२,०९,२२६ रुपयांची मालमत्ता आणि विविध पोलिस ठाण्यात दाखल आठ गुन्हे वगळता मेधा पाटकर यांच्याकडे कसलीही संपत्ती नाही. त्यामुळे मेधा पाटकर खऱ्या अर्थाने आम आदमी उमेदवार ठरल्या आहेत.
ईशान्य लोकसभा मतदार संघातून आपच्या उमेदवार म्हणून पाटकर यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी  प्रकाशक रामदास भटकळ, नाटककार रत्नाकर मतकरी, प्रा. पुष्पा भावे, गजानन खातू, गोपाळ दुखंडे, सुनीती सु. र. यांच्यासह आपचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात पाटकर यांनी आपल्या संपत्तीचा तपशील देताना आपल्याकडे एका रुपयाचीही अचल (स्थावर) मालमत्ता नसल्याचे म्हटलेले आहे.
पाटकर यांच्या बँक खात्यात २५,२७६ रुपये आहेत. एका कंपनीचे ५०० शेअर्स असून त्याची सध्याची किंमत ४८ हजार रुपये आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात केलेल्या गुंतवणुकीची आजची किंमत १ लाख ३२ हजार रुपये असून पाटकर यांची एकूण जंगम संपत्ती २,०९,२२६ आहे.
 पाटकर यांच्यावर देशातील विविध न्यायालयांत ८ दावे चालू आहेत. हे गुन्हे विविध आंदोलनात दाखल झाले आहेत.