गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर या भागातील नेतृत्व गमावलेल्या भाजपने मराठवाडय़ात जोरदार मुसंडी मारली. मराठवाडय़ातील ४६पैकी तब्बल १५ जागांवर भाजपला विजय मिळवून देत मतदारांनी मुंडेंना एकप्रकारे श्रद्धांजली वाहिली. बीड लोकसभा मतदारसंघातून मुंडे यांच्या कन्या प्रीतम खाडे-मुंडे यांनी ९ लाखांहून अधिक मते मिळवून सर्वाधिक मताधिक्याचा राष्ट्रीय विक्रम केला. एकीकडे, भाजपचे कमळ मराठवाडय़ात बहरत असताना ‘एमआयएम’ या पक्षाने औरंगबाद मध्य मतदारसंघात विजय मिळवून राज्याच्या राजकारणात उदय केला.
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या पंकजा पालवे यांनी राज्यभरात संघष यात्रा काढली. त्याचा परिणाम मराठवाडय़ातही दिसून आला. याठिकाणी भाजपने १५ जागी विजय मिळवला. काँग्रेसने दहा तर राष्ट्रवादी व शिवसेनेने प्रत्येकी नऊ जागांवर विजय मिळवला. मात्र, आघाडी सरकारमधील काँग्रेसचे राजेंद्र दर्डा व राष्ट्रवादीचे सुरेश धस यांना पराभवाचा धक्का बसला. औरंगाबाद पूर्व मतदारसंघात एमआयएममुळे मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण होऊन दर्डा तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. राष्ट्रवादीचे राजेश टोपे (घनसावंगी, जालना), जयदत्त क्षीरसागर (बीड), काँग्रेसचे अमित देशमुख (लातूर शहर), डी. पी. सावंत (नांदेड उत्तर), मधुकर चव्हाण (तुळजापूर), अब्दुल सत्तार (सिल्लोड, औरंगाबाद) या माजी मंत्र्यांनी मात्र आपापले गड राखले.
मराठवाडय़ातील तब्बल २३ आमदारांना पराभवाचा धक्का बसला. यात काँग्रेस ९, राष्ट्रवादी ८, शिवसेना ५ व अपक्ष सीताराम घनदाट यांचा समावेश आहे. दिवंगत ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे यांच्यापश्चात झालेल्या या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळाचा नारा देत मैदानात उतरले होते. आपण सर्वात मोठा पक्ष ठरू, असा शिवसेनेला विश्वास होता; परंतु प्रत्यक्षात हा पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा