संजय मोने
आजचा जिप्सीचा शेवटला थांबा. इथून पुढे तो कुठे कुठे जाईल, ते वाचकहो तुम्हाला कळू शकणार नाही. कारण पुढच्या आठवडय़ापासून मी तुमचा किंवा तुमची रविवार सकाळ ढवळायला येणार नाही. (‘रविवार’ पुल्लिंगी आहे आणि ‘सकाळ’ स्त्रीलिंगी. तेव्हा ज्या घरात स्त्रीची सत्ता चालते त्या घरात ‘तुमची रविवार सकाळ’ असते आणि जिथे पुरुषाची सत्ता चालते असं वाटतं किंवा चालवून घेतली जाते तिथे ‘तुमचा रविवार सकाळ’ असू शकतो!) तर.. मी सकाळ ढवळून काढतो असा आपला माझा समज; तुम्ही तो बेलाशक खोडून काढू शकता. चरख्यावर सूत कातल्याने इंग्रज सरकार सुतासारखं सरळ होऊन आपल्याला स्वातंत्र्य देऊन टाकेल असा पूर्वी काही लोकांचा समज होता, अगदी तसा तो समज आहे. आज हा शेवटला लेख लिहिताना (खरं तर ‘अंतिम’ म्हणायला हवं होतं, कारण त्या शब्दात जी गहनता आहे, जो एक विशाल प्रवासाचा शेवट होण्याचा भाव आहे, तो ‘शेवटला’ या शब्दात नाही. मान्य, पण आता लिहून बसलो. तेव्हा कशाला उगाच खोडा?) मला जे वाटतंय, ते बहुधा शेवटच्या व्हॉइसरॉयला नेहरू आणि जीना यांना भारत आणि पाकिस्तानचा ताबा देताना वाटलं असेल. किंवा संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतराव चव्हाणांच्या हाती देताना नेहरूंना वाटलं असेल. जरा राज्य पातळीवरचा विचार करायचा, तर तेलंगणा राज्यनिर्मितीनंतर के. सी. आर. वगरे अक्षरांनी सुरुवात होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या हाती सत्ता सोपवताना तिथल्या जनतेला वाटलं असेल, तसंच वाटतं आहे. गेला बाजार, आमच्या बाजूच्या सोसायटीत राहणाऱ्या बाबूराव साटमांनी आपल्या घराच्या चाव्या मुलाच्या हाती देऊन कुडाळला उरलेले आयुष्य तिथल्या लोकांना त्रास देण्यासाठी वेचायचा निश्चय केला त्या क्षणी त्यांना जसं वाटलं होतं, निदान तसं तरी वाटतंय.
एखाद्या नाटकात किंवा चित्रपट वा मालिकेत काम करताना त्याचे पुढे काय होईल, याची जशी कलाकारांना कल्पना नसते, अगदी तसंच मला पहिला लेख लिहिताना वाटलं होतं. असंख्य कुशंका मनात होत्या. सगळ्यात पहिली समस्या होती ती म्हणजे ५२ रविवार रेटता येईल का? एका विशिष्ट दिवशी लेख पाठवावा लागतो, तो दिवस दर वेळी पाळता येईल का? समजा नाही जमलं एखादे वेळी, तर लेखाची विचारणा करणाऱ्या व्यक्तीला टाळता येईल अशी कारणं देता येतील का? शिवाय हे सगळं लिहून काढायला विषय मिळतील का? समजा एखादा विषय मिळाला, तर आपण मारे लिहून काढू, पण वाचकांना तो रुचेल का? सगळे विषय सगळ्यांना रुचतील असं नाही, पण निदान बराचसा मजकूर बऱ्यापकी वाचकांना आवडला पाहिजे हे तर आहेच. ती टक्केवारी गाठता येईल का? आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याने कोणाच्या भावना दुखावणार नाहीत ना? आजकाल भावना ही जपण्यापेक्षा दुखण्यासाठीच जास्त प्रसिद्ध होत आहे.
जांभेकर नावाच्या गृहस्थांनी सगळ्यात प्रथम वर्तमानपत्र छापून वाचकांसमोर आणलं. (असा मी ऐकलेला आणि वाचलेला इतिहास आहे. सध्याच्या नवीन इतिहास निर्माण करणाऱ्या लोकांना तो खोडून काढायचा असेल तर ते मुखत्यार आहेत.) तेव्हा कोणीतरी त्यात मजकूर लिहिला असेल त्या गृहस्थांना काय सुचलं असेल? आचार्य अत्रे, दत्तू बांदेकर, विजय तेंडुलकर, प्रमोद नवलकर, शिरीष कणेकर, पप्पू संझगिरी आदी अनेक सातत्याने स्तंभलेखन करत आले. त्यांना जे जमले ते मला जमणार नाही याची खात्री होती; पण निदान तितके वेळेवर लिहिता येईल की नाही, याचीही शंका होतीच. कधी कधी तालुका पातळीवरच्या वर्तमानपत्रातून अमेरिकेच्या अध्यक्षांचे कुठले धोरण चुकले आहे, याची हिरीरीने चिकित्सा करणारे लेखकही स्तंभ गिरबिटून काढतात आणि स्वत:चं हसं व इतरांचं मनोरंजन करून घेतात आणि देतात; तसं तर आपलं होणार नाही ना? वाचकांकडून ‘आपण जो काही भलाबुरा अभिनय करता आहात इतकी र्वष तेच करत राहा, लेखन वैगरेच्या नादाला लागू नका’ असा अनाहूत सल्ला तर ऐकावा किंवा वाचावा लागणार नाही ना?
‘कामातुराणां न भयं न लज्जा’ अशी एक उक्ती आहे. त्याचा ‘कामातुर’ म्हणजे काम करण्यासाठी, कार्य करण्यासाठी आतुर असा संधी मी माझ्यापुरता सोडवला आणि आपल्याला लेख लिहायचे तर भीती आणि लाज बाळगून चालणार नाही हे मनाशी पक्कं केलं. एक गोष्ट नक्की होती, मला माझा अभिनयप्रवास (हा शब्द लिहवत नाहीये. पण सध्या तोच प्रचलित आहे म्हणून नाइलाजाने कागदावर उमटवला आहे.) आणि त्यातल्या आठवणीबिठवणी लिहायच्या नव्हत्या. एक तर मी मुंबईत जन्माला आलो. आणि तिथेच आहे व राहणार. त्यामुळे कसातरी अनंत लटपटी करून मुंबईला येण्याचे प्रयोजन मला उरले नाही. त्यामुळे दोन-तीन भाग जे या प्रवासात लिहिता आले असते ते उडाले. त्याबरोबर त्या-त्या छोटय़ा शहरांतल्या जुन्या आठवणी, त्या स्पर्धा, तिथली एकांकिका वा नाटकाच्या निकालाच्या वेळी होणारी तगमग.. सगळेच हुकले. मग मुंबईला आल्यानंतर इथली यातायात, आल्याबरोबर भेटलेले काही मुंबईकर कलाकार, त्यांच्याबद्दल लिहायला लागणारे भलेबुरे अनुभव, गावाची येणारी आठवण, आधी आलेल्या आपल्या भागातल्या लोकांना भेटून, त्यांच्याशी संगनमत करून आपला एक गट बनवणे- या सगळ्या सगळ्या व्यापांबद्दल लिहायला सोयच उरली नाही. अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर या व्यवसायात मी सहज आलो आणि आलो तो इथे राहिलो. माझ्या सुदैवाने मला कधीही काम मिळवण्यासाठी धडपड करावी लागली नाही. घरचे सुग्रास अन्न खाऊ घालत होते, त्यामुळे उपासमार झाली नाही. थोडासा रोखठोक स्वभाव असल्यामुळे लहानसहान भूमिका करून पायऱ्या चढत राहावं लागलं नाही.
या व्यवसायात येण्यापूर्वी अरुण नाईक, राजीव नाईक, विजय केंकरे, दामूकाका केंकरे यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली. त्यांनी मी आणि माझ्याबरोबर असलेल्या अनेकांना रंगभूमीबद्दल कशा अर्थाने विचार करावा, याची जाणीव करून दिली होती. (ती पुढे आम्ही पाळली नाही ते सोडा.) उत्तम नाटकांची निर्मिती त्यांनी आम्हाला करून दिली. व्यवसाय म्हणून नाटक स्वीकारल्यानंतर मी फारच काटेकोरपणे तो स्वीकारला. त्यामुळे माझा आजवर एक रुपयाही कुणी बुडवला नाही. त्यामुळे लेख लिहिताना ती चार प्रकरणं माझ्या अभिनय प्रवासात नसणार होती. कुठल्याही सरकारी मंडळांवर मला पदबीद नको होते. थोडेसे नाव झाल्यावर मागचा कुणाचा हिशोब चुकता करायचा त्यामुळे प्रश्नच नव्हता. कलेत राजकारण नकोच होते. एकंदरीत ‘अभिनय प्रवास’ हा विषय माझ्या लेखांसाठी पूर्णत: अयोग्य होता. सामाजिक जाणिवा माझ्या अजिबात तीक्ष्ण नाहीत. आसपासच्या सर्व लोकांसारखाच मी सामान्य होतो. आता वयपरत्वे मी व्याख्यानबिख्यान जाऊन हाणतो. पण त्यात पसे मिळतात हा आनंद मला माझे व्याख्यान ऐकून लोक समृद्ध होतात याच्यापेक्षा जास्त होतो. मग लिहायचं कशावर? प्रश्न सुटत नव्हते. उत्तरं मिळत नव्हती. जानेवारीपासून लिहितो हे कबूल करून बसलो होतो.
शेवटी ठरवलं की, आपल्या आसपास जे घडतंय किंवा आपण जे काही पाहिलंय आणि आजही त्याची आठवण ताजी आहे, त्या आणि त्याच विषयांवर लिहायचं. आणि तेच मदतीला आलं. चित्रपट, मालिका आणि नाटकं व त्यांचं सादरीकरण हा कायमच मनोरंजनाचा आणि टवाळीचा विषय होता. नागरी दुरवस्था हा उपहासाचा. आपण राहत असलेल्या ठिकाणाची दुर्दशा हा व्यथेचा व पुढे काय होईल हा चिंतेचा किंवा चिंतनाचा भाग होता. भेटलेली अफाट माणसं- ज्यातल्या काहींनी मला विस्मयचकित करून सोडलं- मनातून कागदावर उतरले. अनेक विषय राहून गेले.
काही महत्त्वाच्या व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या, त्यांच्याबद्दल लिहायचं राहून गेलं. मला ‘दिलीपकुमार’ अशी हाक मारणाऱ्या मधुकर तोरडमल यांच्याबरोबर दोन र्वष मी एक नाटक करत होतो. त्यांच्या काही आठवणी यायला हव्या होत्या. दामू केंकरे यांच्याकडून त्यांनी प्रयत्न करूनही आम्ही शिकू शकलो नाही; पण काही पाहिलं होतं, ते राहून गेलं. काही मित्र सोडून गेले, तेही निसटून गेले. राजीव आणि अरुणदादाच्या घरी तालमीनंतर रात्रीबेरात्री जेवू-खाऊ घालणारे अण्णा आणि आई, रघ्या कुल, प्रदीप मुळ्ये, पुरुषोत्तम बेर्डे, माझी ‘दीपस्तंभ’ या नाटकातली संधी जाऊ नये म्हणून माझ्याऐवजी पहिले तीस प्रयोग बदली कलाकार म्हणून करायला तयार होणारा अच्युत देशिंगकर आणि हे घडवून आणणारे मोहन वाघ, ‘गोवा हिंदू’चे रामकृष्ण नायक, मणेरीकर, पांगम.. अशा अनेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नाही लिहू शकलो. मला कायम वेगवेगळ्या भूमिका करायला दिल्या आणि मला नाटकं लिहायला लावली त्या विजय केंकरेबद्दल नाही लिहिता आलं. धनंजय गोरे, अजित भुरे यांनी मला कायम आपल्यात एक मित्र म्हणून सामावून घेतलं, त्यांचा उल्लेख राहून गेला. या आणि अशाच बऱ्याच गोष्टी राहून गेल्या. मुख्यत: माझे आई-वडील आणि बायको यांनी माझी विचित्र मन:स्थिती समजून घेतली, त्यांचा नामनिर्देश सुटला. याशिवाय असंख्य अनुभव मनात होते, पण ते मांडता आले नाहीत याचा खेद आहेच. आज शेवटचा लेख लिहिताना वाटतंय, खरंच मी लेखक असायला हवं होतं! असतो तर या सगळ्यांची व्यक्तिचित्रं लिहिता आली असती. यांची माफी मागून इतकंच म्हणेन की, सगळ्यांना माझ्या लेखनात जर उणं-वाईट वाटलं असेल, तर तो माझा कमीपणआ. आणि जे अधिक होतं तो तुमचा चांगुलपणा. आता पुढच्या रविवारपासून मी फक्त एक वाचक!
sanjaydmone21@gmail.com
(समाप्त)