मार्चमध्ये विक्रीत १६ टक्क्यांची वाढ; नववर्षांत दुहेरी अंकात वाढीचे लक्ष्य

सरलेले २०१५-१६ आíथक वर्ष जवळपास सर्वच देशी-विदेशी प्रवासी वाहनांच्या निर्मात्यांसाठी फलदायी ठरले. विशेषत: आधीच्या दोन वर्षांतील नकारात्मक वाढीच्या पाश्र्वभूमीवर ही वाढ सुखद ठरली. देशातील सर्वात मोठय़ा कार उत्पादक मारुती सुझुकीने तर आर्थिक वर्षांला सर्वाधिक १०.६ टक्क्यांच्या वार्षिक वृद्धीने निरोप दिला. सरलेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने सुमारे १४ लाख वाहनांची विक्री केली.

विशेषत: एस क्रॉस, बलेनो आणि महिन्याभरापूर्वी दाखल झालेल्या व्हिटारा ब्रेझा या नव्या प्रस्तुतींतून मारुतीने सरलेल्या आर्थिक वर्षांत एकूण १४,२९,२४८ वाहनांच्या विक्रीचा विक्रमी आकडा गाठला. लक्षणीय बाब म्हणजे देशांतर्गत एकूण वाहन उद्योगाच्या विक्रीतील वाढीचा दर केवळ ७ टक्के असताना मारुतीने ११.५ टक्क्यांची वाढ साधली. बरोबरीने निर्यातीतील वाढीनेही एकूण वार्षिक वृद्धीमुळे मारुतीला दोन अंकी पातळी गाठता आली आहे.

सरलेल्या मार्च महिन्यांत १,२९,३४५ वाहनांची विक्री मारुतीने केली. गेल्या वर्षी याच महिन्यांतील १,११,५५५ वाहनांच्या विक्रीच्या तुलनेत यंदाची वाढ भरीव १५.९ टक्क्यांची आहे. यात देशांतर्गत विक्रीतील वाढीचे प्रमाण १४.६ टक्के इतके आहे.

नव्याने दाखल झालेले स्पोर्ट युटिलिटी वाहन व्हिटारा ब्रेझाने पहिल्या महिन्यांत ३०,००० इतकी मागणी नोंदविली अशी माहिती मारुती सुझुकी इंडियाचे कार्यकारी संचालक (विपणन) आर एस कलसी यांनी दिली. ८ मार्चला बाजारात दाखल झालेल्या आठ हजार व्हिटारा ब्रेझा त्यांच्या मालकांना सुपूर्द केल्या गेल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नवीन २०१७ आर्थिक वर्षांतही कंपनीने इग्निस, बलेनो आरएस या नव्या कारच्या प्रस्तुतीचा बेत आखला आहे. नव्या प्रस्तुतीतून विक्रीत वाढीला प्रयोग आजमावताना पुन्हा दोन अंकी वृद्धी दर कायम राखला जाईल, असा विश्वास कंपनीकडून व्यक्त करण्यात आला. इग्निस आणि बलेनो आरएस या प्रस्तावित नवीन कारची वर्षांरंभी ऑटो एक्स्पोमध्ये दिसलेली झलक बहुचर्चित ठरली होती.

Story img Loader