितच नाही. त्यांचा प्रपंच हाच आदर्श परमार्थ होता. ‘स्वस्त्रीवाचून अन्य स्त्रियांचं चिंतनही करू नये,’ हेदेखील त्यांनी याच चिरंजीव पदात बजावलं आहे. पण प्रश्न उरतोच की, मग ‘एकनाथी भागवत’ काय किंवा संत साहित्य काय, त्यात अधेमधे स्त्रीमोहावर जी कठोर टीका येते ती भेदभावजनक नाही का? याचं उत्तर अनेक पातळ्यांवर जाणून घेतलं पाहिजे. त्या काळात स्त्रीच्या कामुक वर्णनाला वाव देणारं जे साहित्य होतं त्याच्या प्रभावाला छेद देण्यासाठी संतांनी ही टीका केली आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. विशेष म्हणजे स्त्री संतांच्या साहित्यातही स्त्रीमोहावर टीका आहेच! तर या सगळ्या टीकेचा रोख खरं तर कामासक्तीवर, कामभावात अतिरेकानं अडकण्यावर अधिक आहे. बाबा बेलसरे यांनी ‘भावार्थ भागवत’ या ग्रंथात म्हटलं आहे की, ‘‘माणसाच्या खासगी जीवनात काय किंवा सामाजिक जीवनांत काय, कामवासनेला बंधन घातले नाही तर व्यक्तीची आणि समाजाची सर्व बाजूंनी मोठी हानी होते. राजकारणामध्ये किंवा रणांगणामध्ये स्वपराक्रमाने चमकलेले पुष्कळ पुरुष केवळ या वासनेच्या अधीन होऊन स्थानभ्रष्ट होतात. कामवासनेत वाईट असे काहीच नाही. सुखी मानवी जीवनाला तिची आवश्यकता आहे. परंतु माणूस तिच्या अधीन झाला म्हणजे पाहाता पाहाता विवेकभ्रष्ट होतो आणि मग जीवनातील उच्च ध्येय साधण्यास अपात्र होतो. परमार्थाच्या साधनेमध्ये विवेकाच्या दीपाला अखंड जळत ठेवावा लागल्याने साधकांना या वासनेच्या झटक्यापासून अति सांभाळून राहावे लागते.’’ (पृ. ३४१).

म्हणजेच ही टीका खरं तर कामासक्तीवर आहे, कामवासनाशरण होण्यावर आहे. या मुद्दय़ाचा थोडा अधिक, पण संक्षेपानं विचार करू.

chaitanyprem@gmail.com

Story img Loader