आहार्य, वाचिक, आंगिक आणि सात्त्विक हे भरतमुनींनी नाटय़शास्त्रात चर्चा केलेले चार अभिनय प्रकार; त्यापैकी वाचिक अभिनयाची बाजू कथकली या नृत्यनाटय़ प्रकारात पार्श्वगायक किंवा आख्याननिरूपक सांभाळतात. त्यामुळे कथकली नर्तक अभिनेत्याकडे आंगिक म्हणजे वेशभूषा व रंगभूषेतून दिसणारा आणि आंगिक म्हणजे चेहऱ्यावरील भाव तसेच शारीरिक हालचालींतून अभिव्यक्त होणारा अभिनय ही दोनच अभिनयअंगे उरतात. उच्चकोटीच्या कथकली नर्तकांकडून सात्त्विक अभिनयाचा, म्हणजे शरीर आणि मनाचे सायुज्य साधून घडलेल्या मानवी भावदर्शनाचा प्रत्यय रसिकांना येतो. त्यातही वेशभूषा व रंगभूषेच्या अवडंबरातून आपले शरीरमाध्यम कथकली नर्तकाला वापरायचे असते; म्हणून कथकलीतील अभिनय अवघड. असा अभिनय केवळ आत्मसात करून त्यात प्रावीण्य न मिळवता, कथकली नर्तक अभिनेत्यांची पुढील पिढी घडवणारे नृत्यगुरू मठूर गोविन्दन कुट्टी यांचे गुरुवारी, ४ फेब्रुवारीस कोट्टयम येथे निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते.
वयाच्या चौदाव्या वर्षांपासून कथकली शिकणारे गोविन्दन मॅट्रिकही झाले. एवढे शिक्षण १९५०च्या दशकाअखेर नोकरी करण्यास पुरेसे, पण गोविन्दन यांनी कथकलीचा मार्ग निवडला. त्यासाठी आलपुळा (आलेप्पी) जिल्ह्यतील गाव सोडून ते पतनमथिट्टा जिल्ह्यात, मठूर येथे येऊन अम्बलपुळा शेखरन् यांच्याकडे शिकू लागले. कथकलीसह कलारी या युद्धकलाप्रकाराचे शिक्षण घ्यावेच लागत असे, कारण कथकलीची आख्याने अमुकविजय/ तमुकवध अशी युद्धप्रचुर असत. कमीतकमी स्त्रीपात्रे असणारीच ती आख्याने. मात्र स्वातंत्र्योत्तर काळात कुडमलूर करुणाकरन नायर यांच्यासारखे नृत्यगुरू या स्थितीत बदल घडवू पाहात होते. भावदर्शनालाही प्राधान्य देणारी, स्त्रीप्रधान आख्याने कथकलीत रुळवणाऱ्या, त्यासाठी स्त्रीभूमिकेत उत्तम आंगिक , सात्त्विक अभिनय करू शकतील असे अभिनेते घडवणाऱ्या या करुणाकरन यांचे गोविन्दन हे आधी विद्यार्थी आणि नंतर जावई बनले. नलचरित्रातली दमयंती, दुयरेधनवध आख्यानातली द्रौपदी, कर्ण आख्यानातली कुंती अशा स्त्रीभूमिका त्यांनी सादर केल्या. करुणाकरन यांच्याच कुडमलूर कलामंडलम या कथकली गुरुकुलात पुढे गोविन्दन शिकवू लागले आणि चाळिशीनंतरच्या वयात चरित्र भूमिका साकारू लागले. देवयानी स्वयंवरातील शुक्राचार्य, बालीविजयातील नारद, किरातार्जुन आख्यानातील शंकर/ किरात, अशा या भूमिका होत्या. १९८२च्या आशियाई खेळांच्या उद्घाटन कार्यक्रमात कथकलीचे दर्शन क्रीडा प्रेक्षागारात आणि तेही कमी वेळात घडवण्याचे आव्हान त्यांनी पेलले होते. भारत महोत्सव व अन्य निमित्तांनी युरोपचा दौराही त्यांनी केला होता. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार त्यांना २००५ साली मिळाला होता.