शांततेच्या मार्गाने आरक्षणासह इतर मागण्या मांडणाऱ्या मराठा तरुणांच्या मागण्यांची राज्य सरकारने योग्य दखल घेतली नसल्याने ही उद्रेकाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यात मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री चिथावणीखोर वक्तव्ये करीत असल्याने हे आंदोलन चिघळले आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी केला आहे. मराठा आंदोलनाच्या सद्य स्थितीवर एक निवेदन प्रसारित करीत पवार यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.
पवार म्हणतात, ही परिस्थिती वेळीच आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने आंदोलनात सहभागी असलेल्या महत्वाच्या घटकांना त्वरित बोलावून त्यांच्याशी संवाद साधावा व यातून मार्ग काढण्याची प्रक्रिया सुरु करावी. तर दुसरीकडे आंदोलकांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळून सर्वसामान्यांना आंदोलनाची झळ बसणार नाही याची खबरदारी घ्यावी आणि आत्तापर्यंत या आंदोलनाला असलेली जनतेची सहानुभूती टिकवून ठेवावी.
तसेच मराठा समाजातील तरुणांनी केलेल्या आरक्षणाच्या मागणीचा विचार करताना सरकारने या समाजातील उच्च शिक्षित व सुस्थितीतील घटकांचा विचार केला नाही तरी चालेल परंतू वंचित घटकांचा विचार करावा. मात्र, हे करताना एससी, एसटी, आदिवासी आणि ओबीसांच्या सवलतींना धक्का लागणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे शरद पवार यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
पवार म्हणतात, मराठा आरक्षणाच्या बाबतीत काही जण आरक्षणाचे प्रमाण पन्नास टक्क्यांवरुन जास्त होत असल्याचे सांगत या आरक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. मात्र, तामिळनाडू राज्याचे उदाहरण पाहिल्यास तेथे सत्तर टक्क्यांपर्यंत आरक्षण दिले जात आहे. याचा आधार घेत महाराष्ट्र सरकारने कोर्टात प्रभावीपणे बाजू मांडावी. त्याचबरोबर धनगर आणि मुस्लिमांमधील काही वर्गाची आरक्षणाच्या मागणीचाही सहानुभुतीने विचार करावा.
मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांनी तत्काळ पावले उचलण्याची गरज होती. मात्र, पंढरपुरात आषाढी एकादशीदिवशी काहींची तेथे साप सोडण्याचा प्रयत्न असल्याची विधाने केल्याने त्यात चंद्रकांत पाटलांच्या विधानांची भर पडल्याने बहुसंख्य मराठा समाजाचा संताप अनावर झाला आणि पुढे परिस्थिती चिघळली, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.
मराठा समाजातील वंचित तरुणांनी आजवर कायदा सुव्यवस्था हातात न घेता शांततेच्या मार्गाने आरक्षणासह आपल्या इतर मागण्या मांडल्या. त्यांच्या अस्वस्थतेची दखल न घेतली गेल्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला गेला. सरकारकडून त्याचीही दखल घेतली न गेल्याने उद्रेकाची स्थिती निर्माण झाली. pic.twitter.com/fhRqGyxHbW
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 24, 2018