नोव्हेंबर महिन्याचा बाजाराचा निर्णायक कल कदाचित रिझव्र्ह बँकेच्या पतधोरणातील घोषणांद्वारे ठरविला जाईल, असे गेल्या आठवडय़ात या स्तंभात कयास व्यक्त केला गेला होता. रिझव्र्ह बँकेने केवळ रोख राखीव दरात (सीआरआर) मध्ये पाव टक्क्यांची कपात केली आणि रेपो दरात कोणती कपात करायचीच झाली तर ती जानेवारी २०१३ मध्येच होऊ शकेल, असेही निक्षून सांगितले. बाजारभावना मात्र रिझव्र्ह बँकेच्या या कडवेपणाच्या शिकार बनल्या आणि या नकारात्मकतेतून निफ्टी निर्देशांकाने मंगळवारी ५५८३ चा नीचांक दाखविला. पण लक्षणीय बाब म्हणजे त्यानंतर निर्देशांक लागलीच दुसऱ्या दिवसापासून सावरला आणि आठवडय़ाअखेर तो आपल्या मूळ प्रतिकार पातळी ५७२०च्या अगदी समीप म्हणजे ५६९६ वर विश्राम घेतानाही दिसला.
रिझव्र्ह बँकेने व्याजाचे दर आहे त्या स्थितीत ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयावर बाजाराने एक मंगळवारचा दिवस वगळता फारशी नकारात्मकता दाखविली नाही ही बाब खूपच महत्त्वाची आहे. किंबहुना निफ्टी निर्देशांकाने पुन्हा उसळी घेऊन आपल्या निसरडय़ा प्रवाहाच्या किंचित वर आठवडय़ाची अखेर केली हे विलक्षणच! परंतु यालाच आगामी सप्ताहासाठी एक सकारात्मक संकेत मानावयाचे काय?
निफ्टी निर्देशांकाने नोव्हेंबर २०१२ च्या फ्युचर्स आणि ऑप्शन्स मालिकेसाठी ५६००-५९०० या दरम्यान आपला हालचाल टप्पा बनविलेला आहे, हे सरलेल्या आठवडय़ातील डेरिव्हेटिव्हज् व्यवहारांचा तपशील आपल्याला सांगतो. हे अशासाठी की सर्वोच्च पुट ऑप्शनचा ओपन इंटरेस्ट हा ५६०० या स्ट्राइक प्राइसवर आहे, तर कॉल ऑप्शन ५९०० या किमतीवर आहे. शिवाय, शुक्रवारी बाजारात कॉल ऑप्शन्सपेक्षा पुट ऑप्शन्स राइटिंगचे पारडे जड बनल्याचे दिसून येणे हा देखील आगामी सप्ताहासाठी निफ्टी निर्देशांकात सकारात्मक हालचालीचा दृढ संकेत आहे. पुट/कॉल गुणोत्तरही १.१२ पट आहे, ज्याचा अर्थ पुट आणि कॉल दोन्ही बाजूंनी सारखाच जोर लावला जात असला तरी पुट्सचे बाजू किंचित बळकट आहे आणि तो तेजीच्या दृष्टीने ते विधायक ठरणारे आहे.
तांत्रिकदृष्टय़ा बोलायचे झाल्यास निफ्टीने अद्याप ५७२०चा अडथळा पार केलेला नाही. तरी त्याने निदान निसरडय़ा प्रवाहावर मात केली आहे आणि छोटेखानी ‘दोजी’ मेणबत्ती रचना शुक्रवारच्या दिवशी बनविल्याचे आलेखात दिसून येईल. ही ‘दोजी’ मेणबत्ती रचना म्हणजे आगामी भाव हालचालीबाबत गोंधळलेली अवस्था दाखविणारी जरी असली तरी अन्य तांत्रिक संकेत सकारात्मकता दर्शवीत आहेत. तथापि त्यांची निश्चित खातरजमा अजून व्हावयाची आहे. सोबतच्या आलेखात ‘मूव्हिंग अॅव्हरेज कन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स (एमएसीडी)’ हा बदलावाची प्रक्रिया पार करण्याच्या सीमेवर असून, तोच खऱ्या अर्थाने ‘खरेदी’ संकेत असेल.
त्यामुळे शेवटी निचोड हाच की, तांत्रिक आलेख हा तेजीचा पक्क्या संकेताच्या अगदी उंबरठय़ावर येऊन ठेपला आहे. त्यापूर्वीच डेरिव्हेटिव्हज् व्यवहाराचे संकेतांनी सकारात्मकता दाखवायला सुरुवात केली, इतकेच नव्हे ५९०० चा उच्चांक गाठण्याकडेही ते बोट दाखवीत आहेत. सावधगिरी म्हणून आगामी आठवडय़ासाठी खालच्या बाजूला ५६०० हा महत्त्वाचा आधार स्तर असेल.
सप्ताहासाठी शिफारस
* सेसा गोवा : (सद्य दर १७५.८० रु.)
खरेदी: रु. १७६.३० वर; लक्ष्य: रु. १८३
* टाटा मोटर्स: (सद्य दर २७० रु.)
खरेदी : रु. २७३ वर; लक्ष्य: रु. २८०
* येस बँक : (सद्य दर ४२० रु.)
खरेदी: रु. ४२२ वर; लक्ष्य: रु. ४३५
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा